Nepal Foreign Minister Arzu Rana Deuba
- नेपाल के सेना प्रमुख अशोक राज सिगडेल ने लगातार दूसरे दिन हिंसक प्रदर्शन रुकवाने और वार्ता की अपील की है.
- प्रदर्शनकारियों ने पूर्व पीएम शेर बहादुर देउबा और उनकी पत्नी आरजू राणा पर हमला किया और नुकसान पहुंचाया.
- प्रदर्शनकारियों ने देउबा दंपति को कुछ समय के लिए बंधक बनाया और आरजू राणा कहां हैं किसी को कुछ नहीं मालूम.
नेपाळमध्ये पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी राजीनामा देऊनही हिंसक निदर्शने सुरूच आहेत. मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशीही हा हिंसाचार कायम राहिला. या हिंसक निदर्शनांदरम्यान, आंदोलकांनी माजी पंतप्रधान शेर बहादूर देउबा आणि त्यांच्या पत्नी, परराष्ट्र मंत्री आरजू राणा देउबा यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात देउबा यांच्या चेहऱ्यातून रक्त येत असल्याचे व्हिडिओंमध्ये दिसत आहे. आरजू राणा देउबा सध्या कुठे आहेत, याबाबत कोणालाही माहिती नाही, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
देशातील हिंसाचारानंतर नेपाळचे लष्करप्रमुख अशोक राज सिगडेल यांनी दूरदर्शनवरून राष्ट्राला संबोधित केले. त्यांनी आंदोलकांना शांततेचे आवाहन करत चर्चेसाठी पुढे येण्याची विनंती केली.
(नक्की वाचा- Nepal Protest : नेपाळमध्ये आंदोलकांचा हैदोस; माजी PM च्या पत्नीचा होरपळून मृत्यू, अर्थमंत्र्यांवर हल्ला, Video)
देउबा यांच्या निवासस्थानाची तोडफोड
मंगळवारी काठमांडूतील बुदानिलकंठा येथे असलेल्या देउबा यांच्या निवासस्थानाची आंदोलकांनी तोडफोड केली. हल्ल्याच्या व्हिडिओंमध्ये देउबांच्या चेहऱ्यातून रक्त येत असल्याचे दिसत आहे. अधिकाऱ्यांच्या मदतीपूर्वीच त्यांच्या घराचे मोठे नुकसान झाले होते. देउबा यांच्या पत्नी आरजू राणा देउबा यांच्यावरही आंदोलकांनी हल्ला केला. समोर आलेल्या व्हिडिओंमध्ये आंदोलक त्यांना लाथांनी मारताना दिसत आहेत.
अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करण्याआधी आंदोलकांनी या दांपत्याला काही काळ ओलिस ठेवले असल्याचाही अंदाज आहे. लष्कराने देउबा यांचा जीव वाचवला असला तरी, आरजू कुठे आहेत याची माहिती अद्याप मिळालेली नाही. त्यांना आंदोलक सोबत घेऊन गेल्याचे बोलले जात आहे.
(नक्की वाचा : Nepal PM Resigns : नेपाळमध्ये ‘Gen-Z' आंदोलनाचा मोठा झटका, पंतप्रधान केपी ओलींनी दिला राजीनामा )
माजी पंतप्रधानांच्या पत्नीचा होरपळून मृत्यू
मंगळवारी संतापलेल्या तरुणांनी अनेक राजकीय नेत्यांच्या घरांना, कॅबिनेट मंत्र्यांना आणि सरकारी इमारतींना आग लावली. यामध्ये अनेक राजकीय पक्षांची कार्यालये आणि पोलीस ठाण्यांचीही तोडफोड झाली आहे. आणखी एक माजी पंतप्रधान झलनाथ खनाल यांच्या घरालाही आग लावण्यात आली, ज्यात त्यांच्या पत्नी राज्यलक्ष्मी चित्रकार गंभीररित्या भाजल्या आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
ओली यांच्या राजीनाम्यानंतरही नेपाळमध्ये हिंसाचार सुरूच आहे. आंदोलकांनी संसदेचे घर, राष्ट्रपती निवास, पंतप्रधान निवास, सर्वोच्च न्यायालय आणि अनेक वरिष्ठ नेत्यांच्या घरांना आग लावली आहे.