फेसबुक आणि इंस्टाग्रामचा सध्या सर्रास वापर होतो. त्यात मोठ्यांपासून लहानांपर्यंत सर्वच जण असतात. विशेष म्हणजे यात अल्पवयीन मुलांचा मोठा समावेश असतो. ही अल्पवयीन मुलं तर फेसबुक-इंस्टाग्रामच्या प्रचंड आहारी गेले आहेत. त्यातून अनेक गैर प्रकार ही होतात. हे टाळावे म्हणून आता मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे. त्यानुसार 16 वर्षाखालील मुलांना यापुढे फेसबुक-इंस्टाग्राम वापरता येणार नाही. शिवाय या वयातल्या मुलांची फेसबुक-इंस्टाग्राम अकाऊंट असतील ती कंपनीच डिलीट करणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या पुढे सोळा वर्षा खालील मुलांना फेसबुक-इंस्टाग्राम वापरता येणार नाही.
हा निर्णय ऑस्ट्रेलिया सरकारने घेतला आहे. 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरासाठी बंदी घालणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 10 डिसेंबर 2025 पासून लागू होणाऱ्या या नियमांनुसार, 16 वर्षांखालील मुलं फेसबुक, इंस्टाग्राम, एक्स (ट्विटर), टिकटॉक, यूट्यूब, रेडिट आणि स्नॅपचॅट यांसारखे प्लॅटफॉर्म वापरू शकणार नाहीत. सोशल मीडियाच्या अतिवापराने मुलांच्या मानसिक आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम आणि ऑनलाइन सुरक्षेची वाढती गरज लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
या कायद्याचे पालन करण्याची प्राथमिक जबाबदारी थेट सोशल मीडिया कंपन्यांवर टाकण्यात आली आहे. नवीन नियमांनुसार, कंपन्यांना त्यांच्या प्लॅटफॉर्मवर 'एज व्हेरिफिकेशन' म्हणजेच वयाची पडताळणी करणारी यंत्रणा लागू करावी लागेल. जर कोणत्याही कंपनीने या नियमांचे उल्लंघन केले, तर त्यांना 50 दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलरपर्यंत म्हणजेच जवळपास 275 कोटी रुपये ऐवढा मोठा दंड भरावा लागू शकतो. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी या धोरणाचा उल्लेख 'प्रभावशाली' असा केला आहे. यामुळे कुटुंबांवरील ताण कमी होऊन सायबर हल्ले आणि वाईट कंटेंटच्या वापरामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर नियंत्रण मिळवता येईल.
हा निर्णय विशेषतः तरुणांच्या मानसिक आरोग्याच्या समस्या कमी करण्यावर केंद्रित आहे. अनेक अभ्यासातून असे सिद्ध झाले आहे की, सोशल मीडियाच्या अतिवापराने तरुण युजर्समध्ये चिंता (Anxiety) आणि आत्मसन्मानाची कमतरता (Low Self-Esteem) यांसारख्या समस्या वाढतात. नवीन वयोमर्यादा निश्चित करून सरकार मुलांच्या कल्याणाला प्राधान्य देत आहे. तसेच मुलांना ऑनलाइनऐवजी 'ऑफलाइन' संवाद आणि सामाजिक विकासासाठी प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, व्हीपीएन (VPN) किंवा चुकीची माहिती देऊन काही युजर्स बंदीनंतरही सोशल मीडिया वापरू शकतात, हे आव्हान कायम आहे.