गेल्या दोन-तीन दिवसात महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या दुर्घटना घडल्या आहे. या दुर्घटनामध्ये एक दोन नाही तर तब्बल 20 जणांचा जीव गेला आहे. विशेष म्हणजे या सर्वांचा बुडून मृत्यू झाला आहे. इंदापूर, नाशिक अहमदनगर इथं या दुर्घटना घडल्या आहेत. यात नाशिकमध्ये एकाच कुटुंबातल्या पाच जणांचा तर इंदापूर इथे एकाच कुटुंबातल्या चार जणांचा समावेश आहे. यात लहानमुलांचाही समावेश आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नाशिकमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांचा बुडून मृत्यू
नाशिकच्या गोसावी वाडीतील हनिप शेख राहात होते. उन्हाच्या झळा लागत असल्याने त्यांच्या भाच्यांनी त्यांच्याकडे पोहण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार मामाने शिर्डी वाटर पार्कमध्ये जाण्याचा प्लॅन केला होता. मात्र तिथलं तिकीट महाग होतं. मग स्विमिंग पुलमध्ये जाण्याचे ठरले. पण तिथे घालावा लागणारा पोशाख त्यांच्याकडे नव्हता. त्यामुळे तेही बारगळलं. मग मामाने इगतपुरीच्या बाहुली धरणावर जाण्याचे ठरवले. भाचे मंडळीही पोहायला मिळणार म्हणन खुश झाले. एकाच रिक्षाने लहान मुलांसह नऊ जण धरणाकडे गेले. त्यावेळी दोघेजण खोल पाण्यात गेले. एकाचा पाय खाली अडकला म्हणून त्याला वाचवण्यासाठी अन्य तिघांनीही पाण्यात उडी घेतली. त्यात तेही बुडाले. त्यात दोन मुली दोन लहान मुलं आणि मामा या पाच जणांचा समावेश होता.
भीमा नदी पात्रात सहा जण बुडाले
मंगळवारी सायंकाळी इंदापूरातून कळाशीच्या दिशेने जाणारी बोट भीमा नदी पात्रात उलटली होती. जोरदार वारा सुटल्याने ही दुर्घटना घडली. त्यानंतर बोटीत असणाऱ्यांचा शोध घेण्यास सुरूवात करण्यात आली. तब्बल 40 तासाच्या शोध मोहीमेनंतर भीमा नदी पात्रातून सहा जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. यातील चार जण हे एकाच कुटुंबातील होते. यामध्ये कोमल गोकूळ जाधव (वय 25), शुभम गोकूळ जाधव (वय दीड वर्ष), माही गोकूळ जाधव (वय 3 वर्षे) यांचा समावेश होता. हे सर्व करमाळा तालुक्यातील झरे गावचे रहिवासी आहेत.
प्रवरा नदीतही सात जण बुडाले
अहमदनगरमधील SDRF च्या बचाव पथकाची बोट बुडाली आहे. नगरमधील प्रवरा नदीपात्रातील सुगाव बंधाऱ्यातून ही धक्कादायक घटना समोर आली आहे. यावेळी बोटीत पाच जवान होते. पाच जवानांचा मृत्यू झाला आहे. या ठिकाणीच बुधवारी दोन तरूण बुडाले होते. त्यातील एकाचा मृतदेह सापडला होता. अन्य एकाचा शोध घेण्यासाठी SDRF चे पथक आले होते. मात्र शोध कार्यादरम्यान त्यांचीही बोट उलटली. त्यात जवानांना आपला जीव गमवाला लागला आहे.
इगतपुरीत मायलेकी विहिरीत बुडाल्या
इगतपुरीच्या बाहुली धरणात पाच जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच इगतपुरीमधीलच मुंढेगावात अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. इथे तीन वर्षाच्या चिमुकलीचा पाय घसरून ती विहिकीत पडली. तिला वाचवण्यासाठी तिच्या आईनेही विहिरीत उडी घेतली. त्यात या दोघीही मायलेकींचा बुडून मृत्यू झाला. या मायलेकी शेनवड खुर्द या गावात राहात होत्या. याबाबत गावकऱ्यांना माहिती मिळताच त्यांनी त्या दोघींचेही मृतदेह विहीरीतून बाहेर काढले.