- बांगलादेशात गेल्या १८ दिवसांत सहा हिंदू नागरिकांची विविध प्रकारच्या हिंसाचारात हत्या झाल्याची नोंद आहे
- नरसिंगडी जिल्ह्यातील मणी चक्रवर्ती यांच्यावर धारदार शस्त्राने भर बाजारात हल्ला करून त्यांचा खून करण्यात आला
- जेसोर जिल्ह्यातील राणा प्रताप बैरागी यांची मोटारसायकलवर आलेल्या हल्लेखोरांनी गोळी झाडून हत्या केली आहे
बांगलादेशात गेल्या 24 तासांत दोन हिंदू नागरिकांची हत्या झाली आहे. तर गेल्या 18 दिवसातील ही सहावी हत्या आहे. मणी चक्रवर्ती असं हत्या झालेल्या हिंदू नागरिकाचं नाव आहे. ते नरसिंगडी जिल्ह्यातील चारसिंदूर बाजारात किराणा दुकान चालवत होते. काही अज्ञात व्यक्तींनी मणी चक्रवर्तींवर भर बाजारात धारदार शस्त्राने हल्ला केला. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मणीचा मृत्यू झाला. 19 डिसेंबरला मणि यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहून बांगलादेशातील हिंसेबद्दल चिंता व्यक्त केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी आपल्या परिसराला मृत्यूची दरी म्हटलं होतं. सोमवारीच बांगलादेशातील जेसोर जिल्ह्यातही एका हिंदू व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. राणा प्रताप बैरागी असं मृत व्यक्तीचं नाव होतं. मोनिरामपूर परिसरात त्यांचा एक बर्फाचा कारखाना आहे. राणा प्रताप हे दैनिक बीडी खबर वृत्तपत्राचे कार्यकारी संपादकही होते. मोटारसायकलवर आलेल्या तीन हल्लेखोरांनी त्यांना कारखान्यातून बाहेर बोलावून एका गल्लीत नेलं. त्यानंतर डोक्यात जवळून गोळी झाडून पळून गेले. त्यांचा जागीच मृत्यू झाला.
गेल्या 18 दिवसात बांगलादेशातील हिंदूंवरील हल्ले थांबत नाहीत. 12 डिसेंबरला विद्यार्थी नेता शरीफ उस्मान हादी याचा मृत्यू झाला. त्यानंतर बांगलादेशात हिंसाचार उसळला आहे. हिंसाचारात हिंदू अल्पसंख्याकांना लक्ष्य केलं जात आहे. सर्वात आधी उत्तर बांगलादेशातील मैमनसिंग जिल्ह्यात कपड्याच्या कारखान्यात काम करणाऱ्या 27 वर्षीय दीपू चंद्रा दास याची जमावाने बेदम मारहाण करून हत्या केली होती. त्याचा मृतदेह झाडाला बांधून पेटवण्यात आला होता. त्यानंतर वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन जणांची जमावाने मारहाण करत हत्या केली होती.
24 डिसेंबर 2025 दीपू दास याची हत्या झाली. त्यानंतर दोन दिवसांनीच 26 डिसेंबर 2025 ला अमृत मंडल याचा खून करण्यात आला. 1 जानेवारी 2026 ला बजेंद्र बिस्वास, 4 जानेवारी 2026 ला खोकेनचंद्र दास, 5 जानेवारी 2026 ला राणा प्रताप बैरागी आणि याच दिवशी मणी चक्रवर्ती यांना मारलं गेलं. या हत्या प्रकरणांमुळे बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदूंच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदू समाज दहशतीत जगत आहे. मात्र युनूस सरकार हिंदूंच्या सुरक्षेसाठी कोणतीच ठोस पावलं उचलताना दिसत नाही. त्यामुळे भारतात संतापाची लाट उसळली आहे.
बांगलादेशात पुढच्या महिन्यात म्हणजेच 12 फेब्रुवारीला संसदीय निवडणूक होणार आहे. भारत आणि हिंदू विरोधी धोरण हाच या निवडणुकांचा अजेंडा झाला आहे. त्यामुळे बांगलादेशातील राजकीय पक्षदेखील हिंदूंच्या सुरक्षेबाबत आवाज उठवण्याची हिंमत दाखवत नाहीत. अशा परिस्थितीत बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदूंच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे बांगलादेशा हिंदूवर होत असलेले हे हल्ले कधी थांबणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या बांगलादेशातील हिंदूंची सुरक्षा वाऱ्यावर असल्या सारखेच आहे.