Trump-Putin Meet :अलास्काच्या बर्फाळ प्रदेशात सध्या राजकीय उष्णता जाणवत आहे. जगातील दोन दिग्गज नेते, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या बहुप्रतिक्षित भेटीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. ही बैठक युक्रेनमधील युद्ध थांबवण्यासाठी होत असली तरी, या भेटीचे परिणाम भारतासाठीही महत्त्वाचे ठरू शकतात. या बैठकीतून एक संकेत मिळू शकतो की येत्या काही दिवसांत ट्रम्प यांचा नवा टॅरिफ बॉम्ब भारतावर पडेल की सवलतीचा दिलासा मिळेल.
लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींनी आखली रेषा
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ स्ट्राईक केलेला असताना ही भेट होत आहे. पंतप्रधान मोदींनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरुन ट्रम्प यांना अनेक महत्त्वाचे संकेत दिले आहेत. भारताचा स्वाभिमान, आत्मनिर्भर भारत आणि स्वदेशी सामर्थ्याचा उल्लेख करताना पंतप्रधानांनी सांगितले की, "आपल्याला दुसऱ्याची रेषा लहान करण्यासाठी आपली ऊर्जा खर्च करायची नाही. आपल्याला आपली रेषा अधिक मोठी करण्यासाठी पूर्ण ऊर्जा लावायची आहे. जागतिक संरक्षणवादाच्या या काळात आपल्याला आपल्या बळावर भक्कमपणे उभे राहायचे आहे."
( नक्की वाचा : Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प भारतावर इतके नाराज का? पडद्यामागील खरी गोष्ट झाली उघड! )
ट्रम्प यांचा टॅरिफ आणि भारताची चिंता
रशियाकडून तेल आणि शस्त्रे खरेदी केल्यामुळे ट्रम्प यांनी भारतावर मोठा टॅरिफ लावला आहे. पण, आता ट्रम्प त्याच देशासोबत चर्चेसाठी एकाच टेबलावर बसले आहेत. ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लादला आहे. यापैकी 25 टक्के टॅरिफ रशियाकडून तेल आणि शस्त्रे खरेदी केल्याबद्दल दंड म्हणून लावले आहेत. 25 टक्के टॅरिफ आधीच लागू झाले आहेत आणि उर्वरित 25 टक्के 27 ऑगस्टपासून लागू होणार आहेत. जगात केवळ भारत आणि ब्राझीलवरच ट्रम्प यांनी इतका जास्त टॅरिफ लावला आहे.
विश्लेषकांचे म्हणणे आहे की, इतक्या मोठ्या टॅरिफमुळे भारताच्या निर्यातीला मोठा धक्का बसू शकतो आणि देशाच्या GDP च्या सुमारे 1% रक्कम धोक्यात येऊ शकते. मात्र, अनेक तज्ञांचे असेही मत आहे की भारत काही काळातच हा धक्का सहन करण्याइतका सक्षम होईल.
( नक्की वाचा : Rajnath Singh : 'सबके बॉस तो हम हैं', राजनाथ सिंह यांचं नाव न घेता ट्रम्प यांना चोख उत्तर )
बैठक अयशस्वी झाली तर...
अलास्कामध्ये ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली, तर भारतावर टॅरिफचा फटका वाढू शकतो. ट्रम्प सरकारच्या अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी एका मुलाखतीत धमकी दिली आहे की, अलास्का चर्चेचे सकारात्मक परिणाम मिळाले नाहीत, तर भारतावर अतिरिक्त टॅरिफ लावले जाऊ शकतात. काही अधिकाऱ्यांनी संकेत दिले आहेत की, अलास्का बैठक अयशस्वी झाल्यास दंडात्मक टॅरिफ 50 टक्के किंवा त्याहूनही जास्त होऊ शकतो. टेक्सटाईल्स आणि ज्वेलरीसारख्या वस्तूंवर अतिरिक्त कर लावला जाऊ शकतो.
भारताचा ढाल म्हणून वापर
दुसरीकडे, पुतिन यांना चर्चेसाठी 'भाग पाडण्या'साठी ट्रम्प भारतावरील टॅरिफला कारण म्हणून त्यांची पाठ थोपटून घेत आहेत. ट्रम्प यांच्या दाव्यानुसार त्यांच्या टॅरिफमुळे भारताने रशियाकडून तेल खरेदी कमी केली आहे, आणि त्यामुळेच कदाचित पुतिन चर्चेसाठी तयार झाले आहेत. अशा प्रकारे, ट्रम्प यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत की त्यांच्या आणि पुतिन यांच्या राजकीय लढाईत ते भारताला मोहरा बनवण्यापासून मागे हटणार नाहीत. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की, अलास्कामध्ये चर्चा अयशस्वी झाल्यास त्याचा दंड भारतावर लादला जाऊ शकतो.
नवी दिल्लीतील राजकीय वर्तुळापासून बाजारापर्यंत, सर्वांचे लक्ष अलास्कावर लागले आहे. जर ट्रम्प आणि पुतिन यांच्यात एखादी जादुई डील झाली, तर भारतावरील टॅरिफचा दबाव काही प्रमाणात कमी होण्याची आशा आहे. पण जर परिस्थिती बिघडली, तर ट्रम्प भारतासाठी अडचणी वाढवू शकतात.
'बिझनेसमॅन' विरुद्ध 'एजंट' यांच्या करारावर लक्ष
ट्रम्प यावेळी वेगळ्या मूडमध्ये दिसत आहेत. गेल्या साडेतीन वर्षांपासून सुरू असलेले युक्रेन युद्ध संपवण्यासाठी ते आतुर आहेत. म्हणूनच ज्या युक्रेनसोबत रशियाचे युद्ध संपवण्यासाठी ते करार करणार आहेत, त्यामध्ये ते युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनाच बसू देत नाहीत. आता हे पाहणे महत्त्वाचे ठरेल की 'बिझनेसमॅन' ट्रम्प आणि कठोर स्वभावाचे गुप्तहेर पुतिन यांच्यात या चर्चेत बर्फ किती वितळतो. पण एक गोष्ट निश्चित आहे की, निकाल काहीही असो, तो भारतासाठी महत्त्वाचा ठरू शकतो.