हमासच्या राजकीय आघाडीचा प्रमुख इस्माईल हानियाची हत्या झाल्यानं जगभरातील अनेक देशांना धक्का बसला आहे. इस्रायलवर 7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासनं हजारो क्षेपणास्त्रानं हल्ला केला होता. या हल्ल्यात 1200 निरापराधांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्याचं नियोजन हानियानं केलं होतं. इराणच्या सुक्षेत असलेल्या हमास प्रमुखांच्या हत्येचं इस्रायलनं कसं नियोजनं केलं होतं, त्याबाबत नवीन माहिती समोर आली आहे. ही माहिती एखाद्या क्राईम थ्रिलरपेक्षा कमी नाही.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
2 महिन्यांपूर्वीच नियोजन
60 दिवसांपूर्वीच लपवला होता बॉम्ब
हानियाच्या हत्येसाठी तेहरानच्या गेस्ट हाऊसमध्ये दोन महिन्यांपूर्वीच बॉम्ब ठेवल्याचा दावा अमेरिकेनं केला आहे. अमेरिकन मीडिया हाऊस न्यूयॉर्क टाईम्स, 2 इराणी आणि 1 अमेरिकन अधिकाऱ्यासह पश्चिम आशियातील 75 अधिकाऱ्यांनी हा दावा केला होता. हानिया थांबला होता त्या गेस्ट हाऊसमध्ये 60 दिवसांपूर्वीच बॉम्ब लपवण्यात आल्याचा या सर्वांचा दावा आहे. नेशात नावाच्या गेस्ट हाऊसच्या सुरक्षेची जबाबदारी इराणी सेना IRGC वर होती.
त्या दिवशी काय झालं?
हानियाच्या हत्येची सविस्तर योजना आखण्यात आली होती, असं मानलं जात आहे. सुरुवातीला हानियाचं संपूर्ण वेळापत्रक पाहण्यात आलं. तो कुठं जाणार आणि कुठं थांबणार याची माहिती काढण्यात आली होती. ती माहिती एकत्र झाल्यानंतरच त्याची हत्या करण्यात आली.
हमास प्रमुख इस्माईल हानिया इराणच्या नव्या अध्यक्षांच्या शपथविधी कार्यक्रमातून परतला होता. तो नेशात कॉम्पलेक्समधील VVIP गेस्ट हाऊसमध्ये उतरला होता. हानिया त्या गेस्ट हाऊसमध्ये परतला. त्याच्या बेडवर आरामात बसला. त्यावेळी मृत्यू त्याची वाट पाहात होता. त्याच्या भोवती सावलीसारखे असणाऱ्या बॉडीगार्ड्सनाही काही करता आलं नाही. कुणीतरी बाहेरुन एका रिमोटनं बटन दाबलं आणि रुममध्ये लपवण्यात आलेला बॉम्ब उडला. त्यामध्ये हानिया आणि बॉडीगार्ड दोघंही ठार झाले. हा स्फोट इतका जबरदस्त होता की त्यामुळे खोलीच्या खिडक्या आणि काचा फुटल्याच. त्याचबरोबर भिंत देखील कोसळली. हानियाला स्वत:ला वाचवण्याची एकही संधी मिळाली नाही.
(नक्की वाचा: इस्रायलच्या सर्वात मोठ्या शत्रूची इराणमध्ये हत्या ! वाचा कोण होता हमासचा प्रमुख Ismail Haniyeh? )
रात्री 2 वाजता फुटला बॉम्ब
या स्फोटाबाबत पश्चिम आशियातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार इराणी वेळेनुसार रात्री 2 च्या सुमारास हा स्फोट झाला. या स्फोटाचा आवाज ऐकताच गेस्ट हाऊसचे कर्मचारी पळत रुममध्ये दाखल झाले. या स्फोटाची माहिती मिळताच तेहरानमध्ये उपस्थित असलेला हमासचा डेप्युटी कमांडर खलील-अल-हया तातडीनं घटनास्थळी दाखल झाला. इराणी अधिकाऱ्यांनी त्यांचा सर्वोच्च अधिकारी अयातुल्ला अली खोमेनी यांनाही मध्यरात्रीच या स्फोटाची माहिती दिली.
हत्येला कोण जबाबदार?
हमास प्रमुखाच्या मृत्यूला इस्रायल जबाबदार असल्याचा थेट आरोप इराणनं केला आहे. हानियाच्या हत्येनंतर इराण संतापला आहे. इराणच्या सर्वोच्च नेत्यानं या हत्येचा बदला घेण्यासाठी थेट हल्ला करणार असल्याचं जाहीर केलं आहे. दुसरिकडं इस्रायल या आव्हानासाठी तयार आहे. पंतप्रधान नेतन्याहू यांनी त्याचे संकेत दिले आहेत. आगामी कालखंड आव्हानात्मक असेल, आम्ही त्यासाठी तयार आहोत, असं नेतन्याहू यांनी स्पष्ट केलंय.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'हानिया तेहरानमधील या गेस्ट हाऊसमध्ये यापूर्वी अनेकदा उतरला होता. कडेकोट सुरक्षा व्यवस्था असलेल्या गेस्ट हाऊसमध्ये झालेली ही हत्या इराणची गुप्तचर यंत्रणा आणि सुरक्षा एजन्सीसाठी मोठा धक्का आहे. हानिया जिथं मारलं गेला ती जागा गुप्त बैठकींसाठी तसंच खास पाहुण्यांच्या मुक्कामासाठी वापरली जात असे. त्या ठिकाणी बॉम्ब कसा लपवला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
हानियाच्या संरक्षणाची जबाबदारी इराणच्या सैन्यावर होती. त्यांना 2 महिने या हल्ल्याचा सुगावा कसा लागला नाही? या हल्ल्याच्या मागे इराण तर नाही ना? असे प्रश्नही आता विचारले जात आहेत. हानियाचा मृत्यू हा हमाससाठी मोठा धक्का आहे.