ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने ज्या वेगाने आणि अचूकतेने हल्ला केला, त्यामुळे पाकिस्तानही चकित झाला होता. जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये 26 पर्यटकांची निवडक हत्या केल्यानंतर, भारताने पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर ज्या प्रकारे सर्जिकल स्ट्राईक केली, त्यामुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. भारतानं अणुबॉम्ब हल्ला तर केला नाही ना, अशी भीती पाकिस्तानी नागरिकांना वाटत होती. भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानला सावरण्याचीही संधीही मिळाली नाही. पाकिस्तानच्या सरकारमधील बडे अधिकारी देखील ही गोष्ट मान्य करु लागले आहेत.
काय दिली कबुली?
भारताने ब्रह्मोस क्रूझ मिसाईल सोडल्यानंतर पाकिस्तानी सैन्याला हे अण्विक क्षेपणास्त्र आहे की नाही हे शोधण्यासाठी 30 ते 45 सेकंदच मिळाले होते, अशी कबुली पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे सल्लागार राणा सनाउल्लाह यांनी कबुल केलं आहे.
राणा सनाउल्लाह यांनी एका पाकिस्तानी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, 'भारताने नूर खान एअरबेसवर ब्रह्मोस क्षेपणास्त्र डागले, तेव्हा पाकिस्तानच्या सैन्याकडे हे क्षेपणास्त्र अणुबॉम्बने सुसज्ज आहे की नाही याचे विश्लेषण करण्यासाठी फक्त 30 ते 45 सेकंद होते. फक्त 30 सेकंदात याबद्दल काहीही ठरवणे एक धोकादायक परिस्थिती होती.
सनाउल्लाह यांनी वाहिनीशी बोलताना सांगितले की, मी असे म्हणत नाही की त्यांनी (भारताने) अणुबॉम्बचा वापर न करून चांगले केले. पण याचा एक पैलू असाही आहे की, या बाजूचे लोक त्याचा चुकीचा अर्थ लावू शकले असते, ज्यामुळे पहिला अणुबॉम्ब लॉन्च होऊ शकला असता. असे झाले असते तर जगात अणुयुद्ध भडकले असते.
भारताने ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकिस्तानच्या अनेक हवाई अड्ड्यांवर हल्ला केला होता आणि धावपट्ट्या, हँगर आणि इमारतींचे नुकसान करून पाकिस्तानला मोठा धक्का दिला होता. या हल्ल्यात पाकिस्तानमधील सरगोधा, नूर खान (चकलाला), भोलारी, जॅकबाबाद, सुक्कुर आणि रहीम यार खान येथील लष्करी तळांचं मोठं नुकसान झालं. उपग्रहातून मिळालेल्या चित्रांमधूनही या माहितीवर शिक्कामोर्तब झाले.
नूर खान हे रावळपिंडीच्या चकलाला येथे असलेले पाकिस्तान वायुसेनेचे एक प्रमुख एअरबेस आहे. भारताने नूर खानवर हल्ला करण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. 1971 च्या युद्धादरम्यान भारतीय वायुसेनेच्या 20 स्क्वॉड्रनने त्यांच्या हॉकर हंटर्ससह या एअरबेसवर हल्ला केला होता.