Dalai Lama: दलाई लामा म्हणजे तिबेटन बौद्ध धर्माचे सर्वोच्च आध्यात्मिक नेते आणि धर्मगुरू...तिबेटी जनतेसाठी ते केवळ धर्मगुरू नाहीत तर ती एक संस्था आहे, एक भावना आहे. दलाई लामांचा 90 वा वाढदिवस सहा जुलैला साजरा होणार आहे. त्याआधी त्यांनी जारी केलेल्या एका निवेदनामुळे चीन आणि तिबेट हा संघर्ष पुन्हा जागा झालाय. लामा यांनी आपला वारसदार कोण होणार याबाबत स्पष्टीकरण दिलंय.
नव्या लामांची नियुक्ती चीन सरकारच्या म्हणण्याप्रमाणेच झाली पाहिजे असं चीनचं म्हणणं आहे. अर्थातच याला तिबेटन बौद्ध धर्माची तयारी नाही. त्यातच दलाई लामांच्या खालोखाल स्थान असलेले पंचेन लामांची निवड चीनी सरकारनं केलीय. 15 वे दलाई लामा निवडण्यासाठी या पंचेन लामांची भूमिकाही महत्त्वाची असते. त्यामुळे पुन्हा एकदा दलाई लामांच्या निवडीवरून सुमारे 75 वर्षांपूर्वीच्या संघर्षाची पुनरावृत्ती होऊ शकते.
( नक्की वाचा : एका फोनमुळे गेली पंतप्रधानांची खुर्ची, कोर्टानं सुनावला मोठा निर्णय )
पुढील दलाई लामा कोण?
दलाई लामा म्हणजे तिबेटन बौद्ध धर्माचे आध्यात्मिक आणि सर्वोच्च धर्मगुरू...तिबेटी बौद्ध धर्मात दलाई लामा यांना करुणामय बुद्धाचा अवतार मानलं जातं. सध्याचे दलाई लामा म्हणजेच त्सेंगिन गायत्सो हे आता 90 वर्षांचे होत आहेत. 6 जुलैला त्यांचा 90 वा वाढदिवस आहे. त्याआधी त्यांनी आपला उत्तराधिकारी कोण होणार याबाबत एक निवेदन जारी केलं.
600 वर्षांची ही संस्था आपल्या मृत्यूनंतरही सुरू राहील दलाई लामांचे कार्यालय गादेन फोडरंग ट्रस्ट निवडीला मान्यता देईल. हा ट्रस्ट दलाई लामांच्या पुनर्जन्माला मान्यता देईल. ही मान्यता देण्याचा अधिकार केवळ या ट्रस्टला आहे. तिबेटी परंपरेनुसारच शोध आणि पुनर्जन्म मान्यता प्रथा पाळली जाईल. इतर कुणालाही यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार असणार नाही, असं निवेदन विद्यमान दलाई लामांनी प्रसिद्ध केलं आहे.
दलाई लामांचं हे निवेदन महत्त्वाचं आहे. कारण 15 वे दलाई लामा कोण होणार? याकडे चीनही बारीक लक्ष ठेवून आहे आणि त्यादृष्टीनं चीननं हालचालीही सुरु केल्या आहेत. चीननं दलाई लामांची नियुक्ती आपल्या परवानगीशिवाय होऊ शकत नाही असं सांगितलं. त्यावर दलाई लामांच्या या निवेदनानं पलटवार केल्याचं मानलं जातंय.
( नक्की वाचा : S Jaishankar : 'मी त्याच रुममध्ये होतो' भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर ट्रम्प यांच्या दाव्याची परराष्ट्र मंत्र्यांकडून चिरफाड )
चीनची काय आहे चाल?
चीननं दलाई लामांच्या निवड प्रक्रियेतील महत्त्वाचे असलेले पंचेन लामांची नियुक्ती करून टाकलीय. ग्यालत्सेन नोरबू यांची पंचेन लामा म्हणून चीननं मागील महिन्यात नियुक्ती केलीय. या नव्या पंचेन लामांनी चीनच्या कम्युनिस्ट पार्टी सरकारला पाठिंबा दर्शवलाय. त्यांनी चीनी सरकार आणि तिबेटी एकतेचं संरक्षण करणार असं सांगत आपली निष्ठी चीनकडे जाहीर केलीय. त्यामुळे तिबेटी समाज अधिक दुखावला गेलाय. दलाई लामांच्या निवड ही एक गुंतागुंतीची प्रक्रिया असते. त्यात हे पंचेन लामा महत्त्वाचे असतात
विद्यमान दलाई लामांची भूमिका काय?
14 वे दलाई लामा यांनी यापूर्वीच यापुढील दलाई लामा हे चीनबाहेरून असतील असे संकेत दिलेत. मार्च 2025 मध्ये प्रकाशित झालेल्या दलाई लामांच्या पुस्तकात, व्हॉईस ऑफ व्हॉईसलेसमध्येही असाच दावा करण्यात आलाय. त्यांनी आपला वारसदार 90 व्या वर्षी जाहीर करू असं सांगितलं होतं. त्यानुसार त्यांनी यंदा आपल्या वाढदिवसाआधी उत्तराधिकारी निवडीचा अधिकार केवळ गादेन फोडरंग ट्रस्टलाच असल्याचं जाहीर केलं त्यामुळे तिबेटवर धार्मिक स्वातंत्र्य प्रस्थापित करू पाहणाऱ्या चीनला ही एक मोठी चपराक मानली जातेय.
दरम्यान, दलाई लामा आणि चीनमधील सध्याच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतानं त्यांच्या सुरक्षेत वाढ केलीय. त्यांना Z+ सुरक्षा पुरवण्यात आलीय. मात्र आता उत्तराधिकारी प्रश्नावरूनही भारताला सावध भूमिकाच घ्यावी लागणार आहे. तर, दुसरीकडे चीन आणि तिबेटी जनता आणि सरकार हे मात्र त्यांच्या भूमिकांवर ठाम आहेत. त्यामुळे आता चीनचा विरोध झुगारून तिबेटी गादेन फोडरंग ट्रस्ट आपली भूमिका कशी पार पाडतंय. चीन तिबेटी बौद्ध धर्मावर आपलं राजकीय वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी कोणता नवा डाव खेळतो. यावर तिबेट-चीन संघर्षाची दिशा ठरणार आहे.