Hormuz Strait Crisis: जगातील कच्च्या तेलाच्या पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारी होर्मुझची समुद्रधुनी सध्या मोठ्या संकटात सापडली आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव निवळण्यासाठी शांतता चर्चा सुरू झाली असली, तरी एक मोठी तांत्रिक अडचण समोर आली आहे. इराणने युद्धाच्या काळात या जलमार्गात जे समुद्री सुरुंग पेरले होते, ते आता त्यांना स्वतःलाच शोधता येत नसल्याचे समोर आले आहे. यामुळे हा मार्ग जहाजांसाठी पूर्णपणे खुला करणे इराणला कठीण जात आहे.
सुरुंग पेरले पण जागा विसरले
'न्यूयॉर्क टाइम्स'ने अमेरिकन अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, इराणने गेल्या महिन्यात अमेरिका आणि इस्रायलच्या हवाई हल्ल्यानंतर घाईघाईत होर्मुझच्या समुद्रधुनीत छोटे सुरुंग पेरले होते. मात्र, हे सुरुंग नेमके कुठे ठेवले आहेत याची कोणतीही ठोस नोंद इराणकडे नसल्याची माहिती आहे. काही ठिकाणी सुरुंग अशा पद्धतीने लावले होते की ते प्रवाहाच्या दिशेने वाहून गेले आहेत. यामुळे आता हे सुरुंग शोधणे आणि ते निष्क्रिय करणे इराणच्या सुरक्षा दलांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
जगाच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होणार?
होर्मुझच्या समुद्रधुनीमधून जगातील एकूण तेलाच्या पुरवठ्यापैकी साधारण 25 टक्के व्यापार चालतो. भारतासाठी तर हा मार्ग अधिक महत्त्वाचा आहे कारण भारताची 80 टक्के ऊर्जा गरज याच मार्गावरून पूर्ण होते.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा मार्ग तातडीने खुला करण्याचा इशारा दिला होता. इराणने युद्धविराम मान्य केला असला तरी, तांत्रिक अडचणीमुळे हा मार्ग बंद राहिल्यास जागतिक बाजारपेठेत तेलाच्या किमती वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
( नक्की वाचा : US-Iran War: 15 दिवसांसाठी थांबलं युद्ध...आता इराणनं 40 दिवसांपासून लपवलेलं सर्वात मोठं रहस्य संपणार! )
इराणकडून पर्यायी मार्गाची घोषणा
आपल्याच तांत्रिक चुकीमुळे अडकलेल्या इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने आता जहाजांसाठी नवीन सूचना जारी केल्या आहेत. मुख्य मार्गावर समुद्री सुरुंगांची धडक बसण्याची भीती असल्याने जहाजांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे इराणने म्हटले आहे.
जहाजांच्या सुरक्षेसाठी प्रवेश आणि बाहेर पडण्यासाठी नवीन मार्ग निश्चित करून देण्यात आले आहेत. मात्र, तरीही मुख्य जलमार्ग जोपर्यंत पूर्णपणे सुरक्षित होत नाही, तोपर्यंत आंतरराष्ट्रीय व्यापारावर याचे सावट कायम राहणार आहे.
( नक्की वाचा : Pune News : 25 लाख रुपये, बुधवार पेठेची रुम आणि एक कपल... रुपाली ठोंबरेंच्या आरोपानं पुण्यात खळबळ! )
इस्लामाबादमधील चर्चेवर टांगती तलवार
अमेरिका आणि इराणमध्ये इस्लामाबाद येथे होणारी शांतता चर्चा आता या नव्या संकटामुळे कठीण होण्याची शक्यता आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला स्पष्ट ताकीद दिली होती की त्यांनी हा महत्त्वाचा जलमार्ग त्वरित सुरू करावा. मात्र इराणला ते शक्य होत नसल्याने चर्चेत पुन्हा अडथळे येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.