Lishalliny Kanaran : मलेशियामध्ये एका भारतीय वंशाच्या अभिनेत्री आणि दूरदर्शन निवेदकाने एका हिंदू पुजाऱ्यावर आशीर्वाद देण्याच्या बहाण्याने आपली छेडछाड केल्याचा आरोप केला आहे. 'साउथ चायना मॉर्निंग पोस्ट'नुसार, ही घटना गेल्या महिन्यात सेपांग येथील मरियमम्मन मंदिरात घडली. 2021 च्या मिस ग्रँड मलेशियाची विजेती लिशालीनी कानारन हिने सोशल मीडियावर पोस्ट करत हा आरोप केला आहे. तो पुजारी भारतीय नागरिक असून भारतातून आणलेले पवित्र पाणी अंगावर टाकून अयोग्य रितीनं स्पर्श केल्याचा आरोप कानारननं केला आहे.
काय आहे प्रकरण?
सेपांग जिल्ह्याचे पोलीस प्रमुख एसीपी नोरहिझाम बहामन यांनी 'एससीएमपी'ला सांगितले की, "संशयित व्यक्ती हा एक भारतीय नागरिक असून, मंदिरात उपस्थित पुजारी नसताना तो तात्पुरता पूजा करत होता, अशी माहिती आहे. ." नोरहिझाम पुढे म्हणाले, "तो प्रथम पीडितेच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर पवित्र पाणी शिंपडायचा आणि त्यानंतर तिची छेडछाड करत असे.''
( नक्की वाचा: Nimisha Priya: आई-वडिलांना चांगलं आयुष्य देण्यासाठी परदेशात गेली निमिषा, 16 जुलै रोजी होणार फाशी! )
काय दिली धमकी?
कानारनने तिच्या पोस्टमध्ये दावा केला आहे की, तपास अधिकाऱ्याने तिला या हल्ल्याची माहिती सार्वजनिक करू नये अशी धमकी दिली होती, 'तू हे केलेस, तर ती तुझी चूक असेल आणि तुलाच दोष दिला जाईल.' असं या अधिकाऱ्यानं सांगितल्याचा दावा कानरानने या पोस्टमध्ये केला. पण, तिने त्यांचा सल्ला न मानता इन्स्टाग्रामवर या घटनेचे भयंकर तपशील शेअर केले.
कानारनने आरोप केला की, 21 जून रोजी तिची आई भारतात असल्यामुळे ती एकटीच मंदिरात गेली होती. ' तिथे एक पुजारी आहे जो मला नेहमी विधींमध्ये मार्गदर्शन करतो, कारण मी या सर्वांमध्ये नवीन आहे. मला जास्त काही माहिती नाही आणि त्याच्या मदतीची मी नेहमीच प्रशंसा केली आहे." तिने पुढे लिहिले, "त्या दिवशी, मी प्रार्थना करत असताना, तो माझ्या जवळ आला आणि मला म्हणाला की त्याच्याकडे काही पवित्र पाणी आणि संरक्षणासाठी एक धागा आहे तो मला बांधणार आहे; हा आशीर्वाद आहे, असे तो म्हणाला. त्याने मला प्रार्थनेनंतर त्याला भेटायला सांगितले."
त्यानंतर अभिनेत्रीने पुजाऱ्यासाठी एक तासाहून अधिक वेळ वाट पाहिली, कारण पुजारी इतर भक्तांना आशीर्वाद देत होता. त्याने तिला त्याच्या खाजगी कार्यालयात घेऊन जाण्यास सांगितले, जिथे त्याने तिची छेडछाड केली.
( नक्की वाचा: Xi Jinping : शी जिनपिंग लवकरच पद सोडणार? गूढ हलचालींमुळे चर्चेला उधाण! कट्टर विरोधक होणार अध्यक्ष? )
ब्लाऊजमध्ये हात घातला....
कानारनने दावा केला की, पुजाऱ्याने प्रथम तिच्यावर "खूप तीव्र वास असलेले द्रव" शिंपडले, जे तिच्या डोळ्यात गेले आणि नंतर त्याने तिच्या छातीला स्पर्श केला. त्याने तिला कपडे काढायला सांगितले, "हे 'माझ्या भल्यासाठी' आहे असे तो आग्रह करत होता," पण कानरानने याला नकार दिल्यानंतर तो पुजारी तिला घट्ट कपडे घातल्याबद्दल रागावले.
पुजारी तिच्या मागे उभा राहिला आणि तिने आपल्या ब्लाऊजमध्ये हात घालून अयोग्य रीतीने स्पर्श करण्यास सुरुवात केली, तेव्हा परिस्थिती आणखी वाईट झाली होती, असं कानारनने या पोस्टमध्ये लिहिले आहे. "तो म्हणाला की जर मी त्याच्यासोबत 'ते' केले तर तो 'आशीर्वाद' असेल कारण तो देवाची सेवा करतो." तिने पुढे म्हटले, "माझ्या मेंदूला त्या क्षणाबद्दल सर्व काही चुकीचे आहे हे माहिती होते, तरीही मी हलू शकले नाही. मी बोलू शकले नाही. मी गोठून गेले. आणि मला अजूनही समजत नाही की असे का झाले."
कानारननं 4 जुलै रोजी पुजाऱ्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली. तथापि, तिने सांगितले की जेव्हा ते मंदिरात गेले, तेव्हा पुजारी आधीच पळून गेला होता. "त्याच्याविरुद्ध यापूर्वीही कोणीतरी याच कारणास्तव तक्रार केली होती, तरीही कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती," असे तिने म्हटले, मंदिर व्यवस्थापनावर स्वतःचे नाव वाचवण्यासाठी या प्रकरणावर पांघरूण घालण्याचा आणि तिला मदत न केल्याचा आरोप केला.
मलेशियाई पोलिसांनी पुजाऱ्याचा शोध घेण्यासाठी मोहीम सुरू केली आहे.