Nepal Protest : नेपाळमध्ये ‘जनरेशन झेड' (Gen-Z) तरुणांनी सुरू केलेल्या आंदोलनाला आता हिंसक वळण लागले आहे. या आंदोलनादरम्यान माजी पंतप्रधान झलनाथ खनाल यांच्या घरावर हल्ला करून त्याला आग लावण्यात आली. या हल्ल्यात गंभीर भाजलेल्या खनाल यांच्या पत्नी राज्यलक्ष्मी चित्रकार यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे आंदोलनातील मृतांची संख्या 19 वर पोहोचली आहे.
नेमकं काय घडलं?
दल्लू येथील त्यांच्या निवासस्थानी आंदोलनकर्त्यांनी त्यांना घरातच घेरले आणि आग लावली, अशी माहिती समोर आली आहे. आग लागली तेव्हा राज्यलक्ष्मी चित्रकार आपल्या मुलगा निर्भीक खनाल सोबत घरात होत्या. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना सुरुवातीला कीर्तिपूर येथील बर्न हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. या हल्ल्यापूर्वी नेपाळी लष्कराने माजी पंतप्रधान झलनाथ खनाल यांना सुरक्षित बाहेर काढले होते.
या घटनेबाबत अधिकाऱ्यांनी अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी केलेले नाही.
पंतप्रधानांचा राजीनामा
या हिंसक आंदोलनामुळे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनीही राजीनामा दिला आहे. गेल्या वर्षी त्यांच्या कम्युनिस्ट पक्षाने डाव्या-उजव्या आघाडी सरकारची स्थापना केली होती आणि ते चौथ्यांदा पंतप्रधान झाले होते. आंदोलकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केल्यानंतर आंदोलन थांबवण्याचे प्रयत्न अयशस्वी झाल्याने त्यांनी अखेर राजीनामा दिला. या आंदोलनात आतापर्यंत 19 जणांचा मृत्यू झाला आहे.
( नक्की वाचा : Nepal PM Resigns : नेपाळमध्ये ‘Gen-Z' आंदोलनाचा मोठा झटका, पंतप्रधान केपी ओलींनी दिला राजीनामा )
अर्थमंत्र्यांवर हल्ला
हे आंदोलन सोमवारी, 8 सप्टेंबर रोजी सुरू झाले. सुरुवातीला सोशल मीडियावरील बंदी हटवणे आणि देशातील भ्रष्टाचार संपवणे, अशा दोन प्रमुख मागण्या होत्या. सरकारने अनेक ॲप्सवरील बंदी उठवल्यानंतरही आंदोलन थांबले नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी, 9 सप्टेंबर रोजी अनेक आंदोलकांनी संचारबंदीचे नियम मोडले.
यादरम्यान, नेपाळचे अर्थमंत्री बिष्णू प्रसाद पौडेल यांना काठमांडूच्या रस्त्यांवरून पळताना आंदोलकांनी मारहाण केली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये 65 वर्षांचे पौडेल रस्त्यावर धावत असताना एका आंदोलकाने त्यांना लाथ मारून खाली पाडले.
या आंदोलनात शुक्रवार, 5 सप्टेंबर रोजी नेपाळ सरकारने फेसबुक, यूट्यूब आणि एक्स (X) सारख्या अनेक सोशल मीडिया साइट्सवर बंदी घातली होती. मात्र, 'टिकटॉक' (TikTok) वर बंदी नव्हती. बंदीनंतर, 'टिकटॉक'वर सामान्य नेपाळी लोकांच्या अडचणी आणि राजकीय नेत्यांच्या मुलांच्या महागड्या वस्तू व परदेशी सुट्ट्यांचे व्हिडीओ व्हायरल झाले, ज्यामुळे आंदोलन अधिक तीव्र झाले.