- एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाचे थायलंडमधील फुकेत विमानतळावर हार्ड लँडिंग झाले
- या अपघातात विमानाचे समोरील चाक तुटले आणि धावपट्टीवर जोरात आदळल्याने मोठा आवाज झाला होता
- विमानातील सर्व 133 प्रवासी सुरक्षित आहेत अशी प्रशासनाची माहिती आहे
Air India Express Flight Hard Landing Video: एअर इंडिया एक्सप्रेसच्या एका विमानाला थायलंडमधील फुकेत विमानतळावर उतरताना भीषण अपघाताचा सामना करावा लागला. लँडिंग दरम्यान विमानाचे 'हार्ड लँडिंग' झाले आहे. ज्यामुळे विमानाचे एक चाक पूर्णपणे निकामी झाले. चाकाचे तुकडे तुकडे झाले. यावेळी वैमानिकाने प्रसंगावधान राखवे. त्यामुळे सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. विमानातील सर्व 133 प्रवासी सुरक्षित असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. पण ज्यावेळी विमानाने लँडींग केले त्यावेळी सर्वांचाच काळजाचा ठोका चुकला होता. विमान लँडिंगवेळचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
एअर इंडियाचे हे विमान 133 प्रवाशांना घेऊन हैदराबादवरून उड्डाण केले होते. हे विमान एअर इंडिया एक्स्प्रेसचे होते. ते थायलंडच्या फुकेत मध्ये जात होते. याच विमानाचा मोठा अपघात टळला आहे. विमान थायलंडमधील फुकेत आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरत होते. त्याच वेळी हा अपघात झाल्याचं समोर आलं आहे. विमानाचं समोरील चाक निखळून पडले. त्याचे तुकडे तुटके झाले. त्यामुळे विमान धावपट्टीवर जोरात आदळले. त्यामुळे जोरदार आवाज झाला. विमानात असलेले सर्व प्रवाशी त्यामुळे घाबरले.
बुधवारी 11 मार्चला ही घटना घडली आहे. चाक निखळल्यानंतर विमान तसेच पुढे गेले. त्यामुळे धावपट्टीचे ही मोठे नुकसान झाले. पण वैमानिकाच्या सतर्कतेमुळे त्याने हार्ड लँडिंग' केले. धावपट्टीचे नुकसान झाल्यामुळे ती काही तासांसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एअर इंडिया एक्स्प्रेस IX938 या विमानाने हैदराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केले होते. थायलंडमधील फुकेतमध्ये बुधवारी ते पोहोचले. पण याच विमानाचे चाक निखळले. या विमानातील 133 प्रवासी नशीब बलवत्तर म्हणून बचावले.
हैदराबादहून निघालेले हे विमान बुधवारी सकाळी 11.40 वाजता पोहचणार होते. पण, ते 11.24 वाजता पोहोचले. हार्ड लँडिंग झाल्यामुळे विमानतळ अधिकाऱ्यांनी तिथली पाहणी केली आहे. तेव्हा समोरील चाक निखळल्याचे आढळून आले. विमानात दोन लहान मुले आणि सात क्रू मेंबर्स होते. फुकेत विमानतळ प्रशासनाने ही धावपट्टी काही काळासाठी आता बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. दुपारी 12.08 पासून ते सायंकाळी 6.00 पर्यंत धावपट्टीवरील विमान बाजूला करण्याचे काम केले जाणार असल्याचे समजते. या विमानातील सर्व प्रवाशी सुरक्षित आहेत.
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले असून तज्ज्ञांचे पथक फुकेतकडे रवाना झाले आहे. एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवक्त्याने सांगितले की, प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत विमानाचे सुरक्षित लँडिंग सुनिश्चित करण्यात आले. विमान धावपट्टीवर स्थिर झाल्यानंतर सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आले. सध्या हे विमान तांत्रिक तपासणीसाठी फुकेत विमानतळावरच थांबवून ठेवण्यात आले आहे. परदेशात झालेल्या या घटनेमुळे एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानांच्या देखभालीबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.