India-Venezuela Oil Deal: पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम तुमच्या खिशावर होऊ लागला आहे.तु मचं रोजचं बजेट आणखी कोलमडणार अशी भीती असतानाच आता भारतासाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील अनिश्चितता यातून कायमची सुटका होण्याची चिन्हे दिसत आहेत.
भारत आता इंधनासाठी केवळ रशिया किंवा आखाती देशांवर अवलंबून राहणार नाही, कारण जगातील सर्वात मोठा तेलाचा साठा असलेल्या देशासोबत भारताची एक मोठी डील होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या एका करारामुळे भारताचे ऊर्जा क्षेत्रातील चित्र संपूर्णपणे बदलू शकते.
संकट काळात भारताला नवा आधार
मध्य पूर्व आशियात सध्या इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक तेल पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. विशेषतः होर्मुजच्या सामुद्रधुनीतील तणावामुळे भारताच्या तेल आयातीवर टांगती तलवार होती. अशा परिस्थितीत भारताने आपल्या तेल आयात करणाऱ्या देशांच्या यादीत एका महत्त्वाच्या नावाचा समावेश केला आहे, तो देश म्हणजे वेनेजुएला.
वेनेजुएलाच्या अंतरिम राष्ट्रपती डेल्सी रोड्रिगेज आजपासून 3 ते 7 जून या काळात भारत दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात दोन्ही देशांमध्ये इंधन आणि गुंतवणुकीबाबत अनेक मोठे करार होण्याची शक्यता आहे.
तेलाचा महासागर आणि भारताची भूमिका
वेनेजुएला हा जगातील असा देश आहे जिथे तेलाचा प्रचंड साठा आहे. सध्याच्या जागतिक संकट काळात भारत वेनेजुएलाच्या तेलाचा दुसरा सर्वात मोठा खरेदीदार बनला आहे. रॉयटर्सच्या एका अहवालानुसार, मे 2026 पर्यंत भारताने वेनेजुएलाकडून दररोज 427,000 बॅरल तेल खरेदी केले आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजसारख्या भारतीय खासगी कंपन्यांनीही या देशातून तेल खरेदी करण्यात आघाडी घेतली आहे. अमेरिकेनंतर भारत हा वेनेजुएलाचा सर्वात मोठा ग्राहक बनला असून, या दौऱ्यामुळे हे संबंध अधिक घट्ट होणार आहेत.
होर्मुजच्या कटकटीतून कायमची सुटका
खाडी देशांमध्ये जेव्हा जेव्हा युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते, तेव्हा होर्मुज सामुद्रधुनीतून होणारा तेल पुरवठा धोक्यात येतो. मात्र, वेनेजुएलाकडून तेल खरेदी केल्यास भारताला या मार्गाची गरज उरणार नाही. दक्षिण अमेरिकेतील हा देश भारताला तेल पुरवण्यासाठी एक सुरक्षित पर्याय ठरत आहे.
पश्चिम आशिया कितीही मोठा संघर्ष झाला, तरी वेनेजुएलाचा तेल पुरवठा खंडित होणार नाही, ही भारतासाठी सर्वात मोठी जमेची बाजू आहे. विशेष म्हणजे वेनेजुएलातील सत्तापालटानंतर आता अमेरिकेच्या निर्बंधांची भीतीही कमी झाली आहे.
सहकार्याचे नवे पर्व
राष्ट्रपती डेल्सी रोड्रिगेज यांच्यासोबत वेनेजुएलाचे अर्थ, विज्ञान, तंत्रज्ञान आणि दळणवळण क्षेत्रातील मंत्रीही भारत दौऱ्यावर आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी होणाऱ्या चर्चेत केवळ तेलच नाही, तर आरोग्य सेवा, फार्मास्युटिकल्स, वाहतूक आणि अक्षय ऊर्जा यांसारख्या विषयांवरही सविस्तर चर्चा होणार आहे. भारताच्या वाढत्या गरजा पाहता, हा दौरा देशाच्या भविष्यातील अर्थव्यवस्थेसाठी एक मैलाचा दगड ठरू शकतो.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world