बांगलादेशमध्ये शेख हसीना सरकार सत्तेतून पायउतार झाल्यानंतर अराजकता पसरली आहे. त्याचं ताजं उदाहरण प्रसिद्ध जेशोरेश्वरी मंदिरात दिसलं आहे. सध्या सर्वत्र नवरात्रीची धूम सुरु आहे. बंगाली समाज दुर्गा पूजा उत्सव साजरा करत आहे. त्याचवेळी बांगलादेशमधील सतखीरामधील श्याम नगरच्या जेशोरेश्वरी मंदिरातील कालिका मातेचे (Bangladesh Goddess Kali Crown Stolen मुकूट चोरीला गेला आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पंतप्रधान मोदींनी दिला होता भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा मुकुट भेट दिला होता. मोदी मार्च 2021 मध्ये बांगलादेशच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी जेशोरेश्वरी मंदिरातील देवीचं दर्शन घेऊन हा मुकूट अर्पण केला होता. पण, तो आता चोरीला गेला आहे. 'द डेली स्टार' च्या बातमीनुसार गुरुवारी (10 ऑक्टोबर) रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास चोरीची घटना घडली. मंदिराचे पुजारी दिलीप मुखर्जी पूजा केल्यानंतर घरी गेले होते. त्यावेळी स्वच्छता कर्मचाऱ्यांना हा मुकुट चोरीला गेल्याचं आढळलं. त्यानंतर याची तक्रार पोलिसांमध्ये दाखल करण्यात आली आहे.
( नक्की वाचा : बांगलादेशमधील शेख हसीना सरकार अमेरिकेमुळे पडलं? ऑफर धुडकावण्याची मोजली किंमत! )
पंतप्रधान मोदींनी 27 मार्च 2021 रोजी या मंदिराचं दर्शन घेतलं होतं. त्यांनी या दर्शनाचा व्हिडिओ देखील शेअर केला होता. कोरोना महामारीनंतर पंतप्रधान मोदींचा तो पहिला विदेश दौरा होता.
पंतप्रधान मोदी यांनी मंदिराला चांदीचा मुकुट भेट दिला होता. तो मुकुट सोन्यानं मढवलेला होता. या मुकुटाचं सांस्कृतिक आणि धार्मिक दृष्टीनं मोठं महत्त्व आहे. हिंदू मान्यतेनुसार जेशोरेश्वरी मंदिर हे भारत आणि शेजारी देशांमधील 51 शक्तीपीठांपैकी एक आहे. जेशोरेश्वरीचा अर्थ 'जशोरे ची देवी' असं आहे.
देवीचा मुकुट चोरणाऱ्यांचा तपास सुरु असल्याची माहिती श्यामनगर पोलीस स्टेशनचे निरीक्षक ताइजूल इस्लाम यांनी दिली. चोराला पकडण्यासाठी आम्ही मंदिराचं सीसीटीव्ही फुटेज चेक करत आहोत, असं त्यांनी स्पष्ट केलं.