Iran US War 2026 : इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर आता एक अत्यंत खळबळजनक खुलासा समोर आला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 28 फेब्रुवारी रोजी इराणविरुद्ध युद्धाची घोषणा केली, पण या ऐतिहासिक निर्णयामागे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा एक सीक्रेट कॉल कारणीभूत असल्याची चर्चा आता रंगली आहे.
रॉयटर्सने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, युद्ध सुरू होण्याच्या 48 तासांपूर्वी नेतन्याहू यांनी ट्रम्प यांना फोन करून असे काही सांगितले की, त्यानंतर ट्रम्प यांनी थेट इराणवर हल्ल्याचा आदेश दिला. या फोन कॉलमध्ये नेतन्याहू यांनी केवळ ट्रम्प यांना प्रोत्साहित केले नाही, तर खामेनी यांना संपवण्यासाठी भावनिक आवाहनही केल्याचे समोर आले आहे.
खामेनी यांना संपवण्याची सर्वात मोठी संधी
गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तेहरानमध्ये अयातुल्ला अली खामेनी हे आपल्या प्रमुख सहकाऱ्यांसोबत एका विशेष बैठकीसाठी एकत्र येणार होते. ही बैठक शनिवारी रात्रीऐजी शनिवारी सकाळी होणार असल्याची पक्की माहिती मिळताच नेतन्याहू यांनी ट्रम्प यांना फोन लावला.
नेतन्याहू यांनी ट्रम्प यांना पटवून दिले की, खामेनी आणि इराणचे संपूर्ण वरिष्ठ नेतृत्व एकाच ठिकाणी असण्याची हीच ती वेळ आहे, जिथे एकाच हल्ल्यात सर्वांचा खात्मा करता येईल. इस्रायली पंतप्रधानांनी याला डिकॅपिटेशन स्ट्राईक असे नाव दिले होते, ज्याचा अर्थ शत्रू देशाचे सर्वोच्च नेतृत्व एकाच वेळी संपवणे असा होतो.
( नक्की वाचा : Khamenei Death: डेंटिस्ट बनून आले अन् खामेनींना संपवून गेले! मोसादच्या ऑपरेशनचा थरार वाचून डोकं चक्रावेल )
बदला आणि इतिहासाची आठवण
या फोन कॉल दरम्यान नेतन्याहू यांनी ट्रम्प यांच्यावर प्रभाव टाकण्यासाठी वैयक्तिक आणि ऐतिहासिक मुद्द्यांचा आधार घेतला. त्यांनी ट्रम्प यांना आठवण करून दिली की, इराणने यापूर्वी ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न केला होता आणि हीच ती वेळ आहे जेव्हा ते त्याचा बदला घेऊ शकतात.
इतकेच नाही तर, खामेनी यांना संपवून ट्रम्प इतिहास घडवू शकतात आणि इराणमधील 47 वर्षांची धार्मिक राजवट उलथवून लावण्यास मदत करू शकतात, असा युक्तिवाद नेतन्याहू यांनी केला. या भावनिक आणि राजकीय दबावामुळेच ट्रम्प यांनी 27 फेब्रुवारी रोजी ऑपरेशन एपिक फ्युरीला हिरवा कंदील दाखवला आणि 28 फेब्रुवारीच्या पहाटे इराणवर पहिला बॉम्ब पडला.
( नक्की वाचा : Anaya Bangar:'वेळ लागला पण.' ऑपरेशननंतर अनाया बांगरची वडिलांसाठी भावूक पोस्ट; बाप-लेकीच्या नात्याचा नवा प्रवास )
ऑपरेशन एपिक फ्युरी आणि खामेनींचा अंत
डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धाची घोषणा केल्यानंतर अवघ्या काही तासांतच इराणचे आकाश अमेरिकन आणि इस्रायली विमानांच्या गर्जनेने हादरून गेले. खराब हवामानामुळे यापूर्वी एकदा रद्द झालेली ही मोहीम अखेर यशस्वी झाली. 28 फेब्रुवारीच्या संध्याकाळी स्वतः डोनाल्ड ट्रम्प यांनी जगासमोर येऊन घोषणा केली की, या हल्ल्यात अयातुल्ला अली खामेनी मारले गेले आहेत.
या घटनेने संपूर्ण आखाती देशात खळबळ उडाली आहे. अमेरिकेचे या मोहिमेसाठी अनेक आठवड्यांपूर्वीच मध्यपूर्वेत आपली लष्करी ताकद वाढवली होती, परंतु अंतिम निर्णय नेतन्याहू यांच्या त्या एका फोन कॉलमुळे घेतला गेल्याचे मानले जात आहे.
फेक न्यूज की वास्तव?
या धक्कादायक खुलाशानंतर आता आरोप-प्रत्यारोपांच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत. बेंजामिन नेतन्याहू यांनी मात्र हे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. त्यांनी या वृत्ताला फेक न्यूज असे संबोधले असून, ट्रम्प यांना कोणीही काय करावे हे सांगू शकत नाही, असे स्पष्ट केले आहे. दुसरीकडे ट्रम्प यांनीही हा निर्णय सर्वस्वी आपलाच होता, असे जाहीर केले आहे. मात्र, गुप्तचर यंत्रणांमधील सूत्रांच्या मते, नेतन्याहू यांनी खामेनींच्या हत्येसाठी ज्या पद्धतीने ट्रम्प यांना तयार केले, त्यामुळेच आज इराणचे चित्र पूर्णपणे बदलले आहे. हे युद्ध आता कोणत्या थराला जाणार, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.