UAE Leaves OPEC: जागतिक तेल बाजारपेठेत सध्या एका मोठ्या भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. आखाती देशांमधील सर्वात प्रभावशाली देशांपैकी एक असलेल्या संयुक्त अरब अमिरातीने (UAE) खनिज तेल उत्पादक देशांची बलाढ्य संघटना असलेल्या 'ओपेक' (OPEC) आणि 'ओपेक प्लस'मधून बाहेर पडण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. गेल्या 59 वर्षांपासून या संघटनेचा महत्त्वाचा भाग असलेला युएई आता स्वतंत्रपणे तेलाचे राजकारण करणार असल्याने, भारतात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
59 वर्षांची जुनी साथ नेमकी का तुटली?
युएई हा 1967 पासून ओपेकचा सक्रिय सदस्य होता. मात्र, गेल्या काही काळापासून युएई आणि सौदी अरेबिया यांच्यात तेल उत्पादनाच्या मर्यादेवरून मतभेद होते. युएईकडे तेल काढण्याची प्रचंड क्षमता आहे आणि त्यांना आपले उत्पादन वाढवून अधिक नफा कमवायचा आहे. परंतु, ओपेकच्या नियमांमुळे युएईवर उत्पादनावर मर्यादा घालण्यात आल्या होत्या. आपली आर्थिक प्रगती वेगाने करण्यासाठी आणि जागतिक बाजारपेठेत आपली पकड मजबूत करण्यासाठी युएईने हा धाडसी निर्णय घेतल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
'स्ट्रेट ऑफ होर्मुज'चा पेच
युएईचा हा निर्णय अशा वेळी आला आहे जेव्हा आखाती देशांमध्ये युद्धाचे ढग दाटले आहेत. इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. विशेषतः 'स्ट्रेट ऑफ होर्मुज' या सागरी मार्गावर सध्या मोठी टाळेबंदी सदृश परिस्थिती आहे. जगातील एकूण गरजेच्या 20 टक्के कच्चे तेल याच मार्गावरून वाहतूक केले जाते. सध्याच्या तणावामुळे तेल वाहून नेणाऱ्या जहाजांना अडथळा निर्माण झाला असून, पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. अशा अस्थिर वातावरणात युएईने ओपेकमधून बाहेर पडणे हे जागतिक राजकारणाला नवीन वळण देणारे ठरू शकते.
( नक्की वाचा : 10 वर्षांचा प्लॅन अन् पोत्यात लपवलेली मुलं! उत्तर कोरियाच्या हुकूमशहाला असं गुंगारा देऊन पळालं 9 जणांचं कुटुंब )
भारत आणि जागतिक अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होणार?
भारतासाठी ही बातमी संमिश्र स्वरूपाची आहे. भारत आपल्या गरजेच्या 80 टक्क्यांहून अधिक कच्चे तेल आयात करतो. जर युएईने ओपेकच्या बंधनांशिवाय मोठ्या प्रमाणावर तेल उत्पादन सुरू केले, तर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी होऊ शकतात. याचा थेट फायदा भारतीय ग्राहकांना स्वस्त पेट्रोल आणि डिझेलच्या रूपात मिळू शकतो.
मात्र, दुसऱ्या बाजूला ओपेक संघटनेत फूट पडल्यामुळे जागतिक तेल बाजारात मोठी अनिश्चितता निर्माण होण्याची भीती आहे. इराण-इस्रायल संघर्ष आणि अमेरिकेची भूमिका यामुळे येणाऱ्या काळात तेलाचे भाव नेमके कोणत्या दिशेला जातील, यावर संपूर्ण जगाचे अर्थकारण अवलंबून आहे.
( नक्की वाचा : 60 फूट खोल खड्डा आणि 50 तासांचा थरार! 20 वर्षांपूर्वी मृत्यूला हरवणारा Borewell Boy 'प्रिन्स' आता काय करतो? )
डिझेल आणि पेट्रोलच्या दरात दिलासा मिळणार?
युएई हा भारताचा जवळचा मित्र देश आहे. ओपेकमधून बाहेर पडल्यानंतर युएई भारताला सवलतीच्या दरात किंवा अधिक प्रमाणात तेल पुरवठा करण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसे झाले, तर भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा आधार मिळेल आणि महागाईवर नियंत्रण मिळवणे सोपे जाईल. मात्र, आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थिती निवळल्याशिवाय तेलाच्या दरांबाबत कोणताही ठोस अंदाज वर्तवणे सध्या कठीण आहे.