लंडन हादरलं! अज्ञाताकडून लोकांवर तलवारीने सपासप वार; लहानग्याचा मृत्यू-अनेकजण जखमी

London Viral Video : व्हायरल व्हिडीओमध्ये एक व्यक्ती रस्त्यावर हातामध्ये तलवार घेऊन उतरल्याचे दिसत आहे. याने अनेकांवर तलवारीने हल्ला केला. या घटनेत जखमी झालेल्या लोकांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

London Viral Video : ब्रिटनची राजधानी लंडनमधील (London) हेनॉल्ट परिसरामध्ये मंगळवारी (30 एप्रिल 2024) अज्ञात व्यक्तीने लोकांवर तलवारीने सपासप वार केले. या घटनेत 13 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी झाल्याची माहिती समोर आहे. जखमींना औषधोपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान हल्लेखोराला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच ही घटना दहशतवादाशी संबंधित नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.  

न्यूज एजन्सी AFPच्या रिपोर्ट्सनुसार, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयिताने रस्त्यावरील अनेक लोकांवर आणि दोन अधिकाऱ्यांवरही धारदार तलवारीने हल्ला केला. याप्रकरणी 36 वर्षीय व्यक्तीला घटनास्थळावरून अटक करण्यात आली आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये संबंधित व्यक्ती घराजवळील रस्त्यावर हातामध्ये तलवार घेऊन फिरताना दिसत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "हल्ल्यामध्ये जे लोक जखमी झाले आहेत, त्यांच्यासाठी ही अतिशय भयावह घटना होती. लोकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पण हा दहशवादी हल्ला होता, असे आम्हाला वाटत नाही".

(नक्की वाचा: पोलिसांची मोठी कारवाई, गोदिंयामध्ये उधळून लावला बालविवाह)

ब्रिटनचे गृहसचिव जेम्स क्लेव्हरली यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर पोस्ट करत म्हटले की, "मंगळवारी सकाळी हेनॉल्ट परिसरात घडलेल्या घटनेबाबत मला माहिती दिली गेली. हल्ल्यातील पीडितांसोबत माझ्या सहवेदना आहेत."  

Advertisement

लंडनच्या महापौरांनी व्यक्त केले दुःख

लंडनचे महापौर सादिक खान यांनी म्हटले की, "ही घटना दुःखदायक आहे. मी पोलीस आयुक्तांच्या संपर्कात आहे. पोलीस स्टेशन आणि आपत्कालीन सेवेमध्ये कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांनी चांगले काम केले. त्यांनी वेळीच कारवाई करत लोकांचे प्राण वाचवले. याबाबत मी त्यांचे आभार मानू इच्छितो."

Advertisement

मागील आठवड्यात पंतप्रधान ऋषी सुनक यांनी ब्रिटनच्या राजधानीमध्ये झालेल्या चाकू हल्ल्यावरून महापौर सादिक खान यांच्यावर सडकून टीका केली होती.  

(नक्की वाचा: पतीला थाटायचा होता दुसरा संसार, पहिल्या पत्नीला जीवे मारण्यासाठी रचला असा डाव)

चाकू हल्ल्यांमध्ये 20 टक्क्यांनी वाढ

अधिकृत आकडेवारीनुसार वर्ष 2023मध्ये लंडनमध्ये चाकू हल्ल्याच्या घटनांमध्ये 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या कालावधीमध्ये एकूण 14 हजार 577 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, इंग्लंड आणि वेल्समध्ये चाकू हल्ल्याच्या घटनांमध्ये सात टक्क्यांनी वाढ झाली आहे. येथे एकूण 49 हजार 489 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे, यातील बहुतांश घटना या महानगरीय भागामध्ये घडल्या आहेत. 

VIDEO: मोदींचा वर्मावर घाव, 'भटकती आत्मा' च्या टीकेला राष्ट्रवादीचं प्रत्युत्तर

Topics mentioned in this article