Chinese president Xi Jinping resignation rumors: जागतिक राजकारणात अमेरिकेला आव्हान देण्याचा सातत्यानं प्रयत्न करणारा देश म्हणजे चीन. भारताच्या या शेजारच्या देशानं गेल्या काही वर्षात झपाट्यानं स्वत:ची शक्ती वाढवली आहे. त्यामुळे जागतिक पटलावर चीनचं महत्त्व वाढलंय. जगाला कोड्यात पाडणाऱ्या गूढ धोरणांसाठी प्रसिद्ध असलेल्या चीनमध्ये आता सत्तापालटाच्या चर्चा सुरु झाली आहे. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या काही हालचाली आणि निर्णय यामुळे या चर्चांना उधाण आलंय.
ब्रिक्सच्या १७ व्या शिखर परिषदेतही ते अनुपस्थित राहिले. त्यांच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात पहिल्यांदाच ते ब्रिक्समध्ये सहभागी झाले नाहीत. त्यातच त्यांनी त्यांच्याकडील अधिकारांचं वाटप केल्याचीही चर्चा सुरू आहे. त्यामुळे शी जिनपिंग हे पायउतार होणार की त्यांना हटवलं जाणार याविषयीची कुजबूज चीनसह जगात सुरु झालीय.
चीनमध्ये सत्तापालट होणार?
चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी अलिकडेच त्यांच्याकडील अधिकारांचं पुनर्वाटप केलं आहे. त्यामुळे त्यांच्या निवृत्तीची चर्चा सुरु झालीय. जिनपिंग यांनी सत्तारुढ कम्युनिस्ट पार्टीमधील सीपीसीमधल्या वेगवेगळ्या गटांना अधिकार दिले आहेत. जिनपिंग हे 12 वर्षांपेक्षा अधिक काळ चीनचे अध्यक्ष आहेत. या कार्यकाळात त्यांनी पहिल्यांदाच असं पाऊल उचललं आहे.
( नक्की वाचा: Nimisha Priya: आई-वडिलांना चांगलं आयुष्य देण्यासाठी परदेशात गेली निमिषा, 16 जुलै रोजी होणार फाशी! )
शी जिनपिंग यांचा तिसरा कार्यकाळ 2027 मध्ये समाप्त होणार आहे. त्याचवर्षी पुढच्या पाच वर्षांसाठी चीनच्या काँग्रेसचं गठन होईल. त्याआधीच जिनपिंग यांनी त्यांच्याकडील अधिकारांचं पुनर्वाटप केल्यानं जागतिक आणि देशांतर्गत त्यांच्या निवृत्तीबाबत चर्चा रंगू लागल्यात. त्यातच जिनपिंग यांनी 30 जूनपासून त्यांचा सार्वजनिक कार्यक्रमांमधला सहभागही मर्यादित केलाय. त्यांच्याबाबतची वार्तांकनं कमी करण्यात आली आहेत. परदेशी मान्यवरांच्या हाय प्रोफाईल भेटीगाठीही पक्षाच्या कनिष्ठ अधिकाऱ्यांकडून हाताळल्या जात आहेत.
ब्राझिलमध्ये पार पडलेल्या ब्रिक्सच्या 17 व्या शिखर परिषदेलाही ते उपस्थित राहिले नाहीत. या परिषदेमध्ये चीनचे पंतप्रधान ली कियांग यांनी देशाचं प्रतिनिधित्व केलं. हे गेल्या 12 वर्षांमध्ये पहिल्यांदाच घडले आहे.
(नक्की वाचा: Operation Sindoor: 'आमच्याकडं फक्त 30 सेकंद...,' ब्राह्मोसमुळे पाकिस्तान का उडाली होती खळबळ? )
सर्वाधिक शक्तीशाली चीनी नेता निवृत्त?
15 जून 1953मध्ये शी जिनपिंग यांचा कट्टर कम्युनिस्ट कुटुंबात जन्म झाला. त्यांचे वडील शी झोंगक्सुन सीपीसी प्रचार विभागाचे प्रमुख होते. जिनपिंग यांनी सिंघुआ विद्यापीठात रासायनिक अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलं. विद्यार्थीदशेपासूनच ते राजकारणात सक्रीय झाले. त्यांनी पक्षाच्या विविध संस्थांमध्ये पदं भूषविली आहेत. शी यांनी झेजियांग, फुजियान आणि शांघाय प्रांतांमध्ये पक्षप्रमुख म्हणून काम केलं. 2012 मध्ये, सीपीसीचे सरचिटणीस म्हणून त्यांची नियुक्ती झाली. त्यानंतर 2013 मध्ये ते चीनचे राष्ट्राध्यक्ष झाले.
शी यांची विचारसरणी मार्क्सवाद-लेनिनवादावर आधारित आहे. त्यांनी सर्व सत्ता स्वत:च्या हातामध्ये केंद्रीत केली. घटनादुरुस्तीद्वारे आजीवन राष्ट्राध्यक्षपद मिळवले. त्यांनी 'बेल्ट अँड रोड' या महत्वाकांक्षी योजनेद्वारे आंतरराष्ट्रीय स्तरावर चीनची भूमिका वाढवण्याचा प्रयत्न केला.
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणाला त्यांनी जशास तसं उत्तर दिल्यानं जगात व्यापारयुद्ध पेटण्यापर्यंत हे संबंध ताणले गेले होते. सध्या अमेरिका आणि चीन यांच्यात व्यापार करावर वाटाघाटी सुरुच आहेत. तर त्यांच्याच कार्यकाळात चीन आणि भारत यांच्यामध्ये 1962 नंतर सर्वात मोठा तणावाचा प्रसंग निर्माण झाला होता.
( नक्की वाचा: Soham Parekh: एकाच वेळी 5 नोकऱ्या, रोज 2.5 लाख कमाई, कोण आहे सोहम पारेख? ज्यानं उडवलीय भारत ते अमेरिका खळबळ! )
गेल्या तीन वर्षांपासून जागतिक संघर्षातही चीननं आपली भूमिका मांडलीय. अगदी अलिकडच्या इराण-इस्रायल संघर्षात मध्यस्थीची तयारीही दाखवली. हे सारं घडत असतानाच शी जिनपिंग यांच्या निवृत्तीच्या चर्चा रंगू लागल्यात.
चीनच्या अध्यक्षपदाची निवडप्रक्रिया कशी असते?
चीनमधील सत्तारुढ कम्युनिस्ट पार्टीच्या सीपीसीची महासभा दर पाच वर्षांनी होते. ऑक्टोबर महिन्यात नॅशनल पीपल्स काँग्रेस भरते. सीपीसीमध्ये एकूण 2300 प्रतिनिधी आहेत. हे प्रतिनिधी त्यांचे 200 सदस्यांची सेंट्रल कमिटी निवडतात. बंद दरावाजाआड ही कमिटी पॉलिट ब्युरो निवडते. पॉलिट ब्युरोमध्ये 25 सदस्य असतात. ते स्थायी समितीच्या सात सदस्यांची निवड करतात. पॉलिट ब्युरो आणि स्थायी समिती पक्षनेत्याची निवड करतात. सीपीसीच्या सरचिटणीसांची नियुक्ती केली जाते. हाच सरचिटणीस देशाचा राष्ट्राध्यक्ष होतो
शी यांचा उत्तराधिकारी कोण?
पीपल्स लिबरेशन आर्मीचे जनरल झांग युक्सिया प्रमुख दावेदार मानले जातात. झांग यांचा शी यांच्या अनेक धोरणांना विरोध आहे. पण, माजी अध्यक्ष हू जिंताओ यांचा पाठिंबा लष्कराशी त्यांचे जवळचे संबंध आहेत. सीपीसीमध्ये झांग यांचा प्रभाव वाढलाय. त्यामुळे त्यांचं नाव जिनपिंग यांचा उत्तराधिकारी म्हणून सर्वात आघाडीवर आहे.
चीनच्या नेतृत्वात बदल झाल्यास भारत-चीन संबंधांवर लक्षणीय परिणाम होऊ शकतो. जिनपिंग यांच्या काळातच गलवान प्रकरण घडलं. त्यानंतर दोन्ही देशांचे संबंध ताणले गेले. सत्ताबदल झाल्यास या संबंधांवर परिणाम होऊ शकतो.
शी जिनपिंग यांच्याबाबत ही अनिश्चितता सध्यातरी चर्चेतच आहे. चीननं याबाबत कोणतंही अधिकृत स्पष्टीकरण दिलेलं नाही.मात्र गेल्या काही दशकांमधला चीनचा हा शक्तिशाली नेता खरंच निवृत्त होणार का आणि जर असं झालं तर चीनसमोर असलेल्या आव्हानांचा नवं नेतृत्व कसा सामना करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.