US Elections 2024 : संपूर्ण जगाचं लक्ष लागलेली अमेरिकन अध्यक्षपदाची निवडणूक मंगळवारी, 5 नोव्हेंबर रोजी होणार आहे. डेमोक्रॅटीक पक्षाच्या कमला हॅरिस आणि रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांच्यात अध्यक्षपदासाठी प्रमुख लढत आहे. ट्रम्प दुसऱ्यांदा अध्यक्ष होणार की कमला हॅरिसच्या रुपानं अमेरिकेला पहिली महिला अध्यक्ष मिळणार याचं उत्तर पुढच्या आठवड्यात मिळणार आहे. अमेरिकेचा नवा अध्यक्ष कोण होणार हे पुढच्या आठवड्यात समजणार असलं तरी त्याचा शपथविधी मात्र जानेवारी महिन्यात होईल. संपूर्ण जगात निवडणुकीनंतर बहुमत मिळालेल्या सरकारचा नेता किंवा अध्यक्ष लगेच पदभार स्विकारतो. अमेरिका मात्र त्याला अपवाद आहे.
अमेरिकेतील नवा अध्यक्ष तो निवडून आल्यानंतर 11 आठवड्यांनी पदभार स्विकारतो. हा कालावधी फार वाटत असला तरी अमेरिकन राज्यघटनेत सुचवण्यात आलेल्या चार महिन्यांच्या कालावधीपेक्षा कमी आहे. विद्यमान अध्यक्षांनी त्यांच्या उत्तराधिकाऱ्याकडं पदभार सोपवण्यासाठी हा कालावधी अमेरिकन राज्यघटनेनं निश्चित केला आहे. अमेरिकेत नोव्हेंबर महिन्यात आणि मंगळवारी अध्यक्षपदाची निवडणूक होण्याचं खास कारण आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नोव्हेंबर महिन्यातच का होते मतदान?
अमेरिकन अध्यक्षाची निवडणूक ही नोव्हेंबर महिन्यातील पहिल्या सोमवार नंतर येणाऱ्या मंगळवारीच होते. या दिवसाला देखील ऐतिहासिक संदर्भ आहे. सुरुवातीला प्रत्येक राज्यासाठी मतदानाचा दिवस वेगळा होता. पण, 1845 साली याबाबत कायदा करण्यात आला. त्यानुसार संपूर्ण देशात निवडणुकीचा दिवस एकच निश्चित करण्यात आला.
अमेरिका हा त्याकाळा मुख्यत: कृषीप्रधान देश होता. नोव्हेंबर महिना शेतकऱ्यांसाठी अधिक सोयीचा महिना आहे. त्या काळात पिकां आलेली असतात. हवामान प्रवासाला योग्य असते. त्यामुळे मतदानासाठी नोव्हेंबर महिना निश्चित करण्यात आला.
( नक्की वाचा : Russia Fine on Google : 2 वर 34 शून्य, रशियानं Google लावला दंड! संपूर्ण जगात इतका पैसाच नाही )
मंगळवारीच का होते निवडणूक?
मतदानाचा दिवस कोणता असावा या विषयावर चर्चा झाली त्यावेळी आठवड्यातील काही दिवस बाद झाले. रविवारी जगभरातील ख्रिश्चन चर्चमध्ये प्रार्थना करतात. बुधवार हा शेतकऱ्यांसाठी बाजार दिवस असतो. त्याचबरोबर मतदान केंद्राच्या ठिकाणी प्रवास करण्यासाठी त्या काळात अत्याधुनिक साधनं नव्हती. त्यामुळे ग्रामीण भागातील मतदारांना मतदान केंद्रावर येण्यासाठी अनेकदा एक दिवस लागत असे.
रविवार आणि बुधवार हे दोन वार चर्चमधील प्रार्थना आणि बाजाराचा दिवस असल्यानं बाद झाले. त्याचबरोबर त्यानंतरचा एक दिवस प्रवासासाठी गृहित धरल्यानं सोमवार आणि गुरुवार हे दिवस देखील मतदानासाठी सोयीचे नव्हते. त्यामुळे सर्वांच्या विचारातून अध्यक्षपदाची निवडणूक मंगळवारी होणार हे निश्चित झालं. ही परंपरा आजही सुरु आहे.