Who is Hridayendra Shah? : नेपाळमध्ये गेल्या काही दिवसांपासून राजकीय अस्थिरता आणि अराजकतेचे वातावरण आहे. देशाची सत्ता कोणाच्या हातात येणार, हे अद्याप निश्चित झालेले नाही, पण याचदरम्यान नेपाळमध्ये पुन्हा राजेशाही परत आणण्याच्या मागणीने जोर धरला आहे. विशेषतः राजधानी काठमांडूमध्ये आंदोलनादरम्यान "राजा आउनुपर्छ" (राजा आला पाहिजे) असा नारा जोरदारपणे घुमत आहे. या मागणीच्या केंद्रस्थानी आहेत नेपाळच्या राजघराण्याचे सर्वात तरुण सदस्य, युवराज हृदयेंद्र शाह. Gen Z पिढीचे असूनही ते चर्चेत का आहेत आणि त्यांची नेमकी कथा काय आहे, हे जाणून घेऊया.
राजघराण्याचा सर्वात तरुण वारस
हृदयेंद्र शाह हे माजी राजा ज्ञानेंद्र आणि राणी कोमल यांचे नातू आहेत. त्यांचा जन्म 30 जून 2002 रोजी काठमांडूमधील शाही नारायणहिती पॅलेसमध्ये झाला. 2001 मध्ये झालेल्या राजघराण्यातील हत्याकांडानंतर त्यांचा जन्म झाल्याने, राजेशाहीच्या समर्थकांना त्यांच्याकडून मोठ्या आशा आहेत.
2008 मध्ये नेपाळमध्ये राजेशाही संपुष्टात येण्याआधी, त्यांचे आजोबा राजा ज्ञानेंद्र यांनी त्यांना भावी राजा म्हणून घोषित केले होते. त्यावेळी पारस शाह यांना बाजूला सारून त्यांच्या मुलाला वारसदार बनवण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते, पण पारस यांची खराब प्रतिमा हे त्याचे एक प्रमुख कारण मानले जाते.
कोण आहेत हृदयेंद्र शाह?
- पूर्ण नाव: हृदयेंद्र बीर बिक्रम शाह देव
- जन्म: 30 जून 2002, काठमांडू येथील शाही नारायणहिती पॅलेसमध्ये
- आई-वडील: माजी प्रिन्स पारस शाह आणि हिमानी शाह
- आजोबा-आजी: माजी राजा ज्ञानेंद्र आणि राणी कोमल
- भावंडे: दोन बहिणी (पूर्णिका शाह आणि कृतिका शाह)
परदेशात शिक्षण आणि शांत स्वभाव
हृदयेंद्र यांनी काठमांडूमधील लिंकन स्कूलमधून प्राथमिक शिक्षण घेतले आणि त्यानंतर अमेरिकेतील बोस्टनमधून उच्च शिक्षण घेतले. त्यांचा बराचसा काळ सिंगापूर आणि थायलंडमध्येही गेला आहे. त्यांना नेपाळी राजकारणापासून दूर ठेवण्यासाठी हा निर्णय घेतला गेल्याचे मानले जाते.
( नक्की वाचा : Nepal Protest : फक्त एका ‘नाही' मुळे नेपाळ भारताबाहेर राहिले, अन्यथा आज...ऐतिहासिक सत्याची Inside Story )
हृदयेंद्र सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये फारसे दिसत नाहीत, पण ते सोशल मीडियावर, विशेषतः इन्स्टाग्रामवर सक्रिय असतात. त्यांच्या शांत आणि विनम्र स्वभावामुळे ते लोकांमध्ये लोकप्रिय आहेत.
नेपाळला युवराजाची गरज का?
राजेशाहीच्या समर्थकांना हृदयेंद्र शाह यांच्यामध्ये अनेक सकारात्मक गोष्टी दिसतात. ते तरुण, सुशिक्षित आणि राजकीय वादांपासून दूर आहेत. काही लोकांना त्यांच्यामध्ये नेपाळचे लोकप्रिय राजा बीरेंद्र यांची प्रतिमा दिसते. हृदयेंद्र यांच्या व्यक्तिमत्वात शाही वारसा आणि आधुनिकतेचा संगम आहे, असं त्यांचं मत आहे. त्यामुळे त्यांची लोकप्रियता वाढत आहे. सध्याची राजकीय अस्थिरता आणि नेपाळच्या नेत्यांवरील वाढलेला अविश्वास यामुळे अनेक नागरिक पुन्हा एकदा राजेशाहीकडे आशेने पाहत आहेत. याच कारणामुळे हृदयेंद्र शाह यांच्यासारख्या शांत आणि स्वच्छ प्रतिमेच्या युवराजाला भावी राजा म्हणून पाहण्याची मागणी जोर धरत आहे.
माजी राजे ज्ञानेंद्र शाह कुठे आहेत?
हृदयेंद्र यांचे आजोबा आणि नेपाळचे शेवटचे राजा ज्ञानेंद्र शाह सध्या एका सामान्य नागरिकाप्रमाणे जीवन जगत आहेत. ते काठमांडूमधील त्यांच्या निर्मल निवासमध्ये राहतात, पण अलीकडील काळात ते शहरातील बाहेरील नागार्जुन येथील फार्महाऊसवर जास्त वेळ घालवतात. मार्च 2024 मध्ये राजेशाहीच्या समर्थनात झालेल्या आंदोलनादरम्यान ते पोखरा येथून काठमांडूला आले होते, तेव्हा हजारो लोकांनी त्यांचे भव्य स्वागत केले होते. त्यांच्या या उपस्थितीमुळे राजेशाहीच्या समर्थकांना अधिक बळ मिळाले आहे.
या सर्व घडामोडी पाहता, नेपाळचे भविष्य कोणत्या दिशेने जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.