Why Rishi Sunak's conservative party lost election : ब्रिटनमधील निवडणूक निकाल जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत गेली 14 वर्ष विरोधात असलेल्या लेबर पार्टीनं पुनरागमन केलंय. लेबर पार्टीनं बहुमतासाठी आवश्यक असलेली 326 जागांची मॅजिक फिगर गाठली आहे. लेबर पक्षाचे नेते कीर स्टार्मर ब्रिटनचे पंतप्रधान होणार आहेत. तर, भारतीय वंशाचे विद्यमान पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या कन्झर्व्हेटिव्ह पक्षाचा मोठा पराभव झाला आहे. सुनक यांच्या पराभवाची अनेक कारण आहेत. विशेष म्हणजे ब्रिटनमधील भारतीय वंशांच्या नाराजीचा फटक देखील सुनक यांना बसल्याचं मानलं जात आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सुनक यांना भारतीयांनीच नाकारले
ऋषी सुनक यांच्या मंत्रिमंडळातील तब्बल 11 मंत्री या निवडणुकीत पराभूत झाले आहेत. भारतीय वंशांच्या नागरिकांची नाराजी हे देखील सुनक यांच्या पराभवाचं कारण आहे. ब्रिटनमध्ये भारतीय वंशाचे 18 लाख नागरिक आहेत. त्यामधील 65 टक्के मतदार सुनक यांच्यावर नाराज होते. सुनक पंतप्रधान झाल्यानंतर भारतीय वंशांच्या नागरिकांमध्ये मोठी आशा निर्माण झाली होती. पण, त्यांची अपेक्षापूर्ती करण्यात सुनक यांना अपयश आलं.
आर्थिक आघाडीवर अपयश
ऋषी सुनक ब्रिटनमधील आर्थिक व्यवस्था सुरळीत करण्यात अपयशी ठरले. देशातील महागाई कमी करण्यात त्यांना यश आलं नाही. लोकांचा राहणीमानाचा खर्च वाढलाय. दुसरिकडं लेबर पार्टीनं नवे घर बनवण्यासाठी खास धोरण सादर केलंय. त्याला ब्रिटीश मतदारांनी पसंती दिलीय.
ऋषी सुनक पंतप्रधान झाल्यानंतर ते सर्वात प्रथम महागाई नियंत्रणात आणतील अशी अपेक्षा होती, पण तसं झालं नाही. याउलट अनेक वस्तूंचे दर वाढले. त्यामुळे लोकांमध्ये सुनक सरकारवर नाराजी होती.
2021 च्या अखेरपासून ब्रिटनमधील आवश्यक वस्तूंच्या किंमती सातत्यानं वाढू लागल्या. त्यामुळे लोकांना खर्च वाढला. ब्रिटनमधील सामान्यांपुढं रोजच्या जगण्याचं संकट निर्माण झालं. कोरोना व्हायरस, रशियाचं युक्रेनवरील आक्रमण आणि ब्रेग्झिट या कारणांमुळे महागाई वाढली, असं मानलं जातं आहे.
( नक्की वाचा : ब्रिटनमध्ये 'अब की बार 400 पार'; ऋषी सुनक यांचा पराभव, लेबर पार्टीचा ऐतिहासिक विजय )
कन्झर्व्हेटिव्ह पक्ष सत्तेत आल्यानंतर करांमध्ये सातत्यानं वाढ करण्यात आली. सुनक सरकारनं अनेक करांमध्ये वाढ केली. त्यामध्ये NRI टॅक्सचाही समावेश होता. त्याबद्दलही लोकांमध्ये सरकारविषयी रोष होता.
ब्रिटनमध्ये घरांची समस्या मोठी झाली असून हा एक निवडणुकीचा मुद्दा बनलाय. सुनक यांच्या पक्षाला या प्रश्नाचं ठोस उत्तर शोधता आलं नाही. लेबर पार्टीनं हा मुद्दा निवडणुकीत जोरदारपणे मांडला. लेबर पार्टीनं लाखो नवी घरं तयार करण्याचा रोड मॅप तयार केला आहे.
ब्रिटनला ब्रेग्झिटचाही मोठा फायदा झाला नाही. युरोपीयन युनियनमधून बाहेर पडण्याचा ब्रिटनला फायदा होईल, असं मानलं जात होतं. पण, ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसलाय. ऋषी सुनक यांच्या पराभवाचं ढासळती अर्थव्यवस्था आणि त्याचे सर्वसामान्यांवर झालेले परिणाम हे मोठं कारण आहे.
( नक्की वाचा : पुतीन यांनी किम जोंगला दिली लग्झरी कार, हुकुमशाहनं दिलं खास रिटर्न गिफ्ट! )
गुन्हेगारी आणि अनधिकृत नागरिक
ब्रिटनमध्ये अनधिकृत नागरिकांचा प्रश्न गंभीर झाला आहे. नुकताच आर्थिक कारणांमुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांनी बोटीतून इंग्लिश खाडी पार केली. ब्रिटन सरकारचं देशाच्या सिमेवर नियंत्रण नाही, असं टिकाकारांचं मत आहे. ऋषी सुनक सरकारला देशातील गुन्हेगारी घटना आटोक्यात आणण्यात अपयश आलं. गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या काही घटनांमुळे सरकारच्या अस्तित्वावर प्रश्न उपस्थित झाले होते.