India Pakistan Tension : भारताच्या हवाई हल्ल्यानं पाकिस्तानचं मोठं नुकसान झालं आहे. भारताच्या हल्ल्यानं घाबरलेल्या पाकिस्ताननं अणूबॉम्बचा वापर करण्याबाबत बैठक बोलवण्याचा निर्णय घेतला होता. पण, अमेरिकेनं हस्तक्षेप करताच पाकिस्ताननं ही बैठक रद्द केली आहे. पाकिस्ताने पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी आज (शनिवार, 10 मे) नॅशनल कमांड अथॉरिटीची बैठक बोलावली होती. त्यापूर्वीच अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख असिम मुनीर यांना फोन केला. दोघांच्या चर्चेनंतर ही बैठक रद्द करण्यात आली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मार्को रुबियो आणि असिम मुनीर यांच्यात काय बैठक झाली हे अद्याप समजू शकलेलं नाही. पण, अमेरिकेनं दबाव टाकल्यानंच पाकिस्ताननं बैठक रद्द केल्याचं मानलं जात आहे. अमेरिकेच्या हस्तक्षेपामुळेच पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी माघार घेतली आहे.
भारतावर करण्यात आलेले ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले अयशस्वी झाल्यानं पाकिस्तान संतपाला आहे. त्यामधूनच पाकिस्ताननं नॅशनल कमांड अथॉरिटीची बैठक बोलावली होती. पाकिस्तान सैन्य आणि सरकारची ही उच्च समिती आहे. ही समिती अणूबॉम्ब वापराचा निर्णय घेते. पाकिस्तान सरकारमधील महत्त्वाचे मंत्री आणि वरिष्ठ लष्करी अधिकारी या समितीचे सदस्य आहेत.
( नक्की वाचा : पाकिस्तानची अवस्था बिकट, भावाच्या मदतीसाठी लंडनहून धावले नवाज शरीफ, दिला महत्त्वाचा सल्ला )
अमेरिकेकडून मध्यस्थीचा प्रस्ताव
अमेरिकेनं यापूर्वीही दोन्ही देशांना शांतततेचं आवाहन केलं होतं. पण त्यानंतरही पाकिस्तानच्या कुरापती सुरुच आहेत. दोन दिवसांपासून पाकिस्तानकडून भारतावर मोठ्या प्रमाणावर हवाई हल्ले करण्यात येत आहेत. भारताचा एअर डिफेन्स अतिशय भक्कम आहे. त्यामुळे पाकिस्तानला तो भेदणे जमलेलं नाही.
अमेरिका आणि सौदी अरेबिया या देशांनी भारत आणि पाकिस्तानमध्ये मध्यस्थी करण्याची तयारी दर्शविल्याचं सांगितलं. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी यासंदर्भात संवाद साधला. या चर्चेदरम्यान रुबियो यांनी दोन्ही देशांनी तणाव कमी करण्यासाठी उपाय शोधणे तसेच थेट संवाद पुन्हा सुरू करणे गरजेचे असल्याचे सांगितले. तसेच, भविष्यातील वाद टाळण्यासाठी अमेरिकेच्या मध्यस्थीने रचनात्मक चर्चा घडवून आणण्याचा प्रस्ताव दिला.