- हिमाचल प्रदेशच्या मनालीमध्ये बर्फवृष्टीच्या दरम्यान एका महिला इन्फ्लुएन्सरने अंतर्वस्त्रात चित्रीकरण केले
- या प्रकारावर हिमाचल प्रदेशच्या सार्वजनिक बांधकाम मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी तीव्र टीका केली आहे
- महिला इन्फ्लुएन्सरच्या इंस्टाग्रामवर ४५ हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत
सोशल मीडियाचा अतिरेक किती होतोय त्याचं एक जिवंत उदाहरण समोर आले आहे. त्यामुळे देशभरातून टिका होत आहे. ही घटना घडली आहे हिमाचल प्रदेशच्या मनाली मध्ये. सध्या मनालीत मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत आहे. त्यामुळे पर्यटकांची गर्दी या ठिकाणी झाली आहे. मनालीच्या याच बर्फाच्छादित डोंगररांगांमध्ये एका महिला इन्फ्लुएन्सरने साडी नेसून चित्रीकरणाला सुरुवात केली. त्यानंतर साडी काढून अंतर्वस्त्रात रील बनवल्याचा प्रकार समोर आला आहे. हा व्हिडीओ सध्या वाऱ्यासारखा व्हायरल झाला आहे. यावर हिमाचलच्या मंत्र्यांनी टीका केली आहे. शिवाय पर्यटकांना अशी कृती करू नका अशी विनंतही केली आहे.
6 डिसेंबर 2025 रोजी अपलोड झालेला हा व्हिडिओ गेल्या काही दिवसांपासून प्रचंड व्हायरल होत आहे. यामुळे सोशल मीडियावर वादाला तोंड फुटले आहे. याची थेट दखल हिमाचल प्रदेशच्या मंत्र्यांनी घेतली आहे. हिमाचल प्रदेशचे सार्वजनिक बांधकाम मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. "रील आणि व्ह्यूज मिळवण्यासाठी अश्लीलता पसरवणे खपवून घेतले जाणार नाही," अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. देवभूमीच्या परंपरेला धक्का लावणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कठोर कायदेशीर पावले उचलावीत, असे आदेशही त्यांनी दिले आहेत.
संबंधित महिलेचे इंस्टाग्रामवर 45,500 फॉलोअर्स आहेत. 9 सेकंदांच्या एका व्हिडिओमध्ये ती 'इश्क' चित्रपटातील गाण्यावर साडी हवेत फेकून देताना दिसते. ती तेवढ्यावरच थांबत नाही. ती पुढे तिच्या अंतर्वस्त्रावर तिथे शुट करते. बर्फात उड्या मारते. बर्फात फिरते. बर्फ अंगावर उडवते असं त्या व्हिडीओत दिसत आहे. या कृत्यामुळे पर्यटनाच्या नावाखाली सुरू असलेल्या या 'पब्लिसिटी स्टंट'वर नेटिझन्सकडून टीका होत आहे.
हा व्हिडिओ व्हायरल होताच हिमाचलमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी यावर थेट भूमिका मांडली. "आमची संस्कृती आणि प्रतिष्ठा यांच्याशी खेळू नका. अशा शब्दात त्यांनी सुनावलं आहे. या महिलेच्या प्रोफाइलवर केवळ 'इंडिया' असा उल्लेख आहे. मात्र तिचे बहुतेक व्हिडिओ गाझियाबाद आणि गुडगावमधील आहेत. सध्या प्रशासनाकडून या प्रकरणाची चौकशी सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.