मॉस्कोवर हल्ला करणारी ISIS-K संघटना काय आहे? आयएसएसचं रशियाशी वैर का?

ISIS-K म्हणजेच आयएसआयएस कोरासान या दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
मॉस्को:

Moscow Concert Attack : रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आत्तापर्यंत 70 जण ठार झाले असून 150 पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. मॉस्कोमधील एका कन्सर्ट हॉलमध्ये शुक्रवारी (22 मार्च) रात्री हा हल्ला झाला. या कार्यक्रमासाठी हजारो जण जमले होते. त्यावेळी काही दशतवाद्यांनी तिथं अंदाधुंद गोळीबार केला.ISIS-K म्हणजेच आयएसआयएस कोरासान या दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. ही इस्लामिक स्टेट ग्रुप या दहशतवादी संधटनेची अफगाणिस्तानमधील शाखा आहे. या संघटनेनं रशियावर हा हल्ला का केला? हे समजून घेऊ या

काय आहे ISIS-K?

इस्लामिक स्टेट - खुरासान (ISIS-K) या दहशतवादी संघटनेचं नाव त्या भागातील परिसरावरुन ठेवण्यात आले आहे. यामध्ये इरान, तुर्कमेनिस्तान आणि अफगाणिस्तानच्या काही भागाचा समावेश आहे.

अफगाणिस्तानमध्ये 2014 साली ही संघटना उदयास आली. या संघटनेनं स्वत:च्या क्रूर कारवायांनी जगाचं लक्ष वेधलं.

ही इस्लामिक स्टेट ग्रुपची सर्वात सक्रीय संघटना आहे. 2018 च्या दरम्यान या संघटनेचं प्रभावक्षेत्र वाढलं होतं. त्यांनी तालिबान तसंच अमेरिकी सैन्याचं मोठं नुकसान केलं. त्यानंतर या संघटनेच्या सदस्य संख्येत घसरण झाली. अमेरिकेनं 2021 साली अफगाणिस्तानातील सैन्य मागं घेतलं. त्यानंतर या संघटनेची माहिती मिळवणाऱ्या अफगाणिस्तानमधील गुप्तचर नेटवर्कची क्षमता कमी झाली आहे. 

यापूर्वी कुठे केला हल्ला?

अफगाणिस्तानमध्ये तसंच बाहेर मशिदींवर हल्ला करण्याचा या संघटनेचा इतिहास आहे. या वर्षाच्या सुरुवातीला इराणमध्ये झालेल्या दोन बॉम्बस्फोटात 100 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला होता. हा हल्ला ISIS-K या संघटनेनंच केला असल्याची माहिती अमेरिकेनं दिली होती. त्याचबरोबर सप्टेंबर 2022 मध्ये काबूलमधील रशियन दुतावासावर झालेल्या आत्मघातकी बॉम्बस्फोटाची जबाबदारीही या संघटनेनं घेतली होती. 

काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळावर 2021 साली झालेल्या दहशतवादी हल्ल्यालाही ही संघटना जबाबदार होती. या हल्ल्यात 13 अमेरिकन नागरिकांसह अनेक जण ठार झाले होते. आयएसआयएस- के ही संघटना अफगाणिस्तानच्या बाहेर हल्ला करु शकते असा इशारा पश्चिम आशियातील प्रमुख अमेरिकी जनरलनं या महिन्याच्या सुरुवातीलाच दिला होता. 

Advertisement

रशिया टार्गेट का?

रशियावर ISIS कडून होणाऱ्या हल्ल्यांची संख्या सध्या वाढली आहे. या संघटनेचा रशियन अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना मोठा विरोध आहे, अशी माहिती या क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिलीय. सीरियामध्ये इस्लामिक स्टेट विरुद्ध अध्यक्ष बशर-अल-असद यांच्यातील संघर्षात पुतीन यांची भूमिका निर्णायक ठरली होती. पुतीन यांनी 2015 साली या गृहयुद्धात हस्तक्षेप करत असद यांना मदत केली. रशियाच्या मदतीनं या युद्धाचं चित्र बदललं होतं. 

वॉशिंग्टनमधील रिसर्च ग्रुप सौफान सेंटरच्या कॉलीन क्लार्क यांनी दिलेल्या माहितीनुसार ' गेल्या दोन वर्षांपासून रशिया इस्लामिक स्टेट- खुरासानच्या (ISIS-K) टार्गेटवर आहे. त्यांनी वेळोवेळी पुतीन यांच्यावर टीका केलीय.'

Advertisement

 मुस्लिमांवर सतत अत्याचार करणाऱ्यांचा रशिया मित्र आहे, अशी आयएसआयएस-के ची भावना आहे. त्याचबरोबर या संघटनेत मध्य आशियातील दहशतवादी देखील या संघटनेचे सदस्य आहेत. या दहशतवाद्यांचाही वेगवेगळ्या कारणांसाठी रशियावर राग आहे, अशी माहिती वॉशिंग्टनमधील विल्सन सेंटरच्या मायकल कुगेलमॅन यांनी दिली.

Topics mentioned in this article