पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) सध्या G-7 परिषदेला उपस्थित राहण्यासाठी इटलीमध्ये गेले आहेत. मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच परदेश दौरा आहे. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी (Georgia Meloni) यांनी मोदींचं स्वागत केलं. जगात सध्या अनेक देशांचे प्रमुख देशांतर्गत संकटांचा सामना करत आहेत. त्यावेळी जॉर्जिया मेलोनी यांचा शक्तीशाली नेत्या म्हणून उदय झालाय. 47 वर्षांच्या मेलोनी यांच्या पक्षानं युरोपीयन युनियनच्या निवडणुकांमध्ये दमदार कामगिरी केली आहे. त्या युरोपातील सध्या सर्वात स्थिर राष्ट्रप्रमुख आहेत, असं म्हंटलं तर चुकीचं होणार नाही. त्यांना G-7 मधील देखील सर्वात प्रभावशाली नेत्या मानलं जात आहे.
युरोपीयन युनियनच्या निवडणुकीत मेलोनी यांचा 'ब्रदर्स ऑफ इटली' हा सर्वात मोठा पक्ष बनलाय. त्यांनी जवळपास 29 टक्के मतं मिळाली आहेत. मेलोनी यांना हे यश सहज मिळालेलं नाही. त्यासाठी त्यांनी मोठी मेहनत घेतली आहे. त्या 2022 साली इटलीच्या पंतप्रधान बनल्या. त्यापूर्वीचा त्यांचा प्रवासही मोठा रंजक आहे.
ट्रेंडींग बातमी - PM मोदींना उगाच नाही AJIT DOVAL यांच्यावर विश्वास! भारताच्या जेम्स बाँडला घाबरतात पाकिस्तान-चीन
कोण आहेत जॉर्जिया मेलोनी?
जॉर्जिया मेलोनी इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान आहेत. अगदी कमी कालावधीमध्ये त्यांनी मोठी लोकप्रियता मिळवलीय. मेलोनी यांचा जन्म 15 जानेवारी 1977 रोजी दक्षिण रोममधील गारबेटलामध्ये झाला. त्या लहान असतानच त्यांचे आई-वडील विभक्त झाले.
मेलोनी यांचा त्यांच्या आईनं सांभाळ केला. त्यांनी अगदी तरुणपणात राजकारणात प्रवेश केला. मेलोनींनी 2012 साली 'ब्रदर्स ऑफ इटली' या पक्षाची स्थापना केली. त्या 2014 पासून या पक्षाचं नेतृत्त्व करत आहेत. 2022 साली त्या इटलीच्या पंतप्रधान बनल्या.
1. इटलीमध्ये होत असलेल्या जी-7 शिखर संमेलनाच्या निमित्तानं मेलोनी या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. त्या प्रत्येक पाहुण्यांचं भारतीय परंपरेनुसार हात जोडून स्वागत करत आहेत
2. मेलोनी त्यांची वक्तव्य आणि विचारांमुळे नेहमी चर्चेत असतात. त्यांच्यावर सातत्यानं फॅसिस्ट असल्याचा आरोप झाला आहे. इटलीच्या पंतप्रधानांनी हा आरोप नेहमी फेटाळला आहे.
3. जॉर्जिया मेलोनी स्वत:ला मुसोलिनीच्या वारस म्हणतात. पण, त्यांना कुणी फॅसिस्ट म्हटलं तर त्याचा विरोध करतात.
4. मेलोनी 15 व्या वर्षी इटालियन सोशल मुव्हमेंटमध्ये सहभागी झाल्या. या उजव्या विचारसरणीच्या पक्षाला फॅसिस्ट नेते बेनिटी मुसोलिनीचे समर्थक मानलं जातं.
5. सध्या बहुतेक पाश्चिमात्य देश समलैंगिक विवाहांना मान्यता देत आहेत. त्याचवेळी मेलोनी या समलैंगिक नात्यांच्या विरोधक आहेत. LGBTQ व्यक्तींची लग्न तसंच या जोडप्यानं मुलं दत्तक घेण्यालाही त्यांचा विरोध आहे. त्यांनी LGBTQ समुदायाच्य़ा विरोधात एक अभियान देखील चालवलं होतं.
6. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी या समलैंगिक लग्नासह इच्छामृत्यूच्या देखील विरोधात आहेत. त्यांचा परमेश्वर, पितृभूमी आणि परिवाराच्या संरक्षण करण्यावर भर आहे. महिला आणि पुरुष यांची जोडीच चांगले आई-वडील बनू शकतात, असं त्यांचं मत आहे.
7. माझं लहाणपण आणि विभक्त झालेल्या कुटुंबाचा राजकीय विचारांवर मोठा प्रभाव पडला, असा उल्लेख मेलोनींनी त्यांच्या आत्मचरित्रात केला आहे.
8. मेलोनी 1998 ते 2002 या काळात रोमच्या नगरसेवक होत्या. त्यानंतर त्या AN च्या युवा मोर्चाच्या कार्यकारी अध्यक्ष होत्या. 2008 साली बुर्लोस्कोनी सरकारमध्ये त्यांना मंत्री करण्यात आलं.
9. फोर्ब्सनं 2023 साली जाहीर केलेल्या जगातील शक्तीशाली महिलांच्या यादीमध्ये मेलोनी चौथ्या क्रमांकावर होत्या.
10. मेलोनी यांचा त्यांच्या पार्टनर एंड्रिया जियाम्ब्रुनो यांच्याशी 2023 साली घटस्फोट झाला. त्यांच्या पार्टनरवर एका टीव्ही कार्यक्रमात बलात्कार पीडितेवर आक्षेपार्ह शेरेबाजी केल्याचा आरोप होता.