अनेकांना वेगवान गाडी चालवण्याची आवड असते. अशा लोकांना जर मोकळा रस्ता मिळाला, तर ते किती वेगात गाडी चालवतील? कदाचित खूप झाले तर 150 किमी प्रति तास वेगाची मर्यादा ओलांडतील. पण जर कोणी 300 किमी प्रति तास वेगापेक्षाही जास्त वेगाने गाडी चालवत असेल, तर? तुम्हाला विश्वास बसणार नाही ना. हो हे शक्य आहे. तसं एका व्यक्तीने करून दाखवलं आहे. पण त्याचा फटकाही त्याला बसला आहे.
ही घटना जर्मनीमध्ये घडली आहे. जर्मन पोलिसांनी सांगितले की, बर्लिनच्या पश्चिमेकडील ऑटोबान (महामार्ग) वर एका वाहनचालकाला 320 किमी प्रति तास (199 मैल प्रति तास) पेक्षा जास्त वेगाने गाडी चालवताना पाहिले गेले. या महामार्गावरील 200 किमी प्रति तास (124 मैल प्रति तास) वेगाच्या मर्यादेपेक्षा खूप जास्त आहे.
सीएनएनच्या रिपोर्टनुसार, वाहनचालकाची ओळख पटलेली नाही. त्याला 28 जुलै रोजी बर्गजवळील A2 महामार्गावर 320 किमी प्रति तास वेगाने गाडी चालवताना रेकॉर्ड करण्यात आले. रिपोर्टनुसार, मॅगडेबर्ग पोलिस ऑफिसने मंगळवारी सांगितले की, चालकावर 900 युरो (भारतीय चलनात सुमारे 91 हजार रुपये) दंड आकारण्यात आला आहे. त्याल केवळ पैशाचाच दंड करण्यात आला नाही तर अन्य कारवाई ही त्याच्यावर करण्यात आली आहे.
नक्की वाचा - India - Pakistan : अरबी समुद्रात तणाव, भारत-पाकिस्तानचे नौदल आमने-सामने! इशारा जारी...
याशिवाय, त्याच्या ड्रायव्हिंग लायसन्सवर दोन पॉइंट कमी करण्यात आले आहेत. शिवाय तीन महिन्यांसाठी गाडी चालवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या एका रडार स्टँडने या वाहनचालकाला नियमित तपासणीत पकडले होते. पोलिसांनी सांगितले की, त्याच्या डिस्प्लेवरील रीडिंगमध्ये 321 किमी प्रति तास "सर्वात जास्त रेकॉर्ड वेग" दिसला. त्यामुळे त्याला ताब्यात घेण्यात आले. शिवाय त्याच्यावर कारवाई करण्यात आली.