- इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांची सुरक्षा अत्यंत कडक होती
- अमेरिका आणि इस्रायलने ३० शक्तिशाली बंकर बस्टर बॉम्बांचा वापर करून हल्ला केला
- या हल्ल्यात खामेनेईंसह त्यांचे कुटुंबीय आणि ४० वरिष्ठ लष्करी अधिकारी जागीच ठार झाले आणि बंकर उद्ध्वस्त झाला
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांची सुरक्षा इतकी कडक होती की, त्यांच्या अंडरग्राउंड बंकरपर्यंत पोहोचण्यासाठी लिफ्टला 5 मिनिटे लागायची. मात्र, अमेरिका आणि इस्रायलने या अभेद्य किल्ल्यालाही सुरुंग लावला. या मोहिमेत 'GBU-28 लेझर गाईडेड पेनिट्रेटर' सारख्या 30 शक्तिशाली बंकर बस्टर बॉम्बचा वापर करण्यात आला. हे बॉम्ब जमिनीच्या खोलवर घुसून स्फोट घडवतात, ज्यामुळे काँक्रीट आणि स्टीलचे कवचही निकामी ठरले.तेहरानच्या लाविजान भागातील हा संपूर्ण परिसर या भीषण बॉम्बवर्षावात उद्ध्वस्त झाला. याच हल्लात खामेनेई यांचा मृत्यू झाला.
खामेनेईंच्या हालचालींवर मोसाद आणि सीआयएचे एजंट अनेक महिन्यांपासून लक्ष ठेवून होते. खामेनेई शनिवारी तीन महत्त्वाच्या बैठकांसाठी जमिनीच्यावरच्या थरातील बंकरमध्ये येणार असल्याची पक्की माहिती गुप्तचरांना मिळाली होती. याच संधीचा फायदा घेत इस्रायली विमानांनी दिवसाढवळ्या हा हल्ला केला. या एअरस्ट्राइकमध्ये खामेनेई यांच्यासह त्यांचे कुटुंबीय आणि इराणचे 40 वरिष्ठ अधिकारी जागीच ठार झाले.
अयातुल्ला अली खामेनेई यांच्या बंकरमध्ये जाण्यासाठी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या डोळ्यांवरही पट्टी बांधली जायची. तो बंकर आता सिमेंटचा ढिगारा बनला आहे. अमेरिका आणि इस्रायलने शनिवारी सकाळी केलेल्या धडाकेबाज कारवाईत खामेनेईंचा खात्मा केला. सुमारे 30 बंकर बस्टर बॉम्बनी या पाताळातल्या किल्ल्याचे तुकडे केले. सॅटेलाइट फोटोंमध्ये आता तिथे फक्त धुराचे लोट आणि ढिगारा दिसत आहे. अमेरिका आणि इस्रायलने या दिवसाची अनेक दिवस वाट पाहीली. खामेनेईची सुरक्षा भेदणे हे तिकेसे सोपे नव्हते. पण ते शेवटी अमेरिका आणि इस्रायलने करून दाखवले.
इस्रायली चॅनेल 12 च्या माहितीनुसार, या हल्ल्यात केवळ खामेनेईच नाही, तर त्यांचे जावई, मुलगी आणि नातवंडांचाही मृत्यू झाला आहे. इराणच्या नॅशनल सिक्युरिटी कौन्सिलचे सचिव अली लारिजानी आणि अली शामखानी यांच्याशी चर्चा करून खामेनेई वरच्या बंकरमध्ये पोहोचले होते. त्याच वेळी मृत्यूने त्यांच्यावर झडप घातली. मोसादच्या गुप्तचरांनी खामेनेईंच्या सुरक्षा गराड्यात इतकी खोलवर घुसखोरी केली होती की, त्यांच्या बैठकीची वेळ आणि जागा याची अचूक माहिती अमेरिकेला मिळाली होती.
या हल्ल्यात इराणच्या लष्करी आणि राजकीय नेतृत्वाचे कंबरडे मोडले आहे. 40 वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांचा मृत्यू हा इराणसाठी गेल्या अनेक दशकांतील सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. बंकरच्या आत असलेल्या बोगद्यांच्या जाळ्यामुळे खामेनेईंना सुरक्षित वाटत होते, पण अमेरिकेच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने आणि बंकर बस्टर बॉम्बनी त्यांचा हा विश्वास मोडीत काढला. इराणमधील 36 वर्षांच्या सत्तेचा असा भीषण अंत होईल, अशी कोणालाही कल्पना नव्हती.