घाटकोपरमध्ये घडलेल्या या 5 घटनांनी महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देश हादरला

मुंबईतील घाटकोपरमध्ये घडलेल्या या घटनांनी अख्खा देश हादरून निघाला होता. होर्डिंग कोसळल्याच्या घटनेनंतर घाटकोपरमधील दुर्घटनांचा घेतलेला धांडोळा....

Advertisement
Read Time: 4 mins
मुंबई:

घाटकोपरमधील छेडा नगर परिसरातील तब्बल 250 टन वजनाचं होर्डिंग लगतच्या पेट्रोल पंपावर कोसळल्याने 14 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय 45 हून अधिक जणं गंभीर जखमी झाले आहेत. घाटकोपरमधील या घटनेनंतर मुंबईसह राज्यभरात खळबळ उडाली आहे. मात्र यापूर्वीही घाटकोपरच्या अनेक घटनांनी नागरिकांच्या हृदयाचे ठोके चुकवलेत. मुंबईतील घाटकोपरमध्ये घडलेल्या या घटनांनी अख्खा देश हादरून निघाला होता. होर्डिंग कोसळल्याच्या घटनेनंतर घाटकोपरमधील दुर्घटनांचा घेतलेला धांडोळा....

घाटकोपर इमारत दुर्घटना, सिद्धी साई इमारत

अख्ख्या मुंबईला हादरवणाऱ्या घाटकोपरमधील सिद्धी साई इमारत कोसळल्याने तब्बल 17 जणांचा मृत्यू झाला होता. 2017 मध्ये घडलेल्या या दुर्घटनेत 28 जणं गंभीर जखमी झाले होते. सिद्धी साई इमारतीच्या मूळ आराखड्यात बदल करण्यात आल्याने इमारत कोसळल्याचं समोर आलं होतं. या इमारतीच्या तळमजल्यावर रुग्णालय होतं. या रुग्णालयाचे नूतनीकरण करताना इमारतीचा मूळ ढाचा बदलण्यात आल्याने इमारत कोसळली आणि 17 जणांचा हकनाक बळी गेला. 

Advertisement


घाटकोपर प्लेन क्रॅश...
2018 मध्ये घाटकोपरच्या सर्वोदय रुग्णालय परिसरात उद्योगपती दीपक कोठारी यांच्या यूवाय एव्हिएशन कंपनीचे खासगी चार्टर्ड विमान कोसळलं होतं, या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेत रस्त्यावरुन गाडीवर जाणाऱ्या एकाचाही मृत्यू झाला होता. उत्तर प्रदेशातील ‘KING AIR C90' नावाचं विमान टेस्ट फ्लाइटदरम्यान घाटकोपरमध्ये कोसळलं होतं. हे विमान 2014 मध्ये उत्तर प्रदेश सरकारकडून यूवाय एव्हिएशन या कंपनीने विकत घेतलं होतं. या चार्टड विमानाचे पायलट मारिया कुबेर, सह पायलट पी. एस. राजपूत, तंत्रज्ञ सुरभी, तंत्रज्ञ मनिष पांडे यांचा मृत्यू झाला होता. घाटकोपर पश्चिम हा परिसर संपूर्ण रहिवासी व दाट वस्तीचा भाग आहे. मात्र, विमानात बिघाड झाल्याचे लक्षात आल्यानंतर पायलट मारिया मोकळी जागा शोधण्याचा प्रयत्न करीत होत्या.. मात्र, रहिवासी भाग असल्याने त्यांना अडचण येत असावी. अखेर त्यांनी निर्माणाधीन इमारतीवर विमान कोसळवले. याआधी विमानाने तीन ते चार वेळेत तेथे घिरट्या घातल्या होत्या. येथे लोक तर नाहीत ना, मारिया याचा अंदाज घेत असाव्यात अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. थोडं पुढे विमान क्रॅश झालं असतं तर मृतांचा आकडा वाढला असता. 

Advertisement


राजेश्वर उदानी हत्याप्रकरण...
57 वर्षी सराफा व्यापारी राजेश्वर उदानी हेदेखील घाटकोपरचे राहणारे होते. राजेश्वर उदानी हे हिरे आणि सोने- चांदीच्या दागिन्यांचे व्यापारी होते. 57 वर्षीय उदानी 28  नोव्हेंबर 2018 मध्ये बेपत्ता झाले होते. शेवटी डिसेंबर महिन्यात त्यांचा मृतदेह पनवेलजवळी जंगलात सापडल्याने पोलिसांनी हत्येचा तपास सुरू केला. तपासानंतर झालेल्या खुलाशानुसार, सचिन पवार, दिनेश पवार, महेश भोईर, प्रणीत भोईर, शाहिस्ता खान आणि बारगर्ल निखत उर्फ झारा खान यांनी राजेश्वरचा पनवेल गेस्ट हाऊसवर खून केला होता. 
या प्रकरणात हिंदी मालिका साथ निभाना साथिया या मालिकेत सूनेची भूमिका साकारणारी देवोलिवा भट्टाचार्य हिचाही संबंध असल्याचं उघड झालं होतं. त्यामुळे देवोलिवा यांच्यासह सचिन पवार यांनाही या प्रकरणात अटक करण्यात आली होती. धक्कादायक म्हणजे राजेश्वर उदानी यांची हत्या केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी या पाचही जणांनी मृतदेह पनवेलच्या नेहरे परिसरात टाकून पळ काढला होता. सचिन पवार हा देवोलीनासोबत गुवाहाटीला गेला. इतर आरोपी मुरूडला गेले. तिथे आरोपी त्यांच्या एका मित्राच्या घरी थांबले होते. इथे ही बारबालासुद्धा होती. तर इतरांनी थेट मुंबई गाठून आपण काही केलंच नाही, या अविर्भावात राहायला सुरुवात केली. पण फोनकॉल आणि मिसिंग तक्रारीमुळे पोलिसांनी तापासाला सुरुवात केली, आणि एकामागोमाग हत्याकांडाचे संबंध जुळू लागले. पोलिसांनी या सहा आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

Advertisement

घाटकोपर बॉम्बस्फोट...
2 डिसेंबर 2002 मध्ये मुंबईच्या घाटकोपरमधील बसमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. या स्फोटात दोघांचा मृत्यू झाला होता आणि 39 जण जखमी झाले होते. यात पोलिसांनी आठ जणांना अटक केली होती. यातील एक नाव ख्वाजा युनूस याचं. परभणी जिल्ह्यात राहणारा युनूस व्यवसायाने इंजिनियर होता. तो दुबईत नोकरीत करीत होता. 25 डिसेंबर 2002 ला त्याला पकडण्यात आलं. या बॉम्बस्फोटात युनूसचा हात असल्याच्या दावा पोलिसांकडून करण्यात आल्यानं त्याला अटक करण्यात आलं होतं. त्यानंतर 7 जानेवारी 2003 रोजी तो बेपत्ता झाल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आले. युनुसची चौकशी करण्यासाठी त्याला औरंगाबाद येथे घेऊन जात असताना पोलिसांच्या गाडीचा अपघात झाला. त्यावेळी संधीचा फायदा घेऊन युनुस बेडीसह पळून गेला व शोधूनही तो सापडला नाही, असे पोलिसांकडून सांगण्यात आले होते. ख्वाजा युनुस याचा पोलीस कोठडीतच मृत्यू झाला. पण त्याच्या हत्येचा गुन्हा लपविण्यासाठी पोलिसांनी तो पळाल्याचा बनाव रचला, असा आरोप ख्वाजाच्या नातेवाईकांनीही पोलिसांवर केला होता.  

नक्की वाचा - रिक्षाचा चुराडा, मोबाइल सापडला, पण 12 तासानंतरही 'तो' बेपत्ता


रमाबाई आंबेडकर गोळीबार प्रकरण...
देशभरात चर्चिल जाणारं रमाबाई आंबेडकर गोळीबार प्रकरणामुळे मोठा गदारोळ झाला होता. घाटकोपर येथील रमाबाई नगरात 11 जुलै 1997 रोजी डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना झाली होती. आणि त्या नंतर राज्य राखीव दलाचा पोलीस उपनिरीक्षक मनोहर कदम यांनी अंदाधुंद गोळीबार केला होता. त्यात 11 दलित ठार झाले होते. आंदोलन करणाऱ्या जमावाने एक लक्झरी बस पेटवली होती. नंतर हा जमाव गॅस टँकर पेटवून देणार होता. त्यांना पांगवण्यासाठी गोळीबार केल्याचे सांगण्यात आले होतं.