Nobel Peace Prize 2025: नोबेल शांतता पुरस्काराबद्दल सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून, यंदाचा हा प्रतिष्ठित पुरस्कार व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षनेत्या मारिया कोरिना मचाडो यांना जाहीर झाला आहे. माजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना हा पुरस्कार मिळेल, अशी चर्चा होती, पण नोबेल समितीने ट्रम्प यांचा पत्ता कट केला. 'व्हेनेझुएलाची आयर्न लेडी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मारिया मचाडो यांना त्यांच्या देशातील हुकूमशाहीविरुद्ध लोकशाही हक्कांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि न्यायपूर्ण लोकशाही संक्रमणासाठी केलेल्या धाडसी कार्यासाठी हा पुरस्कार जाहीर केलाय. विशेष म्हणजे 'NDTV मराठी' नं यापूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांना पुरस्कार मिळणार नाही, असं स्पष्ट केलं होतं. हे विश्लेषण अचूक ठरलंय.
कोण आहेत मारिया कोरिना मचाडो? (Who is Maria Corina Machado )
मारिया कोरिना मचाडो यांना व्हेनेझुएलातील लोकांच्या लोकशाही अधिकारांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि हुकूमशाहीतून न्यायपूर्ण, शांततापूर्ण लोकशाही संक्रमण घडवण्यासाठी केलेल्या त्यांच्या धाडसी कार्यासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
'न्यूयॉर्क पोस्ट' नं दिलेल्या माहितीनुसार 'व्हेनेझुएलाची आयर्न लेडी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मारिया कोरिना मचाडो यांचा हुकुमशाहीविरुद्धचा संघर्ष अनेक दशके जुना आहे. देशातील संकटाच्या काळात त्यांनी लोकशाहीचा निर्भयपणे पुरस्कार केला. धाडसी आणि निर्भय नेत्या अशी त्यांची ओळख आहे.
व्हेनेझुएलाचे विद्यमान अध्यक्ष निकोलस मादुरो यांनी मागील दोन निवडणुकीत दडपशाहीच्या जोरावर विजय मिळवला असा मचाडो यांचा आरोप आहे. त्यांच्या या आरोपांना अमेरिकेनंही पाठिंबा दिलाय. मादुरो यांनी निवडणूक जिंकल्याचे घोषित केल्यानंतर माचाडो यांनी माघार घेण्यास नकार दिला. परिणामी, त्या 14 महिन्यांहून अधिक काळ भूमिगत आहेत.
( नक्की वाचा : PM Modi-Donald Trump: ऐतिहासिक गाझा करारानंतर मोदी-ट्रम्प यांचा संवाद; भारत-अमेरिका व्यापार करारावरही चर्चा )
अपात्रता, धमक्या आणि जबरदस्तीने गप्प केले जात असतानाही, मचाडो यांनी आपला संघर्ष सुरूच ठेवला आहे. त्या मुक्त निवडणुका व्हाव्यात, यासाठी प्रयत्न करत आहेत, नागरिकांना एकत्र करत मानवी हक्कासाठी आवाज उठवण्याचं काम क्यांनीकेलं आहे.
व्हेनेझुएला सरकारने राजकीय हक्कांवर निर्बंध आणले आहेत. तसंच विरोधकांच्या उमेदवारांना बेकायदेशीरपणे अपात्र ठरवले. या क्रूर दडपशाहीच्या विरोधात भूमिगत राहूनही मारिया कोरिना मचाडो यांनी त्यांचे काम सुरुच ठेवले. मुक्त निवडणुका, कायद्याचे राज्य यासाठी त्या लढा देत आहेत. त्यांच्या याच कार्याचा गौरव नोबल शांतता पुरस्कार देणाऱ्या निवड समितीनं केलाय.