रशिया आणि युक्रेन युद्ध (Russia-Ukraine War) खूप काळ सुरू आहे. तीन वर्षांनंतर हे युद्ध संपवण्याच्या दिशेने रशियाने एक पाऊल उचलले आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांनी युक्रेनसोबत 15 मे रोजी थेट चर्चेचा प्रस्ताव ठेवला आहे. यावर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की (Volodymyr Zelensky) यांनी आनंद व्यक्त केला आहे. शिवाय चर्चेसाठी सकारात्मक संकेत ही दिले आहेत. मात्र, शांतता चर्चा सुरू होण्यापूर्वी युद्धविराम झाला पाहिजे, असे झेलेन्स्की यांनी सांगितले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या विधानावर झेलेन्स्की म्हणाले, "रशियाने अखेर युद्ध संपवण्याचा विचार सुरू केला आहे, ही सकारात्मक बाब आहे. जग बऱ्याच दिवसांपासून याची वाट पाहत होते आणि कोणतेही युद्ध खऱ्या अर्थाने संपवण्याचे पहिले पाऊल म्हणजे युद्धविराम आहे." असं ही ते यावेळी म्हणाले. एका दिवसासाठीही हत्या सुरू ठेवण्याचा अर्थ नाही. रशिया उद्या म्हणजे 12 मे पासून पूर्ण, कायमस्वरूपी आणि विश्वासार्ह युद्धविरामाची अंमलबजावणी करेल, अशी आम्हाला अपेक्षा आहे. युक्रेन ही त्यासाठी तयार आहे," असेही झेलेन्स्की यांनी स्पष्ट केले.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी रात्री माध्यमांना दिलेल्या निवेदनात युद्धविरामाचा प्रस्ताव नाकारला आहे. तसेच 15 मे रोजी इस्तंबूलमध्ये युक्रेनसोबत थेट चर्चा पुन्हा सुरू करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. दुसरीकडे, तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगान यांनी रविवारी त्यांचे फ्रेंच समकक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी फोनवर बोलताना सांगितले की, तुर्की रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्धविराम आणि कायमस्वरूपी शांततेसाठी चर्चेचे आयोजन करण्यास तयार आहे. त्यामुळे आता तरी रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध विराम होईल अशी चर्चा सुरू झाली आहे.