Pakistan Terror Links Exposed: पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर शोएब अख्तर याच्या भावाच्या अंत्यविधीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळे पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांना कशा प्रकारे खुले संरक्षण आणि मोकळीक मिळते, हे पुन्हा एकदा जगासमोर आले आहे. शोएब अख्तरचा भाऊ शाहिंद अख्तरचे तीन दिवसांपूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. त्याच्या अंत्यविधीला लष्कर-ए-तैयबा या धोकादायक दहशतवादी संघटनेच्या राजकीय आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित राहिल्याचे समोर आले आहे.
इस्लामाबादमध्ये झालेल्या या अंत्यविधीचे काही व्हिडिओ आणि फोटो पाकिस्तान मरकजी मुस्लिम लीग म्हणजेच पीएमएमएल या संघटनेने प्रसिद्ध केले आहेत. ही संघटना मुंबईवर 26/11 ला झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईद याच्या लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेची राजकीय आघाडी म्हणून काम करते. या अंत्यविधीला हाफिज सईदच्या अत्यंत जवळच्या सहकाऱ्यांनी हजेरी लावल्याचे स्पष्ट झाले आहे.
दहशतवादी संघटनांच्या नेत्यांची उपस्थिती
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पीएमएमएलचा इस्लामाबाद प्रमुख इनाम-उर-रहमान कांबोह उपस्थित असलेला दिसत आहे. त्याच्यासोबतच पीएमएमएलचा उपसरचिटणीस अब्दुल्ला तूर, क्षेत्रीय सरचिटणीस हाफिज उमर आणि खिदमत कमिटीचा अध्यक्ष अमजद भट्टी यांच्यासह इतर अनेक प्रमुख चेहरे तिथे हजर होते. हे सर्वजण अंत्यसंस्काराच्या वेळी एका रांगेत उभे राहून प्रार्थना करताना व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून आले आहेत.
शोएब अख्तरची पहिली प्रतिक्रिया
आपल्या कुटुंबावर ओढवलेल्या या संकटाची माहिती स्वतः शोएब अख्तरने सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली होती. त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले होते की, माझे मोठे बंधू शाहिद अख्तर यांचे निधन झाले असून ते अल्लाहच्या दरबारात परत गेले आहेत. त्यांच्या नमाज-ए-जनाजाची वेळ आणि ठिकाण सकाळी कळवले जाईल. मात्र, आपल्या भावाच्या अंत्यविधीला दहशतवादी संघटनेशी संबंधित लोकांनी लावलेल्या हजेरीबद्दल आणि त्यानंतर सुरू झालेल्या टीकेवर शोएब अख्तरने अजून तरी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.