Nobel Peace Prize 2025: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना त्यांच्या सर्वात मोठ्या स्वप्नानं यावर्षी हुलकावणी दिली आहे. नोबेल शांतता पुरस्कार मिळवण्यासाठी ट्रम्प गेल्या काही महिन्यांपासून जोरदार प्रयत्न करत होते. पण, निवड समितीनं त्यांच्याकडं दुर्लक्ष केलं. व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षनेत्या मारिया कोरिना मचाडो (Maria Corina Machado ) यांना यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला आहे. व्हेनेझुएलातील नागरिकांच्या लोकशाही हक्कांना प्रोत्साहन दिल्याबद्दल त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
आपण 8 युद्धे थांबवली असा खोटा दावा ट्रम्प करत होते. भारत आणि पाकिस्तानच्या शस्त्रसंधीबाबतचा त्यांचा दावा साफ खोटा होता. हे भारतानं वेळोवेळी जगासमोर आणलं. गाझामधील (Gaza) इस्रायल (Israel) आणि हमास (Hamas) यांच्यात युद्धबंदीचा करार घडवून आणल्याबद्दल त्यांना जगातील अनेक नेते श्रेय देत आहेत. परंतु, तो करार घडवून आणण्यातही त्यांनी उशीर केला. या करारापूर्वीच नोबेल समितीने आपला विजेता निवडला होता. समितीच्या पाच सदस्यांनी सोमवारी त्यांची अंतिम बैठक घेतली. विजेत्याची निवड सहसा समितीच्या अंतिम बैठकीच्या अनेक दिवस आधी केली जाते.
नोबेल शांतता पुरस्कारासाठी ट्रम्प यांची निवड न होण्याची 5 कारणे
1. नोबेलच्या आदर्शांविरुद्ध धोरणे: ओस्लोच्या पीस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या (Peace Research Institute) प्रमुख नीना ग्रेगर यांच्या मतानुसार, ट्रम्प यांची धोरणे, विशेषतः आंतरराष्ट्रीय सहकार्य, राष्ट्रा-राष्ट्रांमधील बंधुभाव आणि शस्त्रे कमी करण्याला प्रोत्साहन देण्याच्या नोबेलच्या मूळ हेतू आणि अल्फ्रेड नोबेलच्या (Alfred Nobel) मृत्युपत्राच्या विरोधात जातात.
2. आंतरराष्ट्रीय संस्थांपासून फारकत: "अमेरिका फर्स्ट" (America First) या धोरणांवर चालताना, ट्रम्प यांनी अमेरिकेला अनेक महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय संस्था आणि बहुपक्षीय करारांपासून दूर केले, ज्यामुळे जागतिक सहकार्य कमकुवत झाले.
( नक्की वाचा : Nobel Peace Prize 2025: ट्रम्प यांचा पत्ता कट! मारिया कोरिना मचाडो यांना नोबेल; वाचा 'आयर्न लेडी'चा इतिहास )
3. व्यापार युद्ध आणि धमक्या: त्यांनी मित्रपक्ष आणि शत्रू देश, दोघांविरुद्धही व्यापार युद्ध (Trade War) सुरू केले. याव्यतिरिक्त, त्यांनी बळाचा वापर करून डेन्मार्ककडून (Denmark) ग्रीनलँड (Greenland) घेण्याची धमकी देण्यासारखी वादग्रस्त धोरणे राबवली.
4. देशांतर्गत लष्करी हस्तक्षेप: ट्रम्प यांनी अमेरिकेच्या शहरांमध्ये आपले सैन्य पाठवण्याचा प्रस्ताव ठेवला किंवा ही कारवाई केली, ज्यामुळे देशांतर्गत शांतता आणि स्थिरतेच्या संदर्भात चिंता निर्माण झाली.
5. अभिव्यक्ती आणि शैक्षणिक स्वातंत्र्यावर हल्ला: त्यांनी अमेरिकेमध्ये युनिव्हर्सिटीजच्या शैक्षणिक स्वातंत्र्यावर तसेच अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्यावरही (Freedom of Expression) हल्ला केल्याचा आरोप आहे, जो लोकशाही मूल्यांच्या विरोधात आहे.
एएफपीच्या (AFP) अहवालानुसार, इतिहासकार आणि शांतता पुरस्कार तज्ज्ञ एस्ले स्वेन यांनी सांगितले की 2025 च्या पुरस्कार विजेत्याच्या निवडीसाठी गाझा कराराला "बिलकुल महत्त्व नाही" कारण "नोबेल समितीने आपला निर्णय आधीच घेतला होता". "ट्रम्प या वर्षी पुरस्कार जिंकणार नाहीत. मला 100% खात्री आहे, असंही त्यांनी सांगितलं होतं.
अनेक तज्ज्ञ ट्रम्प यांच्या "शांतिदूत" (Peace Envoy) असल्याच्या दाव्यांना अतिशयोक्तीपूर्ण मानतात आणि त्यांच्या "अमेरिका फर्स्ट" धोरणांच्या परिणामांविषयी चिंता व्यक्त करतात. ग्रेगर यांच्या मते, ट्रम्प यांचे कार्य नोबेल शांतता पुरस्काराच्या आदर्शांशी सुसंगत नाही, हे सिद्ध करणारी यादी मोठी आहे. ट्रम्प यांनी अमेरिकेला आंतरराष्ट्रीय संस्था आणि बहुपक्षीय करारांपासून दूर केले आहे.
ट्रम्प यांनी मित्रपक्ष आणि शत्रू देश, दोघांविरुद्ध व्यापार युद्ध सुरू केले आहे. ते बळाचा वापर करून डेन्मार्ककडून ग्रीनलँड घेण्याची धमकी देत आहेत. ते अमेरिकेच्या शहरांमध्ये आपले सैन्य पाठवत आहेत. इतकेच नाही तर ते अमेरिकेमध्ये युनिव्हर्सिटीजच्या शैक्षणिक स्वातंत्र्यावर तसेच अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्यावर हल्ला करत आहेत.