Morocco Spain border conflict: एकाच रात्रीत तब्बल 49,000 नागरिक अचानक समुद्रात पोहून तुमच्या देशाच्या सीमेत घुसले, तर काय होईल? युरोपमध्ये सध्या असाच एक अभूतपूर्व आणि अत्यंत गंभीर प्रकार घडला आहे. उत्तर आफ्रिकेच्या सीमेला लागून असलेल्या सेउटा या स्पॅनिश भूभागात मोरक्कोमधून एकाच वेळी हजारो अवैध स्थलांतरितांनी धडक दिली आहे. या घटनेमुळे स्पेनसह संपूर्ण युरोपियन युनियन हादरले असून, इटली आणि फ्रान्ससारख्या देशांनी थेट आपल्या सीमा बंद करण्याचा इशारा दिला आहे.
समुद्रात पोहून घुसखोरी अन् हिंसाचार
व्हिडिओ फुटेजमध्ये हजारो लोक समुद्राच्या लाटांशी सामना करत थेट किनाऱ्यावर येताना आणि शहरात पसरताना दिसत आहेत. सेउटा शहरात रात्रभर अक्षरशः अफरातफरीचे वातावरण होते. घुसखोरांनी गाड्या पेटवून दिल्या, सरकारी इमारतींमध्ये बळजबरीने घुसण्याचा प्रयत्न केला आणि रस्त्यांवर हिंसाचार केला.
या चकमकीत आणि पळापळीत तब्बल 18 जणांचा मृत्यू झाला आहे, ज्यामध्ये अनेक जण समुद्रात बुडाले तर काही जण सीमेवरील कुंपणावर झालेल्या चेंगराचेंगरीत मारले गेले. सध्या परिस्थिती हाताबाहेर गेल्याने स्पेनने तातडीने तिथे सैन्य तैनात केले आहे.
( नक्की वाचा : NEET Paper Leak: मोबाईल नाही, कॅमेरा नाही... तरीही 'नीट' चा पेपर कसा लीक झाला? CBI तपासात उघड झाली सर्व माहिती)
सुप्रीम कोर्टाचा एक निर्णय अन् युरोप संकटात
या महाकाय घुसखोरीमागे स्पेनच्या सुप्रीम कोर्टाचा एक निकाल कारणीभूत ठरला आहे. या महिन्याच्या सुरुवातीला कोर्टाने निर्णय दिला होता की, समुद्राच्या मार्गाने येणाऱ्या स्थलांतरितांना कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता तातडीने सीमेबाहेर हाकलून देता येणार नाही. मात्र, जमिनीवरून (कुंपण ओलांडून) येणाऱ्यांना थेट परत पाठवता येईल. या कायदेशीर त्रुटीचा फायदा घेत हजारो लोकांनी थेट समुद्रातून पोहून स्पेन गाठले.
इटली अन् फ्रान्सकडून कडक कारवाईचा इशारा
स्पेन हा युरोपियन युनियनचा आणि शेंगेन कराराचा भाग आहे. म्हणजेच, एकदा स्पेनमध्ये प्रवेश मिळाला की कोणतीही व्यक्ती कोणत्याही व्हिसाशिवाय संपूर्ण युरोपमध्ये कुठेही जाऊ शकते. यामुळेच इटलीच्या पंतप्रधान जिओर्जिया मेलोनी यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
या दोन्ही देशांनी स्पेनसोबतची खुली सीमा बंद करण्याचे संकेत दिले आहेत. तर दुसरीकडे, फ्रान्सनेही स्पेनच्या सीमेवर तातडीने कडक तपासणी आणि सुरक्षा दले तैनात करण्याचे निर्देश दिले आहेत.
( नक्की वाचा : तुकाराम मुंढेंच्या FDA चा दुटप्पीपणा कोर्टात उघडा! दुटप्पी कारभारावर उच्च न्यायालयाचा चाबूक, काय झाली चूक? )
सेउटा अन् मेलिला: युरोपची आफ्रिकेतील दोन शहरे
सेउटा आणि मेलिला ही स्पेनची आफ्रिका खंडात वसलेली दोन स्वायत्त शहरे आहेत. आफ्रिका आणि युरोप खंडाला जोडणारी ही एकमेव भुसीमा आहे. सुमारे 80,000 लोकसंख्या असलेले सेउटा 1580 पासून स्पेनच्या ताब्यात आहे, मात्र मोरक्को यावर आपला दावा सांगतो. गरिबी, हिंसाचार आणि युद्ध यापासून वाचण्यासाठी आफ्रिकेतील लाखो लोक युरोपमध्ये चांगल्या आयुष्याच्या शोधात जाण्यासाठी या शहरांचा मुख्य मार्ग म्हणून वापर करतात.
मेलिला शहरातही आणीबाणीची स्थिती
सेउटातील हिंसाचारानंतर अवघ्या काही तासांत शेजारच्या मेलिला शहरातही 300 ते 400 मोरक्कोच्या नागरिकांनी सीमा ओलांडली. त्यामुळे स्पेनने मोरक्कोसोबतची बेनी-एंजा सीमा पूर्णपणे सील केली आहे. स्थानिक प्रशासनाने या परिस्थितीला पूर्णपणे मानवी आणि सामाजिक आणीबाणी घोषित केले असून, संपूर्ण स्पेनच्या इमिग्रेशन कायद्यात तात्काळ बदल करण्याची मागणी केली आहे. 2015 नंतर युरोपसमोरील हे सर्वात मोठे स्थलांतरितांचे संकट मानले जात आहे.