ऑफिसला जाण्याची इच्छा नसताना अनेकदा अचानक तब्येत बिघडल्याचं कारण सांगून सुट्टी घेतली जाते. मात्र बॉसला तुम्ही मारलेल्या थापा लगेच लक्षात येतात. मात्र थकवा किंवा मूड खराब असतानाही कामावर जायला लागलं तर नक्कीच कामात गोंधळ उडू शकतो. मात्र अशा परिस्थितीत तुम्हाला कंपनीने दहा दिवसांची अतिरिक्त सुट्टी दिली तर? असं झालं तर कोणाला आनंद होणार नाही? नुकतच एका कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क लाइफ बॅलेन्स राखण्यासाठी नव्या प्रकारच्या सुट्टीचा अविष्कार केला आहे.
साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, चायनीज रिटेल टायकूनने कर्मचाऱ्यांचं वर्क-लाइफ-बॅलेन्स अधिक चांगल करण्याच्या हेतूने नवी योजना आणली आहे. चीनच्या एका रिटेल कंपनीचे मालक यू डोंगलाइ यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना खूश करण्यासाठी या विशेष सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. या सुट्ट्या अनहॅपी लिव आहेत ज्या सीएल, पीएल किंवा मेडिकल लिवच्या व्यतिरिक्त आहेत. जर तुम्हाला ऑफिसला येण्याची इच्छा होत नसेल त्यावेळी या सुट्ट्या घेऊन तुम्ही घरीच आराम करू शकता.
यावर डोंगलाइ यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक कर्मचाऱ्याला स्वातंत्र्य मिळावं अशी माझी इच्छा आहे. प्रत्येक कर्मचाऱ्यासोबत असं घडतं की, त्यांना ऑफिसमध्ये येण्याचा मूड नसतो. अशात जर तुम्ही खूष नसाल तर ऑफिसात येण्याची गरज नाही. डोंगलाइ यांनी पुढे स्पष्ट केलं की, व्यवस्थापक कोणत्याही कर्मचाऱ्याला या सुट्ट्या घेण्यास नकार देऊ शकत नाही. असं करणं नियमांच्याविरोधात आहे. आता इतर कंपन्यांही त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपल्या कंपन्यांमध्ये असे प्रयोग करतात का हे पाहणं औत्सुक्याचं आहे.