आशिया खंडात पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या थायलंडच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. थायलंडच्या न्यायालयाने मंगळवारी पंतप्रधान पैतोंगतार्न शिनावात्रा (Paetongtarn Shinawatra) यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांच्या पदावरून हटवले आहे. कंबोडियाच्या एका नेत्यासोबत झालेल्या फोन कॉलची माहिती लीक झाल्याच्या प्रकरणी शिनावात्रा यांना त्यांच्या पदावरून काढण्यात आले आहे. 28 मे रोजी सीमावादानंतर शिनावात्रा यांनी एका वरिष्ठ कंबोडियन नेत्याशी फोनवर चर्चा केली होती. न्यायालयाने कंबोडियासोबतच्या वादामधील त्यांच्या वर्तनाची चौकशी सुरू केली होती.
गेल्या वर्षी स्वीकारला होता पदभार
थायलंडच्या कोर्टानं याबाबत प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हंटले अआहे की, , 'न्यायालयाने 7-2 च्या बहुमताने प्रतिवादीला 1 जुलैपासून पंतप्रधान पदाच्या कार्यभारातून निलंबित केले आहे. घटनात्मक न्यायालय आपला अंतिम निर्णय देत नाही, तोपर्यंत हे निलंबन कायम असेल' कंझर्व्हेटिव्ह सिनेटरच्या एका गटाने पंतप्रधान पैतोंगतार्न यांच्यावर कंबोडियासोबतच्या सीमावादादरम्यानच पदाच्या नैतिकतेचे उल्लंघन केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली आहे.
दीर्घकाळापासून सुरू असलेल्या या प्रादेशिक वादामुळे मे महिन्यात सीमेवर संघर्ष निर्माण झाला होता. त्यामध्ये कंबोडियाच्या एका सैनिकाचा मृत्यू झाला होता. शिनावात्रा 2024 मध्ये थायलंडच्या पंतप्रधान बनल्या होत्या आणि इतिहासात सर्वात कमी वयाच्या पंतप्रधान बनणाऱ्या व्यक्ती होत्या. तसेच, या पदाची जबाबदारी मिळालेल्या त्या दुसऱ्या महिला होत्या.
( नक्की वाचा : S Jaishankar : 'मी त्याच रुममध्ये होतो' भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर ट्रम्प यांच्या दाव्याची परराष्ट्र मंत्र्यांकडून चिरफाड )
सैन्याला म्हटले 'प्रतिस्पर्धी'
समोर आलेल्या रेकॉर्डिंगनुसार, जेव्हा पैतोंगतार्न यांनी कंबोडियाचे राजकारणी हुन सेन यांना सीमेवरील तणावावर चर्चा करण्यासाठी बोलावले, तेव्हा त्यांनी सेन यांना 'काका' म्हटले आणि थाई लष्करी कमांडरला 'प्रतिस्पर्धी' असे संबोधले. यामुळे त्यांच्यावर जोरदार टीका झाली. कंझर्व्हेटिव्ह खासदारांनी त्यांच्यावर कंबोडियासमोर झुकल्याचा आणि सैन्याला कमकुवत केल्याचा आरोप केला आहे.