New Covid Variant BA.3.2: कोरोना व्हायरसची दहशत जग अद्याप विसरलेलं नाही. या संकटातून संकटातून सावरत असतानाच आता एका नवीन व्हेरिएंटने आरोग्य यंत्रणांच्या काळजाचा ठोका चुकवला आहे. बीए 3.2 असे नाव असलेल्या या व्हेरिएंटला शास्त्रज्ञांनी सिकाडा असे टोपणनाव दिले असून, तो सध्या अमेरिकेसह युरोपातील अनेक देशांमध्ये वेगाने पसरत आहे.
सुरुवातीला संथ गतीने पसरणारा हा विषाणू आता अचानक जगभरात पाय पसरू लागल्याने शास्त्रज्ञांनी यावर बारकाईने लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे या व्हेरिएंटमध्ये झालेल्या जनुकीय बदलांची संख्या धक्कादायक असून, त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
दक्षिण आफ्रिकेपासून अमेरिकेपर्यंतचा प्रवास
सिकाडा म्हणजेच बीए 3.2 हा व्हेरिएंट सर्वात आधी नोव्हेंबर 2024 मध्ये दक्षिण आफ्रिकेत आढळून आला होता. सुरुवातीचे काही महिने हा विषाणू शांत होता, मात्र मागील वर्षाच्या अखेरीस त्याने जागतिक स्तरावर वेग पकडला.
फेब्रुवारी 2026 पर्यंत अमेरिकेतील तब्बल 25 राज्यांमध्ये या व्हेरिएंटचा शिरकाव झाल्याची माहिती सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने (CDC) दिली आहे. अमेरिकेसोबतच डेन्मार्क, जर्मनी आणि नेदरलँड यांसारख्या युरोपीय देशांमध्येही या व्हेरिएंटचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहेत.
( नक्की वाचा : Iran War: इशारा, इमोशनल ब्लॅकमेल आणि'सीक्रेट कॉल'...खामेनींना मारण्यासाठी ट्रम्प यांचं मन कसं वळवलं? )
शास्त्रज्ञांना काळजी का?
या नवीन व्हेरिएंटने तज्ज्ञांची झोप उडवण्यामागे एक मुख्य कारण आहे, ते म्हणजे यातील उत्परिवर्तने (Mutations). सिकाडा व्हेरिएंटच्या स्पाईक प्रोटीनमध्ये तब्बल 70 ते 75 बदल झाले आहेत. स्पाईक प्रोटीन हा विषाणूचा तो भाग असतो जो मानवी पेशींमध्ये प्रवेश करण्यास मदत करतो.
सध्या उपलब्ध असलेल्या कोरोना लसी ज्या जुन्या व्हेरिएंटवर (उदा. जेएन 1) आधारित आहेत, त्या या नवीन व्हेरिएंटवर कितपत प्रभावी ठरतील, याबाबत आता शंका उपस्थित केली जात आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात बदल झालेला हा पहिलाच व्हेरिएंट असल्याचे बोलले जात आहे.
लक्षणे आणि आजाराची तीव्रता
सिकाडा व्हेरिएंटमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाले असले तरी, दिलासादायक बाब म्हणजे यामुळे रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाण सध्या तरी कमी आहे. हा व्हेरिएंट लोकांना अधिक आजारी पाडतोय, असे कोणतेही ठोस पुरावे अद्याप मिळालेले नाहीत.
या व्हेरिएंटची लागण झालेल्या रुग्णांमध्ये खोकला, ताप, थंडी वाजणे, घसा खवखवणे, श्वास घेण्यास त्रास होणे, थकवा, डोकेदुखी आणि वास किंवा चव जाणे अशी लक्षणे दिसून येत आहेत. काही रुग्णांना पोटाशी संबंधित समस्यांचाही सामना करावा लागत आहे.
जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा
डिसेंबर 2025 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) या बीए 3.2 व्हेरिएंटला व्हेरीएंट अंडर मॉनिटरिंग या श्रेणीत टाकले आहे. याचा अर्थ असा की, या विषाणूच्या प्रसारावर आणि त्याच्या बदलत्या स्वरूपावर आता जगाला कडक नजर ठेवावी लागणार आहे. युरोपातील काही देशांमध्ये तर एकूण कोरोना रुग्णांपैकी 30 टक्के रुग्ण हे याच सिकाडा व्हेरिएंटचे असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हा नवा व्हेरिएंट भविष्यात पुन्हा एकदा जगासमोर आव्हान उभे करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.