गोंदिया शहरातील कुडवा नाक्याजवळील जिल्हा सहकारी बँकेसमोर सोमवारी 22 एप्रिल रोजी रात्री 8.30 वाजेच्या सुमारास दोन दुचाकींवर आलेल्या 4 हल्लेखोरांनी गोलू तिवारी यांच्यावर गोळीबार केल्याची घटना घडली होती. यात गोलू तिवारी यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी आतापर्यंत 7 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यात बंटी दवणे आणि हिरो दवणे यांना शहरातील दासखोली परिसरातून अटक करण्यात आली आहे.
यातील एक आरोपी जबलपूरचा रहिवासी असल्याचं समोर आलं आहे. पत्रकार परिषदेत याबाबत माहिती देताना उपविभागीय पोलीस अधिकारी (उपअधीक्षक) रोहिणी बनकर यांनी सांगितलं की, आरोपींना 29 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. मात्र अद्यापही बराच तपास शिल्लक आहे. यात मुख्य सूत्रधार कोण असू शकतो? हत्येसाठी वापरलेले पिस्तूल बेकायदेशीर असू शकते का? या शास्त्राचा पुरवठा कोणी केला? घटनेनंतर फरार झालेल्या आरोपींना आश्रय देणारे लोक कोण होते? याबाबतचा तपास सुरू आहे. त्यापुढे येत्या काही दिवसात या प्रकरणातील आरोपींची संख्या वाढू शकते. गोळीबाराच्या घटनेमागे परस्पर शत्रुत्वाशिवाय आर्थिक व्यवहारही कारणीभूत असल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे.
नक्की वाचा - बाबा चिडले म्हणून दोन्ही मुलांनी घर सोडलं; चिंताग्रस्त पालकांची पोलीस ठाण्यात धाव
आरोपींचे मोबाइल फोन जप्त करण्यात आले आहेत. त्यांची फॉरेन्सिक तपासणी करण्यात येणार आहे. पोलीस आरोपींचे सोशल मीडिया अकाउंट देखील तपासत आहे. भंडारा कारागृहातून हत्येचा कट रचला गेला होता की, आणखी कुठे आणि त्यात कोण-कोण सामील होते? हे तपासातच समोर येईल. मयत गोलू तिवारी यांच्यावरील गोळीबाराची घटना ऑक्टोबर 2012 मध्ये घडली होती. अटक करण्यात आलेल्या आरोपींवरही अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असून पोलीस सर्वांचे ट्रॅक रेकॉर्ड तपासत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world