Saudi Arabia Visa Ban : हज यात्रेची तारीख जवळ येत असताना सौदी अरेबियानं भारतासह 14 देशांच्या नागरिकांना व्हिसा जारी करण्यास तात्पुरती बंदी घातली आहे. सौदीनं जून 2025 पर्यंत उमराह, व्यापार आणि कौटुंबिक व्हिसा देण्यास बंदी घातली आहे. हज यात्रेच्या कालावधीपर्यंत ही बंदी कायम राहणार आहे.
सौदी अरेबियानं व्हिसावर बंदी घातलेल्या देशांमध्ये भारत, पाकिस्तान, बांगलादेश, इजिप्त, इंडोनेशिया, इराक, नायजेरिया, जॉर्डन, अल्जेरिया, सुदान, इथियोपीया, ट्युनेशिया, येमेन आणि मोरोक्को या 14 देशांचा समावेश आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
का घेतला निर्णय?
योग्य रजिस्ट्रेशनशिवाय हज यात्रेला जाणाऱ्या नागरिकांना रोखण्यासाठी सौदी अरेबियानं हा निर्णय घेतला आहे. अर्थात उमराह व्हिसा असणाऱ्या नागरिकांना 13 एप्रिलपर्यंत सौदी अरेबियात प्रवेश करता येणार आहे.
अनेक विदेशी नागरिक उमराह यात्रेच्या व्हिसावर सौदी अरेबियात प्रवेश करतात. त्यानंतर अधिकृत प्राधिकरणाशिवाय हज यात्रेमध्ये अवैध पद्धतीनं अधिक काळ राहतात. त्यामुळे देशात गर्दी आणि उष्णता वाढत आहे, हे प्रकार रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती या रिपोर्टमध्ये देण्यात आली आहे. 2024 मध्ये हज यात्रेच्या दरम्यान या पद्धतीनं घडलेल्या एका दुर्घटनेत किमान 1200 यात्रेकरुंचा मृत्यू झाला होता.
( नक्की वाचा : Hajj 2025 मुलांच्या प्रवेशापासून ते यात्रेकरुंपर्यंत, सौदी अरेबियानं हज यात्रेच्या नियमात केले हे बदल! )
सौदी अरेबियानं प्रत्येक देशातील हज यात्रेकरुंसाठी कोटा निश्चित केला आहे. पण, या यात्रेकरु बेकायदेशीर पद्धतीनं या कोट्याचं उल्लंघन करतात. या प्रकरणाचं उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर भविष्यात पाच वर्ष प्रवेश बंदीची कारवाई केली जाऊ शकते, अशी माहिती या रिपोर्टमध्ये देण्यात आली आहे.
या निर्णयाचा राजनैतिक व्हिसावर कोणताही परिणाम होणार नाही, अशी माहिती सौदी सरकारच्या हज आणि उमराह मंत्रालयानं दिली आहे. हा निर्णय केवळ भाविकांच्या यात्रेच्या सोयीसाठी तसंच योग्य व्यवस्थापन करण्यासाठी घेतला आहे, असं त्यांनी स्पष्ट केला. यंदा हज यात्रा 4 ते 9 जूनच्या दरम्यान होणार आहे.