Maha Kumbh Mela 2025: प्रयागराजमधील गंगा, यमुना आणि सरस्वती नदीच्या त्रिवेणी संगमावर महाकुंभ मेळ्याला सोमवारपासून (13 जानेवारी) सुरुवात झाली आहे. 2025 मधील सर्वात मोठा धार्मिक उत्सव म्हणून महाकुंभमेळ्याकडं पाहिलं जात आहे. तब्बल 40 कोटी भाविक या मेळ्यात पवित्र स्नान करतील अशी अपेक्षा आहे.
14 जानेवारी म्हणजेच मकर संक्रातीच्या दिवशी महाकुंभमेळ्यात अमृत स्नान पार पाडलं. त्यामध्ये 3.5 कोटी भाविक सहभागी झाले होते, अशी माहिती उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पाकिस्तानमध्ये सर्वाधिक कुतूहल
महाकुंभमेळ्याच्या निमित्तानं प्रयागराकडं जगभरातील भाविकांची पावलं वळत आहेत. त्याचवेळी इंटरनेटवरही याबबत मोठ्या प्रमाणात सर्च केले जात आहे. महाकुंभमेळ्याबाबत गुगल सर्च करणाऱ्या देशांमध्ये पाकिस्तानचा क्रमांक पहिला आहे.
डॉन, द एक्स्प्रेस ट्रिब्यून, पाकिस्तान टुडे या प्रमुख पाकिस्तानी वृत्तपत्रानं महाकुंभमेळ्या संदर्भातील बातम्यांचं वृत्तांकन केलं आहे. या वृत्तपत्रातील बातम्या आणि लेखांमधून सामान्य पाकिस्तानी नागरिकांचं महाकुंभ मेळ्याबाबतचं कुतुहल वाढलं आहे. त्याबाबत अधिक जाणून घेण्यासाठी ते महाकुंभबाबत अधिक सर्च करत आहेत. पाकिस्तानमधील प्रसिद्ध YouTubers ने देखील महाकुंभबाबतच्या प्रतिक्रिया शेअर केल्या आहेत. त्या माध्यमातूनही पाकिस्तानी नागरिक महाकुंभबाबत अधिक माहिती जाणून घेत आहेत.
( नक्की वाचा : Mahakumbh Mela 2025 : महाकुंभमेळ्यात कधी होणार शाही स्नान? वाचा संपूर्ण वेळापत्रक आणि महत्त्व )
पाकिस्तान खालोखाल कतार, संयुक्त अरब अमिराती म्हणजेच (UAE), बहरीन या इस्लामी देशांमध्येही महाकुंभबाबत मोठ्या प्रमाणात सर्च केले जात आहे. त्याचबरबोर नेपाळ, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, आयर्लंड, ब्रिटन, थायलंड आणि अमेरिका देशांमध्ये महाकुंभ 2025 बाबत केल्या जाणाऱ्या सर्चचं प्रमाण गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. जगभरातील सर्व प्रमुख वृत्तपत्रांनी देखील महाकुंभमेळ्याची दखल घेतली आहे.
सिंधू संस्कृतीचा धागा
भारत आणि पाकिस्तान या देशांमध्ये राजकीय वैर मोठ्या प्रमाणात आहेत. पण या देशाला हजारो वर्ष जुन्या सिंधू संस्कृतीनं जोडलं आहे. बारा कुंभमेळ्यानंतर म्हणजेच 144 वर्षांनी यंदा प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा होत आहे. यापूर्वी महाकुंभमेळा झाला होता त्यावेळी पाकिस्तान हा भारताचाच भाग होता. भारताची फाळणी आणि त्या फाळणीनंतर झालेल्या पाकिस्तानच्या निर्मितीनंतर पहिल्यांदाच महाकुंभमेळा होत आहे.
भारतामधील कुंभमेळ्याच्या सनातन परंपरेला अनेक आयाम आहेत. त्यामध्ये पवित्र नदीकाठच्या संस्कृतीचा उत्सव हे देखील एक महत्त्वाचा आयाम आहे. पाकिस्तानी नागरिकांनाही याची जाणीव आहे. महाकुंभाच्या निमित्तानं भारतीय परंपरा, सनानतन संस्कृती याबात जाणून घेण्याची त्यांची उत्सुकता वाढली आहे.
इतक्या कमी कालावधीमध्ये भारतामध्ये कोट्यावधी भाविक शांतपणे एकत्र येतात. त्यांची सर्व व्यवस्था केली जाते. जगभरातील निष्णात मॅनेजमेंट तज्ज्ञांना देखील जमणार नाहीत, अशा गोष्टी महाकुंभमध्ये सहजपणे केल्या जात आहेत. भारतीय परंपरेची ही शक्ती पाहून सारं जग आचंबित झालं आहे. भारतापासून सर्वच बाबतीत कोसो मैल मागं असलेलं आणि एकेकाळी आपलाच भाग असलेल्या पाकिस्तान देशात याबाबत सर्वाधिक उत्सुकता नसेल तर नवलच.