Bondi beach Shooting VIDEO : ऑस्ट्रेलियामधील सिडनीतल्या बॉन्डी बीचवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. दोन बंदूकधाऱ्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात मोठा गोंधळ निर्माण झाला होता. याच दरम्यान, एका धाडसी नागरिकाने दाखवलेल्या अतुलनीय शौर्यामुळे अनेक लोकांचा जीव वाचला. एका झाडामागे लपलेल्या बंदूकधाऱ्याला त्याने अक्षरशः खाली पाडले आणि त्याची रायफल त्याच्यावरच रोखली. या शौर्याचा 15सेकंदाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
निशस्त्र व्यक्तीच्या धाडसाचा थरार
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, एक निशस्त्र व्यक्ती पार्क केलेल्या कार्सच्या मागे लपलेला दिसतो. तो अचानक मागून धावत येतो आणि एका बंदूकधाऱ्याला मानेतून पकडतो आणि त्याची रायफल हिसकावून घेतो.
ही रायफल हिसकावताच तो बंदूकधारी जमिनीवर कोसळतो आणि त्या 'गुड समारिटन' व्यक्तीने तीच बंदूक त्याच्या दिशेने रोखलेली व्हिडिओमध्ये दिसते. या व्यक्तीच्या धाडसामुळे अनेकांचा जीव वाचल्याची चर्चा आहे.
न्यू साउथ वेल्स (NSW) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या भीषण सामूहिक गोळीबारात एका संशयित शूटरसह एकूण 12 लोकांचा मृत्यू झाला आहे. दुसऱ्या संशयित शूटरची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले. याव्यतिरिक्त, 11 लोक जखमी झाले असून, त्यापैकी दोघे पोलीस अधिकारी आहेत. पोलिसांनी माहिती दिली आहे की, ऑपरेशन सुरू असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, दोन्ही बंदूकधाऱ्यांनी सुमारे 50 राऊंड गोळ्या झाडल्या होत्या. न्यू साउथ वेल्स पोलिसांनी (NSW Police) दुपारी 2:17 वाजता (IST) एक्स (X) वर पहिले अपडेट दिले होते की, ते "घडणाऱ्या घटनेला प्रतिसाद देत आहेत." लोकांनी परिसरापासून दूर राहावे आणि सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, असे आवाहन पोलिसांनी केले होते. "पोलीस घटनास्थळी आहेत आणि अधिक माहिती मिळाल्यावर पुरवली जाईल," असे त्यांनी सोशल मीडियावर लिहिले होते.
( नक्की वाचा : VIDEO: पुतीन यांनी शहबाज शरीफ यांना 40 मिनिटे ताटकळत ठेवले; मग चिडलेल्या पंतप्रधानांनी जे केले, ते पाहून... )
बॉन्डी बीचवर सध्या दोन लोक पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. "पोलीस ऑपरेशन सुरू आहे आणि आम्ही लोकांना परिसरापासून दूर राहण्याचे आवाहन करत आहोत. कृपया पोलिसांच्या सर्व सूचनांचे पालन करा. पोलीस रेषा ओलांडू नका," असे NSW पोलिसांनी एक्सवर लिहिले आहे.
पंतप्रधानांची प्रतिक्रिया आणि ज्यू समुदायाचा संताप
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी बॉन्डीमधील दृश्ये "धक्कादायक आणि त्रासदायक" असल्याचे म्हटले आहे. "पोलीस आणि आपत्कालीन प्रतिसाद देणारे लोक जीव वाचवण्यासाठी काम करत आहेत. ज्यांना या घटनेचा फटका बसला आहे, त्या प्रत्येकासोबत माझ्या सहानुभूती आहेत," असे ते म्हणाले.
"मी नुकतीच एएफपी आयुक्त आणि NSW प्रीमियर यांच्याशी बोललो आहे. आम्ही NSW पोलिसांसोबत काम करत आहोत आणि अधिक माहिती निश्चित झाल्यावर पुढील अपडेट्स देऊ. मी परिसरातील लोकांना NSW पोलिसांच्या माहितीचे पालन करण्याचे आवाहन करतो," असे त्यांनी एका निवेदनात सांगितले.