साध्या वडापावची किंमत एका आलिशान हॉटेलमध्ये किती असू शकते? ही किंमत ऐकून तुम्ही थक्क व्हाल. एका प्रसिद्ध रिसॉर्टमधील वडापाव आणि चहाच्या अवाढव्य किमतीचे बिल सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे. गुजरातमधील 'द पोस्टकार्ड गिर वाइल्डलाईफ सँक्च्युअरी' (The Postcard Gir Wildlife Sanctuary) या पंचतारांकित हॉटेलमधील हे बिल पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. अवघ्या एका वडापावसाठी 625 रुपये आणि एका काठियावाडी चहासाठी 325 रुपये मोजावे लागले आहेत. सामान्य माणसाच्या खिशाला परवडणाऱ्या या पदार्थांसाठी इतकी मोठी किंमत पाहून सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
( नक्की वाचा: ढाब्यापासून फाईव्ह स्टार हॉटेलपर्यंत सगळ्यांना हा नियम लावा! अभिनेत्याने केली जबरदस्त मागणी )
संपूर्ण बिल पाहून डोकं गरगरेल
व्हायरल झालेल्या बिलानुसार, हे बिल 4 ऑगस्ट 2025 रोजीचे आहे. डेनिश तन्ना या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने हे बिल शेअर केले आहे. बिलामध्ये 'काठियावाडी चहा'ची किंमत 325 रुपये आणि 'वडापाव'ची किंमत 625 रुपये आहे. या दोन पदार्थांची एकूण किंमत 950 रुपये झाली. यावर 5% सेवा शुल्क (सर्व्हिस चार्ज) म्हणून 48 रुपये, तर 9% सीजीएसटी (CGST) आणि 9% एसजीएसटी (SGST) असे प्रत्येकी 90 रुपये कर लावण्यात आले आहेत. त्यामुळे, एकूण बिलाची रक्कम तब्बल 1177 रुपये झाली.
सोशल मीडियावर व्हायरल झालाय फोटो
मुंबई आणि महाराष्ट्रात गल्लीबोळात मिळणारा वडापाव हा सर्वसामान्यांचे पोट भरण्याचा स्वस्त पर्याय मानला जातो. महाराष्ट्रामध्ये एका वडापावची किंमत 15-20 रुपयांच्या घरात आहे. त्याचप्रमाणे, कटिंग चहाची किंमतही 10 ते 20 रुपयांच्या घरात असते. परंतु, याच वडापाव आणि चहासाठी एका लक्झरी रिसॉर्टमध्ये इतके रुपये मोजावे लागत असल्याचे पाहून सर्वसामान्य जनता आणि नेटकरी आश्चर्यचकित झाले आहेत.
( नक्की वाचा: ठाण्यातले 5 बेस्ट वडापाव, तुमचा फेव्हरेट कोणता ? )
लोकांनी दिल्या गंमतीशीर प्रतिक्रिया
सोशल मीडियावर या बिलाचा फोटो शेअर करण्यात आला असून अनेकांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एकाने म्हटले आहे की, "1177 रुपयांत आम्ही हजारवेळा वडापाव खाल्ले असते." दुसऱ्या एकाने म्हटलंय की, "जितना तुमने जीएसटी चुकाया उतने में 6 वडा पाव और 9 चाय आ जाएगा." अन्य एकाने म्हटलंय की "ऊपर से मिर्ची हटा देता तो शायद 300/– रुपए कम हो जाते !"