Nepal PM KP Oli Resigns : नेपाळमध्ये सुरू असलेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान केपी ओली यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आंदोलक सुरुवातीपासूनच पंतप्रधान ओली यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते. मात्र, NDTV सोबतच्या विशेष मुलाखतीत ओली सरकारच्या एका मंत्र्याने पंतप्रधान ओली आपल्या पदाचा राजीनामा देणार नाहीत, असे सांगितले होते. पण त्यांच्या या वक्तव्यानंतर काठमांडूमधील आंदोलक अधिक हिंसक झाले आणि त्यांनी राष्ट्रपती भवनपासून पंतप्रधान ओली यांच्या घरापर्यंत जाळपोळ केली.
तरुणांच्या आंदोलनाचा वाढलेला जोर पाहूनच पंतप्रधान ओली यांना त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा लागला, असे म्हटले जात आहे. सरकारविरोधात आंदोलन करणारे तरुण मंगळवार सकाळपासून देशाच्या सध्याच्या सरकारऐवजी अंतरिम सरकार स्थापन करण्याची मागणी करत होते.
हिंसक आंदोलनात 19 जणांचा मृत्यू
या हिंसक आंदोलनात आतापर्यंत 19 तरुणांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांच्या गोळीबारात सुमारे 400 आंदोलक जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. या आंदोलनाची खास गोष्ट म्हणजे यात सर्व पक्षांच्या नेत्यांना लक्ष्य केले जात आहे आणि त्यांच्या कार्यालयांवर हल्ले होत आहेत.
( नक्की वाचा : Nepal Protests : नेपाळमधील असंतोषाचे खरे कारण काय? सोशल मीडिया बंदी फक्त निमित्त; Inside Story )
यापूर्वी आंदोलकांनी 8 सप्टेंबरच्या संध्याकाळी CPN-UML च्या कार्यालयाला आग लावली होती. याव्यतिरिक्त, माजी पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड, राष्ट्रपती रामचंद्र पौडेल, शेर बहादूर देउबा, गृहमंत्री रमेश लेखक आणि संचार मंत्री पृथ्वी सुब्बा गुरुंग यांच्या घरांवरही तोडफोड आणि जाळपोळ झाली. कम्युनिस्ट पक्षाच्या अध्यक्षांच्या घराचीही मोठ्या प्रमाणात तोडफोड झाली.
नेपाळमधील अनेक सेलिब्रिटींनीही आंदोलकांना त्यांचा पाठिंबा दिला आहे. सरकारला तरुणांच्या भावनांचा आदर करायला हवा, असे त्यांचे म्हणणे आहे. या आंदोलनात 20 ते 25 वर्षांचे तरुण सर्वात जास्त आहेत, म्हणूनच याला Gen-Z आंदोलन म्हटले जात आहे.
भारताची भूमिका काय?
नेपाळच्या या प्रकरणावर भारताकडूनही अधिकृत निवेदन आले. यात भारताने म्हटले आहे की, नेपाळमधील परिस्थितीवर भारताची नजर आहे. परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, आंदोलनात तरुणांचा मृत्यू होणे दु:खद आहे. या समस्या शांततापूर्ण संवादातून सोडवल्या पाहिजेत.