60 year old hospitalized AI advice: अमेरिकेतील 60 वर्षीय व्यक्ती आपल्या आरोग्याची काळजी घेता घेता थेट मृत्यूच्या दारातून परत आला आहे. त्याने इंटरनेटवर वाचलं की जास्त मीठ (सोडियम क्लोराइड) आरोग्यासाठी हानिकारक आहे. यावर उपाय शोधत असताना त्याने चॅटजीपीटीला विचारलं की मिठाऐवजी काय वापरता येईल. उत्तरामध्ये त्याला सोडियम ब्रोमाइड हे नाव मिळालं, जे त्याने काहीही विचार न करता वापरायला सुरुवात केली. त्याचा भयंकर परिणाम त्याला सहन करावा लागला.
तीन महिने खात राहिला विष
सोडियम ब्रोमाइडचा उपयोग 1900 च्या दशकाच्या सुरुवातीला काही औषधांमध्ये केला जात असे. परंतु जास्त प्रमाणात ते विषारी असल्याचं सिद्ध झालं. या व्यक्तीला याची माहिती नव्हती. त्याने हे रसायन ऑनलाइन मागवलं आणि सुमारे तीन महिने मिठाऐवजी याचा वापर केला. त्याच परिणाम त्याचा शरिरावरही दिसून आला. मात्र त्याची तिव्रता त्याला काही दिवसाने जाणवली. शिवाय त्याचे परिणाम ही भोगावे लागले.
रुग्णालयात दाखल, विचित्र लक्षणं
हळूहळू त्याची तब्येत बिघडू लागली. त्याला खूप तहान लागत होती. पण कोणी दिलेलं पाणी पिण्यावर तो संशय घेऊ लागला. कुटुंबीय आणि डॉक्टरांनाही वाटलं की कोणीतरी त्याला विष दिलं असावं. तब्येत इतकी खराब झाली की त्याला रुग्णालयात दाखल करावं लागलं. तिथे डॉक्टरांना त्याच्या त्वचेवर पुरळ, चेहऱ्यावर गोंधळ, भीती आणि विचित्र विचार अशी लक्षणं दिसली.
'ब्रोमिझम' नावाचा आजार झाल्याचं निदान
तपासणीमध्ये त्याला 'ब्रोमिझम' (sodium bromide poisoning) नावाचा आजार झाल्याचं निदान झालं. जो शरीरात सोडियम ब्रोमाइडचं प्रमाण धोकादायक पातळीपर्यंत वाढल्यामुळे होतो. डॉक्टरांनी त्याला द्रव पदार्थ आणि इलेक्ट्रोलाइट्स दिले. ज्यामुळे त्याची स्थिती सुधारली आणि नंतर त्याला मानसिक आरोग्य विभागात दाखल करण्यात आलं.
AI वर डोळे झाकून विश्वास ठेवणं धोकादायक
मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या केस स्टडीने हे स्पष्ट केलं आहे की AI चॅटबॉटकडून आरोग्याशी संबंधित सल्ला घेणं किती धोकादायक असू शकतं. चॅटजीपीटीने क्लोराइडऐवजी ब्रोमाइड वापरण्याची माहिती दिली, जी कदाचित स्वच्छता किंवा औद्योगिक वापरासाठी होती, पण खाण्यासाठी वापरल्यामुळे ती जीवघेणी ठरली. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, पूर्वीच्या काळात ब्रोमाइडचा वापर निद्रानाश आणि चिंतेच्या औषधांमध्ये होत असे, पण जास्त प्रमाणात त्याचा थेट मेंदू आणि शरीरावर परिणाम होतो.