सर्वकालीन महान बुद्धिबळपटूंची यादी रशिया गॅरी कास्पारोव्ह (Garry Kasparov) यांच्या नावाशिवाय पूर्ण होत नाही. बुद्धिबळाचं जग गाजवून निवृत्त झाल्यानंतर कास्पारोव्ह हे समाजकारणातही सक्रीय आहेत. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनाही त्यांनी यापूर्वी आव्हान दिलं होतं. रशियासह जगभरातील वेगवेगळ्या विषयावर कास्पारोव्ह सोशल मीडियावर त्यांची मतं स्पष्टपणे मांडत असतात. भारतामध्ये सुरु असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना टोला लगावणारी कास्पारोव्ह यांची पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. ही पोस्ट व्हायरल होताच कास्पारोव्ह यांनी त्यावर स्पष्टीकरण दिलंय.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले होते कास्पारोव्ह?
X या सोशल मीडिया नेटवर्कवर @SandipGhose या युझरनं केलेल्या पोस्टवर उत्तर देताना कास्पारोव्ह यांनी रायबरेलीचा संदर्भ दिला होता. 'गॅरी कास्पारोव्ह आणि विश्वनाथन आनंद हे लवकर निवृत्त झाले. सर्वकालीन महान बुद्धिबळपटूचा त्यांना सामना करावा लागला नाही,' अशी पोस्ट या युझरनं राहुल गांधी यांचं नाव न घेता केली होती. त्यांनी या पोस्टमध्ये आनंदसह कास्पारोव्ह यांनाही टॅग केलं होतं.
( नक्की वाचा : 'हिंदू मुली हा लुटीचा माल नाही', पाकिस्तानच्या खासदारानं सरकारला सुनावलं, Video )
कास्पारोव्ह या पोस्टला, 'तुम्हाला सर्वोच्च स्थानी पोहाचयचं असेल तर रायबरेलीतून जिंकावं लागतं, असा इतिहास सांगतो' असं उत्तर दिलं. कास्पारोव्ह यांनीही त्यांच्या पोस्टमध्ये कुणाचंही नाव घेतलं नव्हतं. पण राहुल गांधी यांनी गुरुवारी (3 मे ) रायबरेली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक अर्ज भरला आहे. हा पोस्टला संदर्भ होता. त्यामुळे ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली.
काय दिलं स्पष्टीकरण?
गॅरी कास्पारोव्ह यांनी काही तासांनंतर या पोस्टला उत्तर दिलंय. 'माझा हा छोटा विनोद भारतीय राजकारणातील तज्ज्ञ भूमिका म्हणून मान्य होणार नाही,' असं कॅस्पारोव्ह यांनी सांगितलं. ते यावरच थांबले नाहीत. 'मला यापूर्वी हजारो डोळांनी सारं काही पाहणारा दानव म्हंटलं गेलंय त्या आधारे सांगतो, माझ्या आवडत्या खेळात एखादा राजकारणी वरवरच्या चाली खेळत असेल तर ते माझ्या नजरेतून सुटणार नाही.'
राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी निवडणूक प्रचाराच्या दरम्यान मोबाईलवर बुद्धिबळ खेळत असल्याचा व्हिडिओ शेअर केला होता. राहुल यांनी गॅरी कास्पारोव्ह हे त्यांचे आवडते बुद्धिबळपटू असल्याचं सांगत खेळ आणि राजकारणातील साम्य सांगितलं होतं.