Palghar Viral News Today : वसई तालुक्यातील कळंब येथील ‘तुलसी बीच रिसॉर्ट'मध्ये सुरक्षा व्यवस्थेच्या अभावामुळे आणखी एका निष्पाप जीवाचा बळी गेल्याचा गंभीर आरोप होत आहे.अर्नाळा पोलिसांच्या नोंदीनुसार,29 मे रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास 13 महिन्यांचा आयुष दशरथ ईभाड हा खेळता-खेळता रिसॉर्टमधील स्विमिंग पूलमध्ये पडला आणि पाण्यात बुडाला.आयुषचे आई-वडील हे रिसॉर्टमध्ये मजुरीचे काम करत असून त्या वेळी आई किचनमध्ये आणि वडील ग्राहकांच्या सेवेत व्यस्त होते.थोड्या वेळाने मुलगा काही वेळ दिसत नसल्याने शोध घेतला असता तो स्विमिंग पूलमध्ये पडलेला आढळून आला.धक्कादायक बाब म्हणजे,एवढ्या लहान मुलगा स्विमिंग पूलपर्यंत पोहोचला असता,त्याला कोणीच कसे पाहिलं नाही?सुट्टीचे दिवस असल्याने मोठी गर्दी असताना स्विमिंग पूल परिसरात किती लाइफगार्ड किंवा सुरक्षा कर्मचारी तैनात होते?याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
रिसॉर्ट प्रशासनाविरोधात कठोर कारवाई होणार का?
वसई समुद्रकिनारी परिसरातील अनेक रिसॉर्टमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असताना,रिसॉर्ट चालक सुरक्षेच्या मूलभूत नियमांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे.‘तुलसी बीच रिसॉर्ट'मध्ये गर्दी असतानाही स्विमिंग पूल परिसरात कोणतीही प्रभावी सुरक्षा व्यवस्था नसल्याचा आरोप होत असून यापूर्वीही वसई परिसरातील रिसॉर्टमध्ये अशा प्रकारच्या दुर्घटना घडल्याच्या घटना समोर आल्या आहेत.त्यामुळे हा केवळ अपघात नसून रिसॉर्ट व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणाचा बळी असल्याचा संताप व्यक्त होत आहे.या बालकाचा जीव गेल्यानंतरही संबंधित रिसॉर्ट प्रशासनाविरोधात कठोर कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
नक्की वाचा >> Big News: "कांद्याचा काळाबाजार करणाऱ्यांवर मकोका लागणार, इन कॅमेरा..", भाजपा मंत्र्याचा मोठा इशारा
पोलिसांच्या भूमिकेवरही संशय
दरम्यान, घटनेला चोवीस तासांहून अधिक कालावधी उलटूनही अर्नाळा पोलिसांनी केवळ आकस्मिक मृत्यूची नोंद (ADR) करून गुन्हा दाखल न केल्याने पोलिसांच्या भूमिकेवरही संशय व्यक्त केला जात आहे. मृत्यूमागील निष्काळजीपणा, सुरक्षा नियमांचे उल्लंघन आणि रिसॉर्ट व्यवस्थापनाची जबाबदारी यांचा तपास होणे अपेक्षित असताना अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने “रिसॉर्ट चालकाला पोलिस पाठीशी घालत आहेत का?” असा सवाल उपस्थित केला जात आहे.
नक्की वाचा >> Inspirational Story: 'या' बसस्थानकाने महाराष्ट्रात पटकावला प्रथम क्रमांक, 1 कोटींचं बक्षिसही जिंकलं
या प्रकरणी अर्नाळा पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश पुरभे यांच्याशी संपर्क केला असता, तपास करून योग्य कारवाई केली जाईल असे सांगण्यात आलं. मात्र एका निष्पाप चिमुकल्याचा जीव गेल्यानंतरही प्रशासन आणि पोलिस यंत्रणा जागी होणार का, की इतर दुर्घटनांप्रमाणेच या प्रकरणावर ही पडदा पडणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.