केरळमधून एक धक्कादायक आणि अंगावर काटा आणणारा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये वन अधिकारी जी.एस. रोशनी यांनी एका महाकाय किंग कोब्राला धाडसाने वाचवल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ निवृत्त वन अधिकारी सुशांत नंदा यांनी शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये रोशनी एका उथळ प्रवाहात स्नेक कॅचिंग स्टिकच्या मदतीने सापाला मोठ्या कौशल्याने नियंत्रित करताना दिसत आहेत.
वारंवार निसटत होता किंग कोब्रा
ही तीच जागा आहे, जिथे साधारणतः गावकरी आंघोळीसाठी येतात. जेव्हा तिथे किंग कोब्रा दिसला, तेव्हा परिसरात एकच खळबळ उडाली. हा कोब्रा 16 फूट लांब होता. याची माहिती मिळताच, वन विभागाची रॅपिड रिस्पॉन्स टीम घटनास्थळी पोहोचली. त्यात रोशनी यांचाही समावेश होता. रोशनी यांनी जराही न घाबरता सापाला पकडण्याच्या स्टिकने त्याला नियंत्रित केले. त्यानंतर काही मिनिटांतच त्याला सुरक्षितपणे पकडले. पुढे त्या सापाला जंगलात सुरक्षित ठिकाणी सोडून देण्यात आले.
6 मिनिटांत 16 फूट लांब किंग कोब्रा नियंत्रणात
सुशांत नंदा यांनी व्हिडिओ शेअर करताना लिहिले, "जंगलच्या या राणीला सलाम. वन अधिकारी जी.एस. रोशनी यांनी 16 फूट लांब किंग कोब्राला वाचवले." हे पहिल्यांदाच होते की त्या या प्रजातीच्या सापाला हाताळत होत्या. त्यांनी यापूर्वी 800 हून अधिक साप वाचवले आहेत. सोशल मीडियावर युजर्सनी रोशनी यांच्या हिंमत आणि शांत स्वभावाची खूप प्रशंसा केली आहे. एका युझरने लिहिले, "क्वीनने किंगला सांभाळले, त्या खरोखरच प्रेरणादायी आहेत." दुसऱ्याने लिहिले, "IFS अधिकारी आणि वन विभागाचे कर्मचारीचं खरी कर्तव्ये बजावतात. त्यांना IAS पेक्षा जास्त सन्मान मिळायला हवा."
भीतीवर मात करून जंगलाची वाघीण बनली आदर्श
तिसऱ्या युझरने म्हटले, "त्यांच्या शौर्याला सलाम." पीटीआयच्या मते, जी.एस. रोशनी मागील 8 वर्षांपासून केरळ वन विभागात कार्यरत आहेत. त्यांनी आतापर्यंत 800 हून अधिक विषारी आणि बिनविषारी सापांना वाचवले आहे, परंतु हा त्यांचा पहिला किंग कोब्रा रेस्क्यू होता आणि हे कामही त्यांनी निपुणतेने करून दाखवले.