बांगलादेशमध्ये जवळपास एक महिने सुरु असलेल्या आरक्षण विरोधी आणि सरकार विरोधी आंदोलनाला सोमवारी (5 ऑगस्ट) निर्णायक वळण मिळालं. या आंदोलनामुळे पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. हसीना यांनी देशही सोडावा लागला. विद्यार्थी नेता नाहिद इस्लाम (Nahid Islam) च्या नेतृत्त्वात सुरु असलेल्या आंदोलनानंतर बांगलादेशमध्ये सत्ताबदल झाला आहे.
स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबांना मिळालेल्या आरक्षणाचा विरोध करण्यासाठी हे आंदोलन सुरु झालं होतं. त्या आंदोलनानं पाहता-पाहता शेख हसीना विरोधी चळवळीचं रुप घेतलं होतं. अखेर बांगलादेश लष्करानंही साथ सोडल्यानं हसीना यांना जीव वाचवण्यासाठी तातडीनं देश सोडावा लागला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
या आंदोलकांनी सोमवारी देशभर लागू करण्यात आलेली संचारबंदी मोडली. त्यांनी पंतप्रधान निवास्थानाच्या दिशेनं धाव घेतली. हसीना यांनी देश सोडताच हे जनआंदोलन विजयी झाल्याची त्यांनी घोषणा केली. हे आंदोलक पंतप्रधानांच्या अधिकृत निवासस्थानी घुसले. त्यांनी तेथील सर्व साहित्य पळवले. आंदोलकांच्या लुटीचे वेगवेगळे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
या आंदोलनाचं नेतृत्त्व करणाऱ्या नाहिद इस्लामबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊ या
नाहिद इस्लाम सध्या ढाका विद्यापीठातील समाजशास्त्र विभागाचा विद्यार्थी आहे. तो मानवाधिकाराचं रक्षण करणारा कार्यकर्ता असल्याचाही दावा केला जातो.
विद्यार्थी आंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयकांमध्ये त्याचा समावेश होता. बांगलादेशमधील सरकारी नोकरीतील कोटा प्रणालीत सुधारणा करण्याच्या मागणीसाठी या संघटनेनं आंदोलन सुरु केलं होतं. बांगलादेशमधील सर्वोच्च न्यायालयानं जून 2024 मध्ये दिलेल्या एका निर्णयाच्या विरोधात हे आंदोलन सुरु झालं.
सर्वोच्च न्यायालयानं या निर्णयामध्ये युद्धातील निवृत्त आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या वंशजांसाठी 30 टक्के आरक्षण जाहीर केलं होतं. हे आरक्षण भेदभाव करणारं आणि राजकीय दृष्टीनं प्रेरित आहे, असा आंदोलकांचा आरोप होता.
( नक्की वाचा : शेख हसीना यांच्या आयुष्यातील सर्वात खडतर 45 मिनिटं, वाचा सत्ता सोडण्यापूर्वी नेमकं काय झालं? )
नाहिदनं त्याच्या भाषणात शेख हसीना यांच्या आवामी लीगवर नेहमीच टीका केली आहे. रस्त्यावर तैनात दहशतवादी असं त्यांनी या पक्षाच्या कार्यकर्त्यांचं वर्णन केलं होतं. 'आज विद्यार्थ्यांनी काठ्या उचलल्या आहेत. गरज पडली तर शस्त्र उठवण्यासाठी आम्ही तयार आहोत,' अशी घोषणा त्यानं एका भाषणात केली होती.
19 जुलै 2024 रोजी नाहिदचं त्याच्या घरातून अपहरण करण्यात आलं होतं. विरोधी प्रदर्शनात सहभागी झाल्याबद्दल त्याची चौकशी करण्यात आली. या चौकशीच्या दरम्यान त्याच्या डोळ्यांना पट्टी बांधली होती. तसंच हात हातकडीनं बंद होते. त्याचा निरनिराळ्या प्रकारे छळ करण्यात आला. दोन दिवसांनी पूर्बचलमधील एका पुलाच्या खाली तो बेशुद्ध अवस्थेत सापडला होता.
( नक्की वाचा : Sheikh Hasina : बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचा राजीनामा, देश सोडून भारतामध्ये दाखल )
त्यानंतर 26 जुलै 2024 रोजी त्याचं पुन्हा एकदा अपहरण करण्यात आलं होतं. ढाका महानगरपालिका पोलीस डिटेक्टिव्ह ब्रँचसह वेगवेगळ्या गुप्तचर यंत्रणेचे कर्मचारी असल्याचा दावा करणाऱ्या मंडळींनी हे अपहरण केलं होतं. अर्थात, पोलिसांनी या प्रकराशी कोणताही संबंध नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.