Diwali Gift Video : दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर योग्य बोनस न मिळाल्याने आणि अत्यल्प भेटवस्तू (गिफ्ट) दिल्यामुळे हरियाणातील सोनीपत जिल्ह्यातील गन्नौर औद्योगिक क्षेत्रातील एका फॅक्टरीतील कामगारांनी जोरदार विरोध प्रदर्शन केले. फॅक्टरी व्यवस्थापनाने दिवाळी बोनसऐवजी दिलेले 'सोन पापडी'चे मिठाईचे बॉक्स कामगारांनी फॅक्टरीच्या गेटबाहेर फेकून दिले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामुळे कामगारांचा सन्मान आणि त्यांना मिळणाऱ्या योग्य मोबदल्याबद्दल (बोनस) नवी चर्चा सुरू झाली आहे.
'सोन पापडी'चा बॉक्स बनला अपमानाचे प्रतीक
वर्षभर केलेल्या मेहनतीनंतर दिवाळीच्या सणासुदीला फॅक्टरी कामगारांना अपेक्षा होती की त्यांना योग्य बोनस मिळेल किंवा चांगले गिफ्ट मिळेल. परंतु, फॅक्टरी व्यवस्थापनाने बोनस न देता किंवा दुसरे कोणतेही गिफ्ट न देता, सर्व कामगारांना फक्त 'सोन पापडी'चा एक छोटा बॉक्स दिला. 'साधारण' असलेल्या या भेटवस्तूमळे कामगार संतप्त झाले.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये कामगार तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. ते म्हणत आहेत, "घरातील लोक ही मिठाई खात नाहीत. त्याऐवजी आम्हाला बोनस दिला असता, तर अधिक चांगले झाले असते. वर्षभर केलेल्या मेहनतीनंतर एवढी स्वस्त मिठाई देणे अपमानजनक आहे."
( नक्की वाचा : Kanyadaan : 'मी कन्यादान करणार नाही...'; मुलीच्या लग्नात वडिलांची घोषणा, कारण वाचून डोळ्यात येईल पाणी, Video )
गेटवर मिठाई फेकली आणि....
व्हायरल व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, अनेक कामगार एकापाठोपाठ एक 'सोनपापडी'चे बॉक्स घेऊन येत आहेत आणि ते फॅक्टरीच्या गेटबाहेर फेकून देत आहेत. कामगारांच्या या सामूहिक विरोधाने फॅक्टरी व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
नेमकी कोणती फॅक्टरी?
हा व्हिडिओ गन्नौर औद्योगिक क्षेत्रातील कोणत्या खासगी युनिटचा आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणावर जिल्हा प्रशासन किंवा फॅक्टरी असोसिएशनकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही, तसेच पोलिसांनीही व्हायरल व्हिडिओच्या तपासाची कोणतीही माहिती दिलेली नाही.
सोशल मीडियावर 'सोन पापडी' बनली असंतोषाचे प्रतीक
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक लोक कामगारांच्या समर्थनार्थ उतरले आहेत. अनेक युजर्सने लिहिले आहे की, "कामगारांच्या मेहनतीची कदर व्हायला हवी आणि त्यांना सणासुदीला सन्मानाने योग्य बोनस मिळायला हवा." अनेक कमेंट्समध्ये असेही म्हटले आहे की, "सोन पापडी आता फक्त एक मिठाई राहिली नाही, तर ती कामगारांच्या असंतोषाचे आणि शोषणाचे प्रतीक बनली आहे." या घटनेने औद्योगिक क्षेत्रांमध्ये दिवाळी बोनस आणि कर्मचाऱ्यांप्रति आदराच्या (सन्मानाचा) मुद्द्याला पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.
इथे पाहा Video