Salwan Momika Shot Dead : युरोपीयन देश स्वीडनमध्ये मशिदीच्या समोर कुराण जाळणारा आंदोलक सलवान मोमिकाची (Salwan Momika) गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. AFP नं दिलेल्या रिपोर्टनुसार 38 वर्षांचा सलवान स्टॉकहोममधील एका अपार्टमेंटमध्ये टिकटॉकवर लाईव्ह सेशन करत होता. त्यावेळी अज्ञात हल्लेखोरानं त्याला गोळ्या घातल्या. पोलिसांनी अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरु करण्यात आली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कोण होता सलवान ? (Who is Salwan Momika)
सलवाननं 28 जून 2023 रोजी स्टॉकहोममधील सर्वात मोठ्या मशिदीच्या समोर कुराण जाळले होते. त्यानंतर संपूर्ण जगभर स्वीडनच्या विरोधात आंदोलन झाले. त्यानंतर सलवाननं अनेक मशिदींच्या समोर कुराणांच्या प्रतींची होळी केली होती. त्याच्यावर कुराण पायदळी तुडवल्याचाही आरोप होता. सलवानवर वेगवेगळ्या कलमाच्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते.
स्टॉकहोममधील एका कोर्टामध्ये त्याच्या विरोधात 16 जानेवारी रोजी खटला सुरु झाला होता. स्टॉकहोमच्या जिल्हा न्यायालयात गुरुवारी त्याच्या विरोधातील एका खटल्यावर निर्णय सुनावण्यात येणार होता. मात्र आता त्याच्या हत्येनंतर हा निकाल 3 फेब्रुवारीपर्यंत लांबू शकतो.
( नक्की वाचा : John F. Kennedy : अमेरिकेतील अनेक रहस्य उघड होणार, 'त्या' सिक्रेट फाईलवर ट्रम्प यांची स्वाक्षरी )
याबाबत प्रसिद्ध झालेल्या वेगवेगळ्या रिपोर्टनुसार, सलवान इराकी मिलिशियामध्ये राहिला होता. त्यानं 2017 साली इराकमधील मोसूल शहराच्या बाहेरच्या भागात एक सशस्त्र समूह बनवला होता. पण, अन्य ख्रिस्ती मिलिशिया संघटनेचे प्रमुख रेयान अल-कलदानीशी झालेल्या संघर्षानंतर त्याला 2018 साली इराक सोडावे लागले. स्वीडन सरकारनं 2021 साली त्याला निर्वासिताचा दर्जा दिला.
का जाळत असे कुराण?
सलवान मोमिकानं अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावावर स्वीडन सरकारकडं कुराण जाळण्याची परवानगी मागितली होती. त्यानंतर स्वीडन पोलिसांनी 2023 मध्ये त्याला एक दिवस इस्लामच्या विरोधात प्रदर्शन करण्याची परवानगी दिली होती. 'मी मुस्लिमांच्या विरोधात नाही. पण, त्यांचे विचार आणि श्रद्धांच्या विरोधात आहे, असं त्यानं सांगितलं होतं.