Thane Rain Video : राज्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. मुंबईपासून ठाण्यापर्यंत सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. इतकंच नव्हे तर, मुसळधार पावसामुळे रस्ते आणि घरांमध्ये साचलेल्या पाण्यात साप तरंगताना दिसत आहेत. ठाणे महानगरपालिका हद्दीतील दैघर गावात अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे आणि रस्त्यांवर साचलेल्या पाण्यात साप तरंगताना दिसले, ज्यामुळे स्थानिक लोक भयभीत झाले आहेत. पावसाळ्यामुळे आजूबाजूच्या जंगलातून साप रहिवासी भागामध्ये आले आहेत.त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
नेमकं काय घडलं?
ठाणे शहरात गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं पाऊस कोसळतोय. मंगळवारी (19 ऑगस्ट) सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे.पावसामुळे शहरातील बहुतेक गटारांचे पाणी रस्त्यांवर आले आहे.सर्वत्र पाणीच पाणी दिसत आहे. ठाण्यातील दैघर येथील रहिवासी आता आपल्या घरातही सुरक्षित नाहीत. साप असल्यामुळे लहान मुले आणि वृद्ध यांसह सर्वचजण घाबरले आहेत.
जोरदार पावसामुळे लोकांची अवस्था खूपच वाईट झाली आहे. पाण्याची ही समस्या दरवर्षी उद्भवते आणि यावर्षी परिस्थिती आणखी गंभीर आहे, अशी तक्रार स्थानिकांनी केली आहे.
( नक्की वाचा : Mumbai Rain : मुंबईला प्रत्येक वेळी मिठी नदी का घाबरवते? कसं पडलं नाव ? घोटाळा ते विनाशापर्यंतचा हा आहे इतिहास )
राज्यात पावसामुळे संकट
राज्यात सलग चौथ्या दिवशीही मुसळधार पाऊस सुरूच आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना अनेक अडचणी सहन कराव्या लागत आहेत. या जोरदार पावसामुळे दैनंदिन जनजीवन विस्कळीत झाले आहे.या पावसामुळे सखल भागात तसंच रस्त्यांवर पाणी साचलंय. त्यामुळे रस्ते वाहतूक संथ झाली आहे. लोकलच्या वेगालाही यामुळे ब्रेक लागला आहे.